Your Own Digital Platform

गोरे बंधूंवर गुन्हा दाखल


कुळकजाई येथील सोसायटीच्या ठरावावरून माणचे राजकारण पेटले 

स्थैर्य, सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून घुसण्यासाठी माण तालुक्यात मोठी राडेबाजी सुरू झाली असून भाजपचे आ. जयकुमार गोरे व शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळला आहे. कुळकजाई येथील सोसायटीच्या ठरावावरून दहिवडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून कृष्णराव शेडगे यांना धमकावून धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्या विरोधात तर सुरेखा बुधावले यांच्या पतीला ‘कुठे मारून टाकलं कळणारही नाही’ अशा शब्दात धमकावल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या ठरावाचा कार्यक्रम लागला आहे. यासाठी ठरावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक सोसायट्यांमध्ये ठरावावरून वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. राणंद येथे मारामारी झाल्यानंतर सोमवारी कुळकजाईतही राडा झाला. त्यावरून दहिवडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
 
सुनंदा शेडगे (रा. कुळकजाई, ता. माण) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुळकजाई विकास सेवा सोसायटीमध्ये सोमवारी ठराव प्रक्रिया पार पाडण्यासाठी सकाळी 10.30 वाजता सभा बोलावण्यात आली होती. माझे पती कृष्णराव गंगाराम शेडगे यांच्या नावाची चर्चा होऊन त्याला सर्व उपस्थित संचालकांनी संमती दर्शवली होती. यावेळी शेडगे हे कार्यालयाबाहेर होते. सोसायटीचे शिपाई संतोष पारसे हे त्यांना बोलावण्यासाठी बाहेर गेले. यानंतर शेडगे हे कार्यालयात येत असताना अचानक शेखर भगवानराव गोरे, (रा. बोराटवाडी), सुनील जाधव (पूर्ण नाव माहीत नाही), बशिर मुलाणी (रा. कुळकजाई), राजा जाधव (रा. पिंगळी खुर्द), अप्पा बुधावले (रा. कुळकजाई) यांच्यासह 20 ते 25 जण आत आले. या सर्वांनी सचिव संतोष इनामदार, चेअरमन जयवंत जगन्‍नाथ शिंदे, व्हा. चेअरमन शामराव पांडुरंग पवार यांना ठरावाची प्रक्रिया थांबवा मी सांगेल तोच ठराव करा, असे म्हणत तिघांना दमदाटी करत त्यांच्या गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मी गाडीजवळ जाऊन शेखर गोरे यांना आमची माणसं कुठं सुद्धा घेवून जायची नाहीत. तुम्ही माणसं सोडा नाहीतर मी इथच टकरा घेईन असे म्हणाले. असता शेखर गोरे यांनी मला धक्‍काबुक्‍की केली. शेडगे यांच्या तक्रारीवरून शेखर गोरे यांच्यासह सुनील जाधव, बशिर मुलाणी, राजा जाधव, अप्पा बुधावले यांच्यासह 20 ते 25 जणां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 
दुसरी तक्रार सुरेखा अप्पासो बुधावले (वय 36, रा. कुळकजाई) यांनी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 26 जानेवारी रोजी मध्यरात्री आ. जयकुमार गोरे (रा. बोराटवाडी), कृष्णराव गंगाराम शेडगे (रा. कुळकजाई), आनंदराव शिवराम पवार (रा. कळसकरवाडी), सत्यवान नाना कदम (रा. कुळकजाई) यांच्यासह 3 जण घरी आले. त्यांनी दरवाजा वाजवल्याने मला जाग आली. यानंतर मी दरवाजा उघडल्यानंतर आ. गोरे यांनी अप्पासो बुधावले हे त्यांच्या विरोधात काम करत असल्याच्या कारणावरून अप्पा कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर मी व माझ्या सासू-सासर्‍यांनी ते कामावर गेल्याचे सांगितले. यावर आ. गोरे यांनी अप्पाला समजावून सांगा तो माझ्याविरोधात गेला तर त्याला सुट्टी देणार नाही, अशी दमदाटी केली. त्यावर माझी सासू सुमन यांनी आ. गोरे यांना तुम्ही असं का बोलतायं माझ्या मुलानं तुमचं काय वाकड केलयं असे म्हणाल्या. त्यावेळी आ. गोरे यांनी पुन्हा तुम्ही अप्पाला समजावून नीट वागायला सांगा. त्याला कुठं मारून टाकलेलं कळून देणार नाही अशी धमकी दिली. त्यांच्यासोबत असणार्‍या लोकांनीही त्याला सोडायचं नाही, असे म्हणाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरेखा बुधावले यांच्या तक्रारीवरून आ. जयकुमार गोरे, कृष्णराव शेडगे, आनंदराव पवार, सत्यवान कदम यांच्यासह अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
 
दरम्यान, राणंदनंतर आता कुळकजाईत ठरावावरून राडा झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार झाल्यानंतर सोसायटी कार्यालय व दहिवडी पोलिस ठाण्यात आ. जयकुमार गोरे व शेखर गोरे या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.