Your Own Digital Platform

क्रीडा स्पर्धा तणाव मुक्तीसाठी आवश्यक - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर


सातारा  : क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो, बंधुभाव वाढीस लागून ताणव मुक्त्‍ होण्यास मदत होते यामुळे क्रीडा स्पर्धा खूप महत्वाच्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले.
 
विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास पुणे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीचे सभापती वनिता गोरे, महिला व बाल विकास विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप हिवराळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.
 
आताची पिढी ही मोबाईल, संगणक यात गुंतलेली आहे यामुळे त्यांचा विकास खुंटतो. त्यांच्या विकासासाठी व सुप्तगुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा खूप महत्वाच्या आहेत. क्रीडा स्पर्धेच्या माध्यातून पुढे जाण्याची मोठी संधी उपलब्ध हाते, असे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
 
सातारा येथील निरीक्षगृहातील प्रियंका मरकड या विद्यार्थीने सुंदर असे एकपात्री सादर केले या विद्यार्थींनीचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. पुणे विभागातील पुणे,सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्हयातील बालगृहात दाखल असलेल्या ७५० प्रवेशितांच्या विभाग स्तरावरील चाचा नेहरू बाल महोत्सवा अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे सहभाग घेतला आहे. या स्पर्धा 6 ते 8 जानेवारी या कालावधीत श्रीमंत. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे संपन्न होणार आहे. या क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेट,खो-खो, कब्बडी, १०० मिटर धावणे, १००X४ रिले धावणे, उंच उडी,लांब उडी, बुध्दीबळ,वक्तृत्व स्पर्धा ,कविता वाचन,निबंध, चित्रकला स्पर्धा शुध्द लेखन , हस्ताक्षर व नृत्य व सामुहिक गीत इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.