Your Own Digital Platform

संगीतनाम हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे सुलभसाधन : मठाधिपती सुंदरगिरी महाराज

 
औंध (ता.खटाव) : येथे हिरापूरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राज्यस्तरीय संगित भजन स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी सुंदरगिरी महाराज, श्यामपुरी महाराज आदी मान्यवर. तर दुसऱ्या छायाचित्रात संगित भजन स्पर्धेतील शुभारंभाचा एक क्षण.

औंधमध्ये राज्यस्तरीय संगित भजन स्पर्धेस उत्साहात सुरूवात


स्थैर्य, औंध : औंध(ता.खटाव) येथील श्री यमाई देवीच्या भूमीत परमपूज्य हिरापूरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणार्‍या संगित भजन स्पर्धा तालुकयाचे भूषण आहेत. संगीतनाम हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे सुलभसाधन आहे असे मत पुसेगावच्या श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
 
 हिरापूरी महाराजांच्या ४९ व्या पुण्यस्मरणानिमित्त औंध येथे आज २० व्या राज्यस्तरीय संगित भजन स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हिरापूरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर वेदांताचार्य शिवानंद भारती, पद्मावतीचे मठाधिपती स्वानंद महाराज, मठाधिपती श्यामपुरी महाराज, मारूतीगिरी महाराज (हरीयाणा), दयानंद महाराज, लक्ष्मणराव शिंदे, केशवराव जाधव,अमृत नलवडे, साहेबराव माने, रावसाहेब कर्णे, नंदकुमार खापे, सुनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
प्रारंभी परमपूज्य ब्रम्हलीन हिरापूरी महाराजांचे स्मरण करण्यात आले. यावेळी असणारी साधू संतांची उपस्थिती, मंत्रोच्चारांचा जयघोष, टाळ, विणा, मृदंग, पखवाज, तबला अशा संगित वाद्यांचे विधीवत पूजन आणि मोठ्या संख्येने आलेल्या संगित प्रेमींच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेले होते. यावेळी बोलताना सुंदरगिरी महाराज म्हणाले, यमाई देवीचे मूळपीठ असलेल्या औंध नगरीचे महत्व मोठे आहे. खटाव तालुका ही ऐतिहासिक, सांस्कृतिक, क्रांतीकारी विचारांची भूमी आहे. औंधच्या भूमीत परमपूज्य हिरापूरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणार्‍या या स्पर्धा तालुकयाचे भूषण आहेत. भजन स्पर्धेला वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. संतांच्या रूपातून भगवंत ज्ञान देण्यासाठी येतो. जीवनात नामस्मरणाला मोठे महत्व आहे. जीवनाच्या ऐलतीरापासून ते पैलतीरापर्यंत जाण्यासाठी नाम महत्वाचे आहे. संगीतनाम हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे सुलभ साधन आहे.
 
 वेदांताचार्य शिवानंद भारती म्हणाले, साहित्य हे समाजहिताचे असले पाहीजे. जे ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आपणाला चांगले करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. डोक्यातून, मनातून वाईट विचार निघून गेले पाहीजेत. काहीही स्वर काढणे म्हणजे संगित नव्हे. संगित भजन ही ईश्वराची आराधना आहे. आगामी काळात या स्पर्धा अधिकाधिक वाढण्यासाठी समाजातून सहकार्याची भूमिका निर्माण व्हावी.
 
बबनराव पाटणकर यांनी सुत्रसंचालन केले. गणेश बोटे यांनी स्वागत केले. सुनिल सावंत यांनी आभार मानले. यावेळी विविध मान्यवर तसेच जिल्ह्या परजिल्ह्यातील संगित भजनी मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 उद्या महिला गटांच्या संगित भजन स्पर्धा राज्यस्तरीय संगित भजन स्पर्धेत जिल्ह्या परजिल्ह्यातील महिला व पुरूषांचे भजनी मंडळांचे संघ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. उद्या (शुक्रवार दि. १७) रोजी महिला भजनी मंडळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे.