Your Own Digital Platform

दातार - शेंदुरे स्कुलचे वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरेमहाराष्ट्र सह देशातील विविध सणांवर सामुहीक नृत्ये, एम. एच. 11 हॉर्न विसरा ची शपथ

 
स्थैर्य, सातारा : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दातार शेंदुरे इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंम्मेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
 
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आजोजित केलेल्या नर्सरी ते इयत्ता 4 थी च्या कार्यक्रमासाठी शाहुपुरी साताराच्या राष्ट्रसेविका समितीच्या सौ. अनघा अनंत जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून तर इयत्ता 5 वी ते 9 वी च्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा येथील उपप्रादेशिक परीवहन अधिकारी संजय राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष अनंत जोशी यांची उपस्थिती होती या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शबनम तरडे, वार्षिक स्नेहसंम्मेलनाच्या कार्याध्यक्षा सौ. मंजुषा राजेशिर्के, विद्यार्थी प्रतिनिधी अमन डांगे व कुमारी नेहा दलाल यांच प्रमुख उपस्थिती होती.
 
या स्नेहसंम्मेलनासाठी इयत्ता 4 थी पर्यंतच्या गटासाठी महाराष्ट्रातील सर्व सणांवर आधारीत नृत्ये असलेला महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम तर इयत्ता 5वी ते 9 वी साठी देशातील विविध राज्यातील लोकनृत्यांचे सादरीकरण असणारा भारतीय संस्कृती व भारतीय लोकनृत्ये कार्यक्रम संपन्न झाला.
 
प्रथम सत्रातील कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पारितोषिक वितरणाचे वाचन सौ. अनिता जाधव यांनी केले. शाळेच्या वार्षीक अहवालाचे वाचन प्रिती नलावडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ. शबनम तरडे यांनी करुन दिली.

उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सौ अनघा जोशी म्हणाल्या की वार्षिक स्नेहसंम्मेलन हा मोठा आनंद सोहळा असतो. आज साद झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध सण,सणांचे महत्व व त्यामागील परंपरा यांचे सुंदर दर्शन कलाकारांनी घडवले या नृत्यातुन सर्व विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार शाळा करत आहे.
 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ दिपाली वेल्हाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मंजुषा राजेशिर्के यांनी केले.
 
माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंम्मेलनात प्रमुख पाहुणे संजय राऊत यांनी एम एच 11 - आता हॉर्न विसरा असे लिहलेल्या बँडचे वाटप उपस्थितांना केले तसेच वाहतुकीच्या वेळी हॉर्न न वाजविण्याची शपथ सर्वांना दिली.
 
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की वाहतुक नियंत्रण व सुरक्षा या साठी पालकांनी काळजी घ्यावी तसेच आपल्या पाल्यांना या बाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. वाहतुकीचे कायदे किती कडक आहेत हे जाणून घ्या प्रदुषण मुक्त सातार्‍यासाठी हॉर्न न वाजविण्याची संकल्पना परिवहन विभागाने घेतली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 
अध्यक्षीय भाषणात अनंत जोशी यांनी शाळेने व संस्थेने वाहतुक नियंत्रणासंदर्भात अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. स्वताच्या क्षेत्रात जबाबदारीने कार्यकरणार्‍या व्यक्तींना शाळेतर्फे मार्गदर्शनासाठी बोलविले जाते. हा स्तुत्य उपक्रम आहे. शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वांचे सहकार्य हवे आहे.
 
या कार्यक्रमात घरचा वैद्य या हस्तलिखिताचे प्रकाशन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
 
समारंभात बालकलाकारांनी सादर केलेल्या विविध सामुहिक नृत्यांनी डोळ्याचे पारणे फेडले समारंभासाठी शिक्षक पालक संघाचे सदस्य, माता पालक संघाचे सदस्य, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.