Your Own Digital Platform

कॅमे-यामागचे जग


"अगोदर दोन वेळच्या भाकरीची सोय कर आणि मगच या क्षेत्रात ये ........


मी जी चूक केली ती तू अजिबात करू नकोस !"
 
अभिनय क्षेत्रातले माझे गुरू आणि सुप्रसिद्ध चित्रपट-नाट्य अभिनेते कै. यशवंत दत्त यांनी मला पोटतिडकीने सांगितले होते.
 
तरुणपणी इतर समवयीन कालावंतांप्रमाणे मलाही चित्रपटात काम करावेसे वाटायचे. पण त्यांनी त्या क्षेत्रातली दाहकता अचूक शब्दात दाखवून दिली होती.
 
एखादा तरुण चित्रपट, नाटकात काम मिळवण्यासाठी कै. विनय आपटे यांच्यासमोर उभा राहून सांगू लागला की "सर मी एक अभिनेता आहे, ......" त्याचे वाक्य अर्धवट तोडून ते म्हणत, "ते मी ठरवीन !" 

ऑडिशन घेऊन कलावंत निश्चित करण्याची एक विशिष्ठ पद्धत आहे पण काही वर्षांपूर्वीपर्यंत मात्र लोकांना हे फारसे माहीत नसायचे. 

त्यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या कार्यालयात "अमिताभ-रेखा" बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले अनेक तरुण-तरुणी खेटे घालायचे 

निर्माता प्रत्येकाला सांगायचा..... 

"मिलते रहो" अनेक वर्षे जायची पण तो कॅमे-याचा प्रकाश काही त्यांच्यावर पडायचा नाही.
 
परंतु आशा किती वाईट असते, नाही का ! कधीतरी आपण सुपरस्टार बनू या आशेपायी हे कलाकार आपल्या उमेदीच्या वयात वाट पाहून पाहून आयुष्याची माती करून घ्यायचे. अगदी लाखातून एखाद्याला संधी मिळायची, तीसुद्धा खुप काळ प्रयत्न केल्यावर अन अनेक ठिकाणचा नकार पचवल्यावर ! दसुरखुद्द अमिताभ यांनाही आवाज चांगला नाही म्हणून ऑल इंडिया रेडिओंने नाकारले होते म्हणे !
 
डोळस कलाकार कधीच या क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून राहत नाहीत.
 
अशोक सराफ, विजय कदम यांनी बँकेत नोकरी केली तर प्रशांत दामले बेस्ट मध्ये काम करत होते. मोहन जोशी यांचा स्वतःचा ट्रक होता. अनेक वर्षे तो व्यवसाय सांभाळून ते चित्रपट आणि नाटकात कामे करायचे.
कै राजा गोसावी यांच्या आयुष्यात तर भन्नाट प्रसंग आला होता. पुण्याच्या भानुविलास टॉकीज मध्ये जेंव्हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेंव्हा ते काय करत होते माहित आहे ? त्याच टॉकीज मध्ये तिकीटक्लार्क होते ! म्हणजे चित्रपटाचा हिरो आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकत होता.
 
हे जगातले एकमेव उदाहरण असावे !
 
राजा गोसावी यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की " या क्षेत्रात आम्हाला योगायोगाने पैसा मिळतो पण आम्ही तो भोगाभोगाने घालवतो !
 
" जेव्हा चलती असते तेंव्हा त्या पैशाचे महत्व कळत नाही आणि मिळणारी कामे कमी झाली की कलाकार भानावर येतात पण तेंव्हा फार उशीर झालेला असतो. गणपत पाटील यांची कथा तर अंगावर काटा आणणारी आहे.
 
तमाशापटांची सद्दी संपली तेंव्हा त्यांचे आयुष्य आणि करियर एकाचवेळी उतरणीला लागले होते.
अगदी दोन वेळच्या जेवणाला ते महाग झाले होते. शासनाने दिलेल्या तुटपुंज्या निवृत्तीवेतनाची रक्कमसुद्धा सरकारी बाबू त्यांना मिळू देत नव्हते. कोल्हापूर मुंबई बसप्रवासाचे पैसेही जवळ नसल्याने हा माणूस ट्रकच्या मागे हौद्यात बसून यायचा आणि ट्रकवाला जिथे उतरवेल तेथून चालत मंत्रालयापर्यंत जायचा. अखेर योगायोगाने अभिनेत्री नयना आपटे यांनी त्यांना मंत्रालयात पाहिले आणि त्या सरळ मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्या. आणि मग त्यांना ती रक्कम मिळू लागली. अशी असंख्य उदाहरणे आहेत. नुकतेच बलिकावधू मालिकेतल्या मुख्य अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे उदाहरण आपण पहिले आहे. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना स्वर्ग दोन बोटे उरला होता.
ते त्याकाळात सर्वाना सांगत सुटायचे की " मै इसकी छुट्टी कर दूंगा, उसकी छुट्टी कर दूंगा " अभिनेते प्राण यांनी त्यांना एकच गुरुमंत्र दिला होता की "बेटा, इस इंडस्ट्रीमे आना तो आसान है मगर टिकना बडा मुश्किल है । कही तुम्हारी छुट्टी न हो जाय ! " हा मंत्र त्यांनी लक्षात ठेवला आणि टिकून दाखवले.
 
सर्वसामान्य माणसाला या चित्रपट सृष्टीतले ग्लॅमर दिसते पण यातले कष्ट दिसत नाहीत. इतर कोणत्याही व्यवसायात आठ ते बारा तासांची ड्युटी असते पण इथे मात्र ते बंधन नाही. विशेषतः डेलीसोप च्या कलाकारांना झोपसुद्धा मिळत नाही. कारण रोजचे चित्रीकरण हे पार पाडावेच लागते. त्यामुळे त्यांना विश्रांती अशी मिळतच नाही. दीड वर्षांपूर्वी जय मल्हार या मालिकेत प्रधानाचे काम करणा-या तरुण कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. या क्षेत्राला इंडस्ट्रीला दर्जा नसल्यामुळे कायद्यातले कोणतेही नियम इथे लागू शकत नाहीत. पण तशाही परिस्थितीत लोक तिथे अखंड काम करतात. खूप कंटाळतात, चिडतात पण हे क्षेत्र सोडू शकत नाहीत. काम मिळवण्याचे टेन्शन, ते पूर्ण करण्याचे टेन्शन, दिग्दर्शक नाराज होऊन अचानक रिप्लेस तर करणार नाही याचे टेन्शन आणि केलेल्या कामाचे पैसे मिळतील कि नाही याचे टेन्शन...... अशा अनेक प्रकारची टेन्शन घेऊन हे लोक कसे जगात असतील याची कल्पनाही करता येत नाही आपल्याला ! मग ते कष्ट आणि ताण विसरण्यासाठी व्यसने जवळ करतात. पण व्यसनामुळे ताणातून मुक्तता तर होत नाहीच पण करियरची नौका डगमगायला लागते. सैगल यांचा किस्सा आहे, ते दारू प्याल्याशिवाय गाऊ शकत नसत. संगीतकार नौशाद यांनी त्यांना एक गाणे दिले पण दारू न पिता गाण्याची अट घातली. त्यांनी खूप आढेवेंढे घेतले पण नौशादजींसमोर त्यांचे काही चालले नाही. शेवटी नौशादजीनी दारुशिवाय त्यांना गायला लावले. सैगलजीचा स्वतःवर विश्वास बसेना ! ते नौशादजीना म्हणाले, "तुम्ही याआधी मला का नाही भेटलात ? " 

चित्रपट आणि नाट्य क्षेत्र म्हणजे उघडलेल्या पुस्तकासारखे असते. लोक तुमच्या व्यक्तिगत जीवनातही डोकावू शकतात. ते तुम्हाला आदर्श मानतात. ते लोक चुकीचे वागले किंवा चुकीचा संदेश देणा-या कलाकृती बनवल्या तर चुकीचा संदेश लोकांपर्यंत जातो त्यामुळे या क्षेत्रातल्या लोकांवर फार मोठी जवाबदारी येते. एखादा समाजसेवक आयुष्यभर खपून लोकांना जे शिकवू शकणार नाही ते एका चित्रपटातून दिग्दर्शक शिकवू शकतो. म्हणून आपण काय दाखवतो आहे याचा विचार या क्षेत्रातल्या मंडळींनी केलाच पाहिजे.
 
हे क्षेत्र बहूसंख्य कलावंतांना खुणावते, त्या दूथडी भरून वाहणा-या नदीत असंख्यजण उडी मारतात, काही पोहत पलीकडे जाऊ शकतात, काही मध्यावर पोहतात, काही उलटे पोहू शकतात, काही सावधपणे कडेकडेने पोहतात तर काही काठावरच संधीची वाट बघत उभे असतात. पण हे कधीच कोणाला कळत नाही की या चित्रपटसृष्टीमध्ये 'संजय दत्त' का चालतो आणि 'कमल हसन' का चालत नाही ? तरीसुद्धा या कॅमे-यामागच्या जगातले धोके लक्षात घेऊनही लोक आपले नशीब अजमावयाला घरदार सोडून इथे का येतात हे आपल्याला कळत नाही. चार्ली चॅप्लिनच्या लाईमलाइट या चित्रपटामधला प्रसंग फार बोलका आहे, चित्रपट सृष्टीतल्या झगमगाटापासून दूर फेकल्या गेलेल्या एका नटाला त्याची बायको विचारते, "अरे, त्या लोकांनी तुला दूर फेकून दिले, पण मग तू कडमडायला तिकडे जातोसच कशाला पुन्हा पुन्हा ? तुला घृणा नाही वाटत त्यांची ? " यावर तो उत्तरतो, " होय ग, मला खूप घृणा येते त्यांची ! पण काय करू मी ? मला रक्ताचीसुद्धा घृणा येते, परंतू तेच रक्त माझ्या शरीरातही वहात असते ! " 

रक्तातच असणारी ही ओढ रक्त थांबल्याशिवाय कशी संपणार ?
 
अभय देवरे.