Your Own Digital Platform

भाजपचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही : संभाजी ब्रिगेडची धमकीस्थैर्य, मुंबई : 'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता चिघळलाय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजपला फैलावर घेतलंय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू झालंय. संभाजी ब्रिगेडे तर भाजपला धमकीच दिलीय. 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' हे वादग्रस्त दोन दिवसात मागे घ्या, अन्यथा राज्यात भाजपचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, अशा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिलाय. याच विषयावरून संघटनेनं लाल महाला शेजारी आंदोलनही सुरू केलंय. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे.
 
या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही 'आजके शिवाजी :नरेंद्र मोदी' या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
 
भाजपाच्या खोडसाळपणाचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी CAA आणि NRC च्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा भूमिका घेणारे, नोटबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणाऱ्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही. असंही ते म्हणाले.
 
कोल्हापूरात युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचे बिंदू चौकात दहन करण्यात आले. भाजपकडून समाजात तेढ निर्माण सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा भाजपला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा युवक काँग्रेसने दिला.
 
शिवसेनेच्या कोकणातल्या नेत्यानी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करीत आज के शिवाजी या वादग्रस्त पुस्तकाचा निषेध केला. यात सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राउत, आमदार दीपक केसरकर आमदार वैभव नाईक सहभागी झाले. शिवाजी महाराजांची तुलना स्वत:शी करुन घेणे म्हणजे पोरकटपणा आहे आणि ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागून राजकारण केलं त्यांनी अशा पुस्तकाचं प्रकाशन करण हे निंदनीय असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.