Your Own Digital Platform

दीड कोटींच्या विमा रकमेच्या अमिषातून जीवलग मित्र तानाजी आवळे याचा निर्दयीपणे खून


सुमित मोरे हाच खरा मास्टरमाईंड; जेजुरीतून केली अटक

स्थैर्य, सातारा : बोधेवाडीनजिकच्या पिराच्या घाटात खून झालेली व्यक्ती ही सुमित मोरे नसून, तानाजी बाबा आवळे आहे. सुमित मोरे याने मास्टरमाईंड होत दीड कोटी रुपयांच्या विमा रकमेच्या अमिषातून आपला जीवलग मित्र तानाजी आवळे याचा अत्यंत निर्दयीपणे खून केला व मृत झालेली व्यक्ती ही सुमित मोरे आहे, हे लोकांना समजून यावे, यासाठी स्वत:ची मारुती कार देखील पेटवून दिली. पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा पर्दाफाश केला असून, सुमित मोरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला रितसर अटक करण्यात आली आहे.
 
सुमित मोरे हा अत्यंत हुशार आहे. मुंबईतील प्रोटीन व्यवसायात त्याला नुकसान झाले होते, त्यामुळे कर्ज देखील वाढले होते. या कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने आयसीआयसीआय बँकेकडून दीड कोटी रुपयांचा विमा उतरविला होता. स्वत:चा अपघाती मृत्यु घडवून विम्याचे पैसे मिळवून, मुंबईतून पलायन करण्याचा सुमित मोरे याचा विचार होता. त्यामुळे अपघाती मृत्यु घडविण्याच्या हेतूने तो सातत्याने दहिवडी परिसरात येत होता.
आपल्या काही खास आणि जवळच्या मित्रांना त्याने प्लॅन बोलून दाखविला, त्यामध्ये बराच खल झाल्यानंतर स्वत: सारखा हुबेहूब दिसणार्‍या व्यक्तीचा शोध सुमितने सुरु केला होता आणि त्याची नजर निढळ येथे टेलरिंग व्यवसाय शिकत असलेल्या उक्रिडे येथील तानाजी बाबा आवळे याच्यावर गेली. तानाजी हा मित्र असल्याने सुमितने त्याच्यासोबत सलगी वाढवली, त्याला सतत बरोबर घेऊ लागला. अखेरीस तानाजी याचा गेम करायचा, असे म्हणून सोमवारी त्याने तानाजीला अमिष दाखवून दहिवडीत बोलावून घेतले. आपल्याला गावाला जायचे आहे, असे सांगून त्याला बरोबर घेतले. त्यानंतर त्याच्या डोक्यात स्टंप मारुन, त्याला जागीच मारले. प्लॅनप्रमाणे पिराच्या घाटात त्याचा मृतदेह पेटवून दिला आणि स्वत:ची गाडी देखील पेटविली.
या गुन्ह्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर मोरे कुटुंबियांचे आणि त्यांच्या नातलगांचे वागणे काहीच बदलले नव्हते, त्यांच्या चेहर्‍यावर कोठेही दु:खाची छाया दिसत नव्हती. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत वेळकाढूपणा देखील पोलिसांनी ओळखला. दरम्यानच्या काळात रजेवर असलेले पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड हे घटनेचे गार्ंभीय ओळखून तात्काळ रुजू झाले. त्यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली. सपोनि स्वप्निल घोंगडे, विश्‍वजित घोडके, मोहन तलवार व पाटील यांच्यासह वेगवेगळ्या टीम तयार करुन तपासाला गती दिली. सुमित मोरे याच्या भावावर लक्ष केंद्रीत करण्यात आले, तो सातत्याने विसंगत माहिती देत असल्याने, त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला आणि त्याने घटनेची उकल केली.
 
जेजुरी, ता. पुरंदर येथे सुमित मोरे हा लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच, त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याला रितसर अटक करण्यात आली. अवघ्या चार दिवसात हा गुन्हा उघडकीस आणून दिडकोटी विम्याच्या पैस्यासाठी स्वता:च्याच खुनाचा बनाव करणाऱ्या सुमित मोरे याचे खरे रुप पोलीसांनी समाजाला दाखवून दिले आहे.
 
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि स्वप्निल घोंगडे, विश्‍वजित घोडके, मोहन तलवार व पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार घोरपडे, शंकर गुजर, हवालदार विलास यादव, नितीन भोसले, केंजळे, सचिन जगताप, तुषार आडके, उमेश गहीण, GB गंबरे, विजय खाडे, ज्ञानेश्‍वर यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
 
आवळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

तानाजी बाबा आवळे हा अत्यंत साधा माणूस होता. कोणाशी त्याची दुश्मनी नव्हती. कौटुंबिक कलहातून त्याची पत्नी मुलासह माहेरी निघून गेली होती. टेलरिंग व्यवसायाचे तो शिक्षण घेत होता. काही काळ महिमानगड येथे त्याने व्यवसाय केला, त्यानंतर तो निढळमध्ये गेला. सुमित मोरे याच्या नादी लागल्याने, त्याने स्वत:च्या हाताने मृत्यु ओढावून घेतला. विशेष म्हणजे तानाजी याच्या मृतदेहावर त्याच्याच उर्किडे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या आई-वडिलांसमोर त्याची चिता जळत असताना, त्यांना माहीत नव्हते की, त्यांच्या मुलाला अग्नि दिला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांना पोलिसांनी कसलीही कल्पना दिली नव्हती. केवळ आवळे कुटुंबियांना आणि आई-वडिलांना पुसेगाव पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. सपोनि विश्‍वजित घोडके व स्वप्निल घोंगडे यांनी त्यांना विश्‍वासात घेऊन सर्व माहिती दिल्यानंतर त्यांना रडू आवरता आले नाही.

 माण तालुक्याचे नेटवर्क कामी आले

वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली असली तरी तपासाचे केंद्र बिंदू हे पुसेगाव पोलीस ठाणे झाले होते. उपअधीक्षक सुहास गरुड यांनी दोन दिवस पुसेगावात ठाण मांडून यंत्रणा कामाला लावली होती. पुसेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले अनेक कर्मचाही हे माण तालुक्यातील आहेत किंबहुना त्यांच्यापैकी काही जणांनी माण तालुक्यात नोकरी केली आहे. त्यांचे नेटवर्क वापरुन सुमित मोरे याच्यापर्यंत पोलिसांना अवघ्या चारच दिवसात पोहोचता आले आहे. उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या अचूक कार्यपध्दतीमुळे अत्यंत कमी वेळेत हा गुन्हा उघडकीस आले आहे.