Your Own Digital Platform

‘वर्मा’वर बोट


काही शहाणे आपल्या मर्यादा संभाळू शकत नसतात आणि त्यांच्या शहाणपणावर विसंबून रहाणार्या राजकीय पक्षांना त्याची मोठी किंमत मोजावी लागत असते. गुरूवारी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे महाअधिवेशन योजले होते आणि तिथे आपल्या पक्षाचा नवा ध्वज त्यांनी अनावरण केला. त्याविषयी खुलासा देताना त्यांनी त्याचा अस्पष्ट खुलासा केलेला आहे. नव्या झेंड्यामध्ये त्यांनी हिरवा आणि निळा असे जुन्या झेंड्यातले पट्टे हटवले आहेत. जेव्हा पक्षाचा आरंभ केला, तेव्हा आपल्या मनात तसा झेंडा नव्हता. पण अनेक अनाहुत सल्लागारांच्या आग्रहामुळे आपण तसा झेंडा स्विकारला. पण मनातला झेंडा आता घेतलाय तसाच भगवा होता, हा त्यांचा खुलासा आहे. पण हे अनाहुत सल्लागार कोण होते? असे सल्लागार नेत्यांना वा उच्चपदस्थांना कुठून भेटतात? असा एक प्रश्न पडतो. हल्ली तर अशा चाणक्यांची अनेक दुकाने झालेली आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदींना बहूमतापर्यंत घेऊन गेले. अशी ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांचा खुप गवगवा झालेला होता. आजकाल ते नितीशकुमार यांच्या जदयु नामक पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे नितीश यांच्याशी वारंवार खटके उडू लागलेले आहेत. त्याच पक्षाचे आणखी एक बुद्धीमान नेते आहेत, त्यांचे नाव पवन वर्मा असे आहे. त्यांनी कधी कुठल्याही पक्षात कार्यकर्ता म्हणून काम केलेले नाही. तर भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी म्हणून काम केलेले आहे. सरकारी नोकरी संपताच त्यांनी राजकारणात उडी घेतली व ते मुख्यमंत्री नितीशकुमारचे सल्लागार झालेले होते. त्यांच्या सल्ल्याने नितीशकुमार यांची नंतरच्या काळात पुर्ण दुर्दशा होऊन गेली. मग त्यांना नाक मुठीत धरून भाजपा व मोदींना शरण यावे लागलेले होते. मनसेचा झेंडा असो किंवा जदयुची शरणागती असो, ह्या विद्वानांनी ओढवून आणलेली असते. त्यांनी खुप पुस्तके वाचलेली असली तरी सामान्य जनतेशी त्यांचा कधीच संपर्क नसतो. बहुधा राज आणि नितीश यांना एकाच वेळी त्याचे भान आलेले असावे.

महाराष्ट्रात मनसेने आपला झेंडा बदलून हिंदूत्वाची उघड कास धरली आहे आणि तिकडे नितीशनी स्पष्ट शब्दात आपल्या दोघा बुद्धीमान सहकार्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची ठाम भूमिका घेतलेली आहे. 2014 सालात याच पवन वर्मांच्या तात्विक आग्रहामुळे नितीशकुमार यांनी एनडीए सोडण्याचा पवित्रा घेतला होता. बिहारमध्ये नितीश यांची स्वबळावर बहूमत मिळवण्याची कुवत नाही, हे सत्य असले तरी ते व्यवहारी सत्य होते व आहे. पण वर्मांची गोष्ट वेगळी. ते पुस्तकीपंडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखी लोकमतापेक्षाही पुस्तके श्रेष्ठ असतात आणि पुस्तकात जसे म्हटलेले आहे, त्यानुसारच जनतेने वागले पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास असतो. तशी जनता वागत नसेल तर जनता मुर्ख असल्याचा त्यांना कमालीचा आत्मविश्वास असतो. सहाजिकच गुजरात दंगलीने बदनाम केलेल्या नरेंद्र मोदींना भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार करताच पवन वर्मानी नितीशचे कान भरले आणि एनडीएतून बाहेर पडण्याचा सल्ला त्यांना दिला. परिणामी एका बाजूला लालू व दुसर्या बाजूला भाजपा, अशा कैचीत नितीशना आणून सोडले. मतदाराने नितीशना वस्तुस्थिती दाखवली आणि भाजपाकडे शरणागत होऊन जाणे शक्य नाही, म्हणून नितीशवर तेव्हा लालूंना शरण जाण्याची नामुष्की आली. त्यासाठी आपल्या हक्काच्या जागा सोडून कॉग्रेस आणि लालूंना संजिवनी द्यावी लागली. भले त्यात नितीशचे मुख्यमंत्रीपद टिकले होते. पण लालू कुटुंबियांचा जाच रोजच्या रोज सहन करण्याची लाचारी आली होती. अखेरीस नितीशना त्यातून सुटण्यासाठी त्याच मोदींना शरण जावे लागले आणि म्हणून 2017 नंतर नितीश पुन्हा एनडीएत परतले. त्यासाठी त्यांना शरद यादव यांच्यासारखा जुना सहकारी गमावण्याची पाळी आली होती आणि आता पुन्हा पवन वर्मा एनडीए सोडण्याचे सल्ले नितीशना द्यायला लागले होते. त्यांना गप्प करताना नितीशनी नेमके ‘वर्मा’वर बोट ठेवलेले आहे.

पक्षाची तात्विक वैचारीक भूमिका नावाचा तमाशा पवन वर्मा यांनी चालविला होता. नागरिकत्व कायद्याला जदयुने पाठींबा देणे, वैचारिक भूमिकेला हरताळ असल्याचे वर्मांचे म्हणणे होते. म्हणूनच त्यांनी त्या कायद्याच्या विरोधाचा आग्रह धरला होता. पण नितीश मान्य करीनात, तेव्हा वर्मांनी जाहिरपणे भूमिका घ्यायला सुरूवात केली. त्यांना नितीशनी एका वाक्यात समजावले. तुम्हाला वैचारिक भूमिका हवी की राज्यसभेची उमेदवारी हवी? वर्मासारख्या पोटार्थी विद्वानांची ही लाचारी असते. ते वैचारिक चर्चेचे फ़ड रंगवू शकतात. पण स्वत:साठी वा पक्षासाठी हजारभर मते कधी मिळवू शकत नाहीत. शब्दांचे मनोरे उभे करण्याचे कसब त्यांच्यापाशी असते, पण विजयाची किरकोळ इमारतही त्यांना कधी बांधता येत नाही. जनता दल, मार्क्सवादी पक्षापासून कॉग्रेसपर्यंत अशाच बिनबुडाच्या अति बुद्धीमंतांनी पक्षाच्या संघटना मोडीत काढून जनतेच्या मनातून ते पक्ष संपवून टाकलेले आहेत. पवन वर्मा त्यापैकी एक आहेत. तेव्हाच म्हणजे 2014 साली जदयु एनडीतून बाहेर पडला नसता, तर पहिल्या मोदी सरकारमध्ये भाजपानंतर तोच दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला असता. शिवाय मोदींप्रमाणे दिर्घकाळ बिहारचा मुख्यमंत्री असल्याने नितीश यांचे स्थान एनडीएत मोदींना तुल्यबळ राहिले असते. पण पवन वर्मांच्या वैचारिक सल्ल्यामुळे जदयुच बिहारमधून संपण्याची वेळ आली. आताही स्वबळावर चार खासदार वा 20 टक्के मते मिळवण्याइतकी पक्षाची शक्ती एका राज्यात नाही. पण पवन वर्मांचा आवेश बघितला, तर ते जगाला शहाणपण शिकवण्याच्या सज्जतेमध्ये असतात. कपील सिब्बल, मणिशंकर अय्यर वा तत्सम लोकांनी कॉग्रेसची तशीच दुर्दशा केलेली आहे. तो पक्ष जनतेपासून दुरावला आहे. पण वाहिन्यांच्या चर्चेमध्ये त्यांचीच सरशी झालेली आपण बघू शकतो आणि त्याची किंमत पक्षाने संदर्भहीन होण्यातून मोजावी लागत असते.

ज्या पुस्तकी समाजवादाचे धडे नितीश यांनी कोवळ्या वयापासून गिरवलेले आहेत, त्यानुसार पवन वर्मांचे आग्रह चुकीचे नाहीत. पण आजच्या युगात तो समाजवाद निरूपयोगी ठरला आहे आणि जगभरातून हद्दपार होत चालला आहे. एकामागून एका देशात त्याची कबर खोदली गेली आहे. कारण त्या मार्गाने विद्यमान जगातले प्रश्न सुटण्याची सुतराम शक्यता उरलेली नाही. समाजवादी विचारसरणीला काळानुसार बदलणे वा सुधारणे शक्य झाले नाही. म्हणून तिला नामशेष होण्याची नामुष्की आलेली आहे. पण आपण त्यातली पुस्तके अधिक वाचली वा आत्मसात केलीत, म्हणून पवन वर्मा यांच्यासारखे लोक टेंभा मिरवित असतात. पण कुठल्याही पक्ष संघटनेसाठी असे लोक निव्वळ बांडगुळे असतात. कारण लोकशाहीत मते अगत्याची असतात आणि मते मिळवून देणारा नेता निर्णायक असतो. विचारधारा टाकावू नसते. विचारधारा काळानुसार उपयुक्त राखणे व लवचिक बनवून उपयोगात आणणे आवश्यक असते. पण पुस्तकी ज्ञानासाठी कर्मठ असलेल्यांना बदल आवडत नाही. ते आपल्या वैचारिक कोषातून बाहेर पडायला राजी नसतात. म्हणून कारत वा येच्युरी अशांनी मार्क्सवादी पक्षाचा बोजवारा उडवून दिला आहे. समाजवादी विचारधारेचे डझनावारी गटतट कुठल्या कुठे वळवळताना दिसतील. त्याच्या नेमकी उलट स्थिती भाजपाची दिसेल. मोदीयुगात भाजपाच्या वैचारिक चौकटीला संभाळून घेत नव्या नेतृत्वाने व्यवहारात आवश्यक असलेली लवचिकता दाखवलेली आहे. आपल्या विचारांचा मूळ गाभा वा आत्मा कायम राखून व्यवहारी कारभार चालविला आहे. त्याला मतदाराचा प्रतिसादही मिळत राहिला आहे. राजकारणात पडलात मग सत्तेला पर्याय नसतो आणि विचारांना व्यवहारी वस्त्रे चढवल्याशिवाय यशाच्या दिशेने पाऊल टाकता येत नाही. नितीशनी त्याच ‘वर्मा’वर बोट ठेवले आहे. पवन वर्मा यांना राज्यसभेचे सदस्यत्व हवे आहे, की वैचारिक स्पष्टता हवी; हा प्रश्न म्हणून अतिशय बोचरा तितकाच व्यवहारी सुद्धा आहे. नितीशसारख्या समाजवादी पिंडाच्या नेत्याने तो विचारावा, हे म्हणूनच कौतुकाचे आहे.