Your Own Digital Platform

शहापूरच्या दुरुस्तीने पश्चिम भागात कमी दाबाने पाणीस्थैर्य, सातारा : शहापूर योजनेच्या फिल्टरत झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी कोलमडला . बोगदा ते राजवाडा चौक व मंगळवार तळे परिसर गुजर आळी भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवली . मात्र पालिकेच्या टँकरची सेवा व्यवस्थित न मिळाल्याने नागरिक मेटाकुटीला आले.

शहापूर योजनेच्या उपसा पंप व शुध्दीकरण केंद्रांच्या फिल्टर चा तांत्रिक बिघाड झाल्याने शहापूर पाणी पुरवठा योजनेचा उपसा गेल्या दोन दिवसापासून मर्यादित करण्यात आला आहे . त्यामुळे बोगदा ते समर्थ मंदिर, धस कॉलनी, पापाभाई पत्रेवाले नगर ते ढोणे कॉलनी तेथून गुजर आळी ते फडके हॉस्पिटल व कोल्हटकर आळी या भागांना सकाळच्या सत्रातील पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरीकांच्या दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे . कास पाणीपुरवठा योजनेवर ताणं पडत असून खाणीच्या टाकीसह गणेश टाकी व कात्रेवाडा टाकीला लेव्हल मिळत नसल्याची अडचणं होत आहे . शहराच्या पश्चिम भागात पाण्याच्या टंचाईची ओरड सुरूच आहे .पालिकेच्या पदरी सध्या एकच नळकरी असल्याने त्या एकच कर्मचाऱ्याला कुठे कुठे पळवायचे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे . पाणी पुरवठा येत्या दोन दिवसात सुरळीत होईल असा कितीही दावा केला तरी गुजर आळीतल्या बहुतांश घरांना पाणीच मिळत नसल्याची तक्रार आहे . घंटेवारी करणारे कर्मचारी पाण्याची पातळी नीट तपासत नाही किंवा व्हॉल्व चालू करून खुशाल बेपत्ता होतात त्यामुळे काही भागाला खूप पाणी आणि काही भागात पाण्याचा दुष्काळ असे विरोधाभासाचे चित्र आहे.

 पालिकेचे टॅंकर टंचाईग्रस्त भागासाठी नगरसेवकांनाच उपलब्ध होत नाही तर नागरीकांच्या मागणीचा विषयच सोडा . यामुळेच साताऱ्यात उन्हाचा तडाखा हळूहळू वाढत असताना पाण्याची झळ सुद्धा नागरी पेठांना जाणवू लागली आहे . पाण्याचे टॅंकर शहरात इतरत्र जातात मात्र त्याची नोंदणी मात्र सोयीप्रमाणे होते असा आरोप काही मंडळीनी केला आहे .पालिकेची जुनी अग्नीशमनची गाडी पाण्याची गाडी झाली असून पाच हजार लीटरच्या टाकीला सुध्दा गळती लागली आहे . परिवहन कार्यालयातून संबधित ठिकाणी टॅंकरजाईपर्यंत शंभर ते दोनशे लीटर पाणी रस्त्यावर वाहून गेलेले असते . या टॅंकरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .