Your Own Digital Platform

फी भरली नसल्याने मुलांना परीक्षेपासून ठेवले वंचित


स्थैर्य, सातारा : येथील यादोगोपाळ पेठेतील जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेतील इयत्ता दुसरीतील काही विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नसल्याने त्यांना शिक्षिकांनी वर्गात उभे करत परीक्षेस बसू न दिल्याची संतापजनक घडली आहे. यासंदर्भात एक पालक शाळेत गेला असता फी भरल्याशिवाय मुलांना परीक्षेस बसू देणार नाही, असा अजब फतवा मुख्याध्यापिकेने पालकास सुनावल्याने पालकांमध्ये संतप्त भावना व्यक्त झाल्या आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, येथील जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेत दुसरीची घटक चाचणी सुरु आहे. दुसरीच्या तसेच इतर काही वर्गातील मुलामुलींनी शाळेची फी भरलेलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वर्गातील 10 ते 15 अशा सुमारे 50 ते 60 विद्यार्थ्यांना शिक्षिकांनी पेपरच दिला नाही. उलट त्यांना वर्गात फी भरली नाही म्हणून उभे करण्यात आल्याची माहिती पालकांनी दिली. याबाबत एका पालकास माहिती मिळाल्यानंतर ते शाळेत गेले.

त्यांनी संबंधित वर्गापाशी जावून शिक्षिकेस याबाबत विचारणा केली असता, शिक्षिकेने त्यांना मुख्याध्यापिका मंदा बोरणे यांच्याकडे नेले. तिथे मुख्याध्यापिका बोरणे यांनीही पालकाला मुलांनी शाळेची फी भरली नसल्याने त्यांना परीक्षा देता येणार नाही, असे निक्षून सांगितले. त्यावर पालकाने मुलींना तर मोफत शिक्षण आहे असे असताना तुम्ही असा प्रकार कसा करु शकता यावर त्यांनी आम्हाला अनुदान कमी असून फी भरल्याशिवाय मुलांना पेपरला बसू देणार नाही, असे सांगत तुम्हाला कोठे जायचे तिकडे जावा, असा सज्जड दम दिल्याची माहिती पालकाने दिली.दरम्यान, असा प्रकार जीवनज्योत हॉस्पिटलसमोर असलेल्या बालमनोहर विद्यालयात घडला असून तिथेही मुलांना शाळेची फी भरली नसल्याने घटक चाचणी परीक्षेपासून वंचित ठेवले असल्याची माहिती पालकाने दिली. याबाबत शिक्षण विभागाने तातडीने या प्रकाराची चौकशी करुन शासनाची मोफत शिक्षणाची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.