Your Own Digital Platform

कामगारांनी एकदिवसीय बंदमध्ये घेतला सहभाग

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी कराड पंचायत समितीसमोर जोरदार निदर्शने केली

सातारा : विविध मागण्यांसाठी कामगारांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला असून यात दहा केंद्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य सरकारी, केंद्रीय कर्मचारी संघटना विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटीत कामगारांनी एकदिवसीय बंदमध्ये सहभाग घेतला..
 
देशातील २० कोटी तर जिल्ह्यातील २८ हजार कर्मचारी सहभागी झाले असल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. सर्व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध व्यक्त केला. दरम्यान विविध कर्मचारी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवत, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी बुधवारी कराडमध्ये कराड पंचायत समितीसमोर जोरदार निदर्शने केली.राज्यातील ३० टक्के रिक्त असलेली पदे भरून नवीन पदांची निर्मिती करावी. डीसीपीएसमधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश द्यावेत. तसे आदेश सर्व विभागांनी निर्गमित करावेत. पाच दिवसांचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे. महिला कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करावी, यासह विविध १८ मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कराड पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले.
 
यावेळी सुमारे दीडशे कर्मचारी भारत बंदसह आजच्या पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी झाले होते. या बंदमुळे कराड पंचायत समितीमधील कामकाज ठप्प झाले. दरम्यान, भारत बंदला महसूल कर्मचारी महासंघ अन्य कराडकर नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कराडमधील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते.