Your Own Digital Platform

कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये फलटण पत्रकार संघ विजयीस्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांनी शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन किक्रेट खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ निर्माण करुन देऊन गेली १४/१५ वर्ष या स्पर्धांचे सातत्य टिकवून नवीन खेळाडू तयार होण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
 
फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा दि. १२, १३ व १४ जानेवारी दरम्यान मुधोजी क्लब मैदान, फलटण येथे उत्साहात संपन्न झाल्या. फलटण पत्रकार संघ विजेता तर फलटण नगरपरिषद संघ उपविजेता ठरला. यावर्षी या उपक्रमात मुधोजी महाविद्यालय, नगरपरिषद, वीज वितरण कंपनी, बिल्डर असोसिएशन, प्रा. शिक्षक, महसूल कर्मचारी, कृषी कर्मचारी, शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, पत्रकार संघ आदी सुमारे २२ संघांनी सहभाग नोंदविला. गेली 3 दिवस या सर्व संघांचे सामने मुधोजी क्लब मैदान येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अंतीम सामना फलटण पत्रकार संघ विरुध्द नगरपरिषद संघ यांच्यात मोठ्या चुरशीने व अटीतटीने झाला त्यामध्ये फलटण पत्रकार संघ विजेता आणि नगरपरिषद संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेतील विजयी संघ व सर्वच खेळाडूंचे विशेष अभिनंदन करताना पुढच्या वर्षी महिला संघांना या स्पर्धेत सहभागी करुन घेण्याची सूचना करतानाच या चांगल्या उपक्रमाबद्दल पत्रकारांचे कौतुक करतानाच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे स्पष्ट आश्वासन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.

या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक बिल्डर्स असोसिएशन, तृतीय क्रमांक मुधोजी महाविद्यालय, द्वितीय क्रमांक नगर परिषद, आणि प्रथम क्रमांक फलटण पत्रकार संघाने जिंकला त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मच शक्ती भोसले, मॅन ऑफ द सिरीज अजिंक्य झाजूरने, बेस्ट बॅट्समन सुनिल घोलप, बेस्ट बोलर अमोल मोहोळकर, बेस्ट फिल्डिंग फिरोज शेख आणि बेस्ट कोच म्हणून बेडके यांना सन्मानित करण्यात आले.
 
या स्पर्धेसाठी पंच म्हणून संजय गायकवाड, समीर तांबोळी, शक्ती भोसले, कैलास पवार, अमोल मोहोळकर व सिराज शेख यांनी उत्कृष्ट काम केले तसेच स्कोअरिंग समीर तांबोळी, मुकेश अहिवळे यांचे सहकार्य लाभले.
मुधोजी क्लब मैदान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपलब्ध करुन दिले.
 
शामकुमार साउंड सर्व्हीस आणि मंडप यांचेही उत्तम सहकार्य लाभल्याबद्दल त्यांना यावेळी गौरविण्यात आले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते पुरस्कार वितरण आणि सहकार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींचा पत्रकारांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
 
उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अनिल शिरतोडे, सुनिल मठपती, भाऊसाहेब कापसे, राहुल निंबाळकर, मुकुंद रणवरे यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, क्रिकेट प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.