Your Own Digital Platform

ज्येष्ठ दर्पण पुरस्कार शामराव अहिवळे यांना जाहीरस्थैर्य, फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे महाराष्ट्र वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ज्येष्ठ संपादक दर्पण पुरस्कार दैनिक गंधवार्ताचे संपादक शामराव अहिवळे यांना जाहीर झाला असून, राज्यपातळीवर प्रतिष्ठित असणार्‍या दर्पण पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते 6 जानेवारी रोजी पोंभुरले येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली.
 
ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे यांनी सन 1984 मध्ये बारामती येथून प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक केकावली मध्ये कार्यकारी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. साप्ताहिक केकावली मध्ये अनिल साबळे व आजचे खासदार अमर साबळे हे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर शामराव अहिवळे यांनी, 1987 साली साप्ताहिक गंधवार्ता हे वृत्तपत्र फलटण येथून सुरू केले. तेव्हापासून आजतागायत गंधवार्ता वृत्तपत्र सातत्याने, यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. साप्ताहिक गंधवार्ताचे 1994 मध्ये दैनिकामध्ये रूपांतर केले. मागील 31 वर्षांपासून दैनिक गंधवार्ता मध्ये निर्भीड लिखाण करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम शामराव अहिवळे यांनी केले असून ते आजही सुरू आहे.
 
शामराव अहिवळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ, फलटण यांच्याकडून 2012 मध्ये आंबेडकरी चळवळीला दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच आंबेडकरी प्रजा परिषद यांच्या वतीने 2017 चा भीमस्फूर्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. जेष्ठ संपादक शामराव अहिवळे यांनी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या संचालक पदी तसेच सातारा जिल्हा वृत्तपत्र मालक मुद्रक संपादक संघटनेच्या उपाध्यक्षपदी काम केलेले आहे.
 
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे देण्यात येणारा राज्यपातळीवरील प्रतिष्ठित असताना ज्येष्ठ संपादक दर्पण पुरस्कार शामराव अहिवळे यांना जाहीर झाल्यानंतर सर्वस्त्रातून शामराव अहिवळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.