Your Own Digital Platform

कोळकीच्या सुपुत्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव


बाल तबला वादक कु.अथर्व मनोज लोहार ‘बालशक्ती पुरस्कारा’ने सन्मानित


स्थैर्य, फलटण : कोळकी, ता. फलटण येथील लोहार कुटुंबातील सुपुत्र चि. अथर्व मनोज लोहार (वय 10, सध्या रा.अंबरनाथ, जि. ठाणे) या बाल तबला वादकाची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार योजनेंतर्गत बालशक्ती पुरस्कार 2020 साठी निवड होवून बुधवार दि. 22 रोजी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथील समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचे हस्ते सदर पुरस्कार समारंभ पुर्वक प्रदान करुन त्याला गौरविण्यात आले. 1 लाख रुपये रोख, टॅबलेट, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या पुरस्कारासाठी देशभरातून 30 आणि महाराष्ट्रातून 3 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून कला, संस्कृती, खेळ, साहस आदी क्षेत्रात आपले कौशल्य दाखविलेल्या या बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार योजनेंतर्गत बालशक्ती पुरस्कार 2020 साठी निवड झाली आहे. या पुरस्काराबद्दल चि. अथर्व लोहार याचेवर सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्यावतीने चि. अथर्व मनोज लोहार याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून राष्ट्रपती भवनातील समारंभानंतर दि. 23 व दि. 26 जानेवारी रोजी संचलनात कु. अथर्व मनोज लोहार सहभागी होणार आहे.

स्थानिक जिल्हा व राज्यस्तरावर चि. अथर्व मनोज लोहार याने तबला वादक म्हणून आपली कला यापूर्वी सादर केली असून आजपर्यंत नवी दिल्ली, मुंबई, पुणे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्याने 1 आंतरराष्ट्रीय व 8 राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळविली आहेत. 2015 साली चि. अथर्व लोहार याने थायलंड बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले आहे. मुंबई आकाशवाणी केंद्र, राष्ट्रीय कला मंच व महाराष्ट्रातील 60 हून अधिक ठिकाणी आपल्या तबला वादनाने रसिकांची मने जिंकली आहेत. त्याने तबला वादनात सर्वोत्कृष्ट तबला वादनाचा सन्मान प्राप्त केला आहे.

चि. अथर्व लोहार याने तबला वादनाचे प्रशिक्षण अंबरनाथ येथील गुरु सुनील शेलार यांच्याकडे घेतले आहे. देशातील सर्वच वर्तमानपत्रात चि. अथर्वला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य त्याचे कलेतील अप्रतीम कौशल्यामुळे प्राप्त झाले असल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

चि. अथर्व लोहार याच्या या अतुलनीय यशामधे त्याचे आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकु, आत्या, मामा-मामी, भाउ बहिण, व साप्ताहिक लोहसंस्कारचे संपादक हनुमंतराव चव्हाण यांनी दिलेल्या प्रोत्साहनाचा मोठा सहभाग आहे.

चि. अथर्वचा जन्म दि. 23 जानेवारी 2010 रोजी कोळकी, ता. फलटण, जि. सातारा येथे झाला असून हल्ली तो अंबरनाथ जि. ठाणे येथे राहत आहे. आजोबा लक्ष्मणराव लोहार (टिंगरे) सैनिकी सुभेदार, वडील रेल्वे पोलीस, काका अजय पोलीस, मोठे काका पोलीस निरिक्षक आहेत. चि. अथर्व एक ते दिड वर्षाचा असल्यापासून त्याचे पाय पाळण्यात दिसले. अथर्व याच्या बोटाच्या सुसंगत हालचाली कधी गुडघ्लयावर तर कधी टेबलावर, भांड्यावर, ताटावर तर कधी आईवडीलांच्या डोक्यावर दिसू लागल्या होत्या.

संपूर्ण लोहार परिवार बुध्दिजीवी असल्याने चि. अथर्वची तबला वादनाची सुप्त शक्ती लगेच हेरली गेली, आत्या, मामा महादेव गंगाधर वसव यांनी पंढरपुरहून आणलेला तबला अथर्वास सप्रेम भेट दिला. गुरुवर्य सुनील शेलार सर अंबरनाथ यांचे मार्गदर्शनाखाली चि. अथर्व मनोज लोहार याचे तबला वादनाचे धडे सुरु झाले. सरांनीही अवलिया अथर्वला धडे देण्यास कसर ठेवली नाही.

वयाच्या 5 व्या वर्षी म्हणजे सन 2015 पासुन चि. अथर्व लोहार याचा थक्क करुन सोडणारा प्रवास सुरु झाला. सिध्दी विनायक ट्रस्ट मुंबई यांच्या सतत होणार्या तबला वादन स्पर्धा, स्वामी समर्थ अक्कलकोट ट्रस्ट यांच्या दर 2 महीन्यांनी होणार्या स्पर्धा व गणपती पुळे येथील दर वर्षी होणार्या स्पर्धा त्याच्या चांगल्याच अंगवळणी पडल्या आणि चि. अथर्व प्रकाश झोतात आला.

वयाच्या 7 व्या वर्षी 2017 मधे चि. अथर्व लोहार याने थेट थायलंड येथे स्पर्धेसाठी जावून पहिल्या नंबरची विरश्री व रोख पारितोषक खेचुन आणले आणि भारत देशाचे नाव अधोरेखीत केले.

चि. अथर्वने सन 2018 मध्ये शिर्डी येथे दोन वेळेस जाऊन प्रथम क्रमांकाची स्पर्धा गाजवली. 9 व्या वर्षी 2019 मधे मुंबई आकाशवाणी वरील अथर्वचे तबला वादन चांगलेच गाजले. वयाचे 10 व्या वर्षी उत्तरप्रदेश लखनऊ येथे तबला वादन स्पर्धा पूर्ण करुन तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे हस्ते गौरव व रोख 10,000 रूपये पारितोषिक मिळविले.

याचाच परीपाक म्हणून चि. अथर्व मनोज लोहार नंबर 1 बाल तबला वादक ठरला राष्ट्रीय पातळीवर दखल घेवून दि. 22 जानेवारी 2020 रोजी थेट देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचे हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार व 1 लाख रूपये रकमेसह प्रदान करण्यात येवून आता प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात सहभागी होण्याचा मान प्राप्त झाला आहे.

चि. अथर्व याने फलटण तालुक्याबरोबर महाराष्ट्र व देशाचे विशेषत: कोळकी ता. फलटण येथील लोहार(टिंगरे) परिवाराचे आणि लोहार समाजाचे नाव रोशन केले आहे. 
 
अद्वितीय शक्ती म्हणून चि. अथर्व नेहमीच समाजाचे प्रेरणास्रोत राहील.आजचा दिवस लोहार समाजासाठी उत्सव पर्वणीच म्हणावा लागेल.