Your Own Digital Platform

बुधवारी देशव्यापी संप : वसंतराव नलवडे


विविध संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार

 
स्थैर्य, सातारा : दहा केंद्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य सरकारी, केंद्रीय कर्मचारी संघटना विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटीत कामगारांच्या संघटनांनी बुधवार दि. ८ जानेवारी २०२० रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून त्यामध्ये २० कोटी कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय विमा कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष वसंत नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
दरम्यान याच दिवशी सातारा शहरातील विविध कर्मचारी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
वसंत नलावडे म्हणाले, बेरोजगारी नोकरभरती आणि कंत्राटी कर्मचारी कायम करणे, खाजगीकरण - सार्वजनिक उद्योगांची विक्री आणि खासगीकरण्यास विरोध, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून सर्वांना निश्चित पेन्शन योजना द्यावी. शिक्षण व आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण यास विरोध, योजना कर्मचाऱ्यांना मानधन ऐवजी वेतन आणि मान्यता. मालकधार्जिणे कामगार कायद्यातील बदलांना विरोध, ग्राहक संरक्षण व इतर क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढविण्यास विरोध आदी मुद्द्यांवर दहा केंद्रीय कामगार संघटना तसेच बँक, विमा, राज्य सरकारी, केंद्रीय कर्मचारी संघटना विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटीत कामगारांच्या संघटना यांनी ३० सप्टेंबर २०१९ रोजी दिल्ली येथील परिषदेत ठरविल्यानुसार दि. ८ जानेवारी २०२० रोजी देशव्यापी संघाचे हाक देण्यात आली आहे. देशातील वेगाने बदलणार्‍या परिस्थितीमुळे शेतकरी संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला असून विद्यार्थी संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.
 
सातारा येथे सर्व क्षेत्रातील कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून संपाची तयारी केली असून राज्य कर्मचारी, बँक, विमा, पोस्ट, बीएसएनएल, जिल्हा परिषद व इतर कर्मचारी यांनी दि. ८ जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर एकत्र जमून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर यायचे आहे. त्याठिकाणी निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला राज्य कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख, सिटूचे जिल्हा सचिव माणिक अवघडे, चतुर्थश्रेणी संघटनेच्या सुरेखा चव्हाण, असलम तडसरकर उपस्थित होते.