Your Own Digital Platform

हवेत आग लागून हेलिकॉप्टर कोसळलं; बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा मृत्यू


स्थैर्य, सातारा : अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू  कोबी ब्रायंट (वय ४१) याच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. हवेत असताना हेलिकॉप्टरला आग लागून हा अपघात झाला. मृतांमध्ये ब्रायंटच्या १३ वर्षीय मुलीचाही समावेश असल्याची माहिती अमेरिकी मीडियानं दिली आहे.

लॉस एंजलिसपासून ६५ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचं होतं. आग लागून हेलिकॉप्टर झुडपात कोसळलं. त्यामुळं तिथंही आग लागली. आगीमुळं बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमधील कुणीही वाचू शकलं नाही.

हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातात मरण पावलेल्या अन्य प्रवाशांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.
 
कोबी ब्रायंट हा तब्बल २० वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये सक्रिय होता. या काळात त्यानं पाच चॅम्पियनशीप जिंकल्या होत्या. १८ वेळा तो 'एनबीए ऑल स्टार' ठरला होता. तो बहुतेक वेळा हेलिकॉप्टरनेच प्रवास करायचा. त्याच्या अपघाती निधनामुळं बास्केटबॉल प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.