Your Own Digital Platform

खुनाच्या गुन्ह्यातील एकासह दोघांकडून गावठी पिस्तूल जप्त


स्थैर्य, सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यातील सुटलेल्या एका इसमासह इतर दोन इसमांकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी नीलेश उर्फ गोट्या संजय सोनावणे, रा. वरची आळी, सिध्दनाथवाडी, ता. वाई, मोहंमद शोयब खलील मोमीन, रा. फुलेनगर, वाई व विकास उर्फ लाल्या अनिल जाधव, रा. बावधन, ता. वाई यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत दोन इसम पांढर्‍या रंगाची अ‍ॅक्टिव्हा (एम एच 12 बी. टी. 8361) वरुन वाई येथील फुलेनगर मशिदीजवळ गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ त्यांनी सापळा लावला. दोन इसम मोटरसायकलवरुन येताना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांना शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता एका इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व दुसर्‍या इसमाकडे दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
 
अधिक चौकशी केली असता त्यांचा अन्य साथीदार शहाबाग फाटा येथे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला देखील पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता संशयित इसम हा खंडाळा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाच्या गुह्यातील आरोपी असून त्या गुन्ह्यातून तो सुटलेला आहे. तिन्ही संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत राउंड, मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 1 लाख 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस नरीक्षक डॉ. सागर वाघ, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, जोतिराम बर्गे, पोलीस हवालदार तानाजी माने, विनोद गायकवाड, बबन पवार, पोलीस नाईक मोहन नाचण, योगेश पोळ, अजित कर्णे, धीरज महाडिक, विशाल पवार, मयूर देशमुख, वैभव सावंत, संजय जाधव यांनी सहभाग घेतला.