Your Own Digital Platform

एलफिन्स्टन महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकरांच्या तैलचित्राचे अनावरण

एल्फिन्स्टन महाविद्यालयात ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राच्या अनावरणाप्रसंगी ना.उदय सामंत, प्राचार्य डॉ.माधुरी कागलकर, रविंद्र बेडकिहाळ, कृष्णा शेवडीकर, डॉ.एम.एस.सगरे, विजय मांडके व मान्यवर.

राज्यशासनाच्यावतीने लवकरच मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचा आधुनिक प्रसारमाध्यम अभ्यासक्रम : ना.उदय सामंत

स्थैर्य, फलटण : ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तर एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय मराठी प्राध्यापक म्हणून आपल्या कार्याची मोहोर उमटवली. आज पत्रकारितेत अनेक आमूलाग्र बदल घडत आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आधुनिक प्रसारमाध्यम आणि तंत्रज्ञान असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पत्रकारिता अभ्यासक्रम राज्यशासनाच्या मार्फत एल्फिन्स्टन महाविद्यालयात लवकरच सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी केली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण व एलफिन्स्टन महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथील एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात समारंभपूर्वक संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.माधुरी कागलकर, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे महेश पावसकर, महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीचे माजी अध्यक्ष यदु जोशी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाळशास्त्री जांभेकरांचे पत्रकारितेबरोबरच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय होते. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील या सुपुत्राच्या तैलचित्राचे अनावरण आपल्या हस्ते आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच झाले ही बाब भाग्याची असल्याचे नमूद करुन आज शहरी व ग्रामीण पत्रकारांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. पत्रकारांच्या या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवून घेण्यासाठी पत्रकारांचे वकीलपत्र आपण आजपासून स्विकारतो, असेही ना.सामंत यांनी यावेळी सांगीतले.

ना.उदय सामंत पुढे म्हणाले, आपल्या मातृभाषेचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी त्यांचे फलक मराठीतूनच लावावेत, अशा सूचना देण्यात येणार आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना देशभक्ती सांगावी लागत नाही. ही देशभक्ती अशीच दृढ व्हावी यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी ना.सामंत यांनी स्पष्ट केले.

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, 1829 मध्ये बाळशास्त्री जांभेकर ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटी मुंबई’ येथे गणित अध्यापक होते. पुढे मार्च 1830 मध्ये ते डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी झाले. मार्च 1832 पासून ते पूर्णकाळ नेटिव्ह सेक्रेटरी झाले. नोव्हेंबर 1834 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल मुंबई टाऊन हॉल येथे असिस्टंट प्रोफेसर झाले. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते 1846 पर्यंत प्रोफेसर होते. तसेच पूर्वीच्या टाऊन हॉलमध्ये म्हणजे आताच्या सेंट्रल लायब्ररीमधील मुंबई एशियाटिक सोसायटीमध्ये संशोधक म्हणूनही त्यांनी 1841 ते 1846 पर्यंत काम केले. या कालावधीत त्यांनी या सोसायटीच्या जर्नल्समधून 90 निबंध भारतीय शिलालेख, ताम्रपट, नाणी यावर लिहिले आहेत. या जर्नल्समध्ये असे लेख प्रसिद्ध करणारे ते पहिलेच भारतीय संशोधक ठरले आहेत. त्यामुळे शासनाच्यावतीने एलफिन्स्टन महाविद्यालयाप्रमाणे आता रॉयल एशियाटिक सोसायटी, मुंबई व टाऊन हॉल मधील सेंट्रल लायब्ररी येथेही बाळशास्त्रींचे तैलचित्र सन्मानाने लावावे. तसेच त्यांच्या पत्रकारिता संशोधन व लिखाण यासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम तयार करुन मुंबईत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षण केंद्र व बाळशास्त्री जांभेकरांचे राष्ट्रीय स्मारक उभे करावे, अशी मागणी बेडकिहाळ यांनी यावेळी केली.

यदु जोशी म्हणाले, एलफिन्स्टन महाविद्यालयच एक मोठा इतिहास आहे. बाळशास्त्री जांभेकर या परिसरात वावरल्याने या महाविद्यालयाच्या वास्तूला त्यांचा स्पर्श झालेला आहे. पत्रकार सर्व समाजघटकांच्या समस्या माध्यमातून मांडत असतो पण त्यांच्या स्वत:च्या समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावे. ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान म्हणून दरमहा फक्त 11 हजार रुपये मिळतात, त्यामध्ये वाढ करुन किमान 15 हजार रुपये तरी करावी, असेही श्री. जोशी यांनी सांगितले.

दिलीप सपाटे म्हणाले, बाळशास्त्रींनी आपल्या अल्पआयुष्यात केलेले ऐतिहासिक कार्य जागृत करण्याचे काम या तैलचित्राच्या निमित्ताने झाले आहे. प्राध्यापक हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत असतात. मीडियातील बदलते विषय, आधुनिक पत्रकारितेतील तंत्रज्ञान असा सर्वसमावेशक नवीन अभ्यासक्रम तयार करुन या महाविद्यालयात सुरु करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ’मूकनायक’ च्या माध्यमातून शोषित, वंचितांच्या व्यथा मांडल्या. तसेच बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उभारण्याचा विचार करावा, असेही श्री. सपाटे यांनी सांगितले.

महेश पावसकर म्हणाले, बाळशास्त्रींचे कार्य विद्यार्थी दशेतच सर्वांना समजावे यासाठी शालेय क्रमिक पुस्तकात बाळशास्त्रींचा पाठ असावा. तसेच एल्फिन्स्टन महाविद्यालयातील बाळशास्त्रींचे योगदान लक्षात घेवून या महाविद्यालयाला बाळशास्त्रींचे नाव द्यावे.

प्राचार्य डॉ.माधुरी कागलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात, बाळशास्त्रींच्या तैलचित्राचे अनावरण हे एल्फिन्स्टन महाविद्यालयासाठी अभिमानास्पद व स्फूर्तीदायक असल्याचे सांगून याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीला धन्यवाद दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.बाळासाहेब खोमणे यांनी केले तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ.अतुल धाबळे यांनी मानले.

कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, नेहा पुरव, भारती विद्यापीठ, पुणेचे सहकार्यवाह डॉ.एम.एस.सगरे, डिजीटल सोशल मिडिया राज्य समितीच्या सदस्या श्रीमती विद्या म्हात्रे, ज्येष्ठ संपादक बाळकृष्ण वाणी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त सौ.अलका बेडकिहाळ, अमर शेंडे, रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे पदाधिकारी बापूराव जगताप, सुधीर अहिवळे, मयुर देशपांडे, प्रसन्न रुद्रभटे, विजय भिसे, एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने बाळशास्त्रींच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे उभारलेल्या स्मारकासाठी व पोंभुर्ले जन्मगावाच्या विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण भरीव योगदान देऊ, असे ना.उदय सामंत यांनी आवर्जून नमूद केले.

 एलफिन्स्टन महाविद्यालयात बाळशास्त्रींचे तैलचित्र लावून महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने ऐतिहासिक काम केले आह. आता ज्या सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. त्या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी आपण उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत रुपए दोन कोटीचा निधी देऊ. पण यामध्ये एलफिन्स्टनच्या यापूर्वीच्या नामवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे लावावीत. त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे ना.उदय सामंत यांनी सूचित केले.