Your Own Digital Platform

सुशांत निंबाळकर व अमोल खराडे यांच्या नियुक्त्या होणार रद्दकृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा मंत्रिमंडळ निर्णय 

स्थैर्य, फलटण : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील यासंदर्भातील तरतूद देखील वगळण्याचा निर्णय घेण्यात आला ह्या निर्णयामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुशांत निंबाळकर व रासपचे नेते अमोल खराडे यांच्या झालेल्या नियुक्त्या रद्द होणार असल्याबाबतचे तर्क सध्या वर्तवले जात आहेत.
 
या अधिनियमानुसार 13 जून 2015 पासून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्यांसाठी तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय लक्षात घेऊन आतापर्यंत केलेल्या नियुक्त्या प्रकरणपरत्वे रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.