आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

सुबोध भावेचा लाल्या पाहण्याची शेवटची संधी!स्थैर्य, सातारा : प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'अश्रूंची झाली फुले' हया सुप्रसिद्ध नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात ५१ प्रयोगांचे नियोजन करण्यात आले. ह्या मोजक्याच प्रयोगांपैकी पश्‍चिम महाराष्ट्रातील फक्‍त सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पहिले आणि शेवटचेच प्रयोग होत आहे! ह्या दोऱ्या अंतर्गत शुक्रवार १७ जानेवारीला रात्रो ९:३० वाजता श्री शाहू कलामंदिर, सातारा. शनिवार १८ जानेवारी रात्रो ९:३० वाजता भावे नाट्यमंदिर, सांगली आणि रविवार १९ जानेवारी दुपारी ४:३० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे प्रयोग होणार आहेत.
 
ह्या निमित्ताने नाटकाचे निर्माते आणि सुप्रसिध्द कलावंत सुबोध भावे बऱ्याच वर्षांनी रंगमंचावर येत आहे. प्रा वसंतराव कानेटकर, डॉं काशिनाथ घाणेकर आणि प्रभाकर पणशीकर ह्या दिग्गजांनी अश्रुला मराठी रंगभूमीच्या इतिहासात मानाचं पान मिळवून दिलं. मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासाचे ठेवा असलेलं हे नाटक नवीन पिठी पर्यंत पुन्हा पोहोचणं आवश्यक होतं. हयाच भावनेने ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिमा कुलकर्णी, नेपथ्यकार प्रदीप मुळये आणि सुबोध भावे ह्यांनी हे शिवधनुष्य पेलले.
 
'अश्रूंची झाली फुले' हे नाटक सर्वप्रथम नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६ मध्ये रंगमंचावर आणले होते. स्वत: पणशीकरांनी २००२ पर्यंत या सदाबहार नाटकाचे ११११ प्रयोग सादर करून ते अजरामर केले होते.
 
शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्यात प्रामाणिक माणसांची व शिक्षणाची होणारी गळचेपी हा ज्वलंत विषय मांडणारे हे नाटक आजच्या पिठीशीही नातं जोडतं. 

महाराष्ट्रातील राहिलेले मोजकेच प्रयोग करून हे नाटक अमेरिकेच्या दोऱ्यावर जात आहे आणि त्या नंतर ह्या नाटकाचे प्रयोग थांबणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील रसिकांनी ह्या नाटकाचा जरूर आस्वाद घ्यावा ही अपेक्षा सुबोध भावे ह्यांनी व्यक्‍त केली.
 
हे प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात होण्यासाठी नाशिकचे जयप्रकाश जातेगावकर यांनी पुढाकार घेऊन सदर प्रयोग सातारा, सांगली, कोल्हापूर येथे आयोजित केलेले आहेत. असे बाळू कदम, सातारा आणि गिरीश महाजन, कोल्हापूर यांनी सांगितले.