Your Own Digital Platform

सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना लाभार्थ्यांची वाट न पाहता त्यांच्या पर्यंत पोहचवा - राज्यमंत्री बच्चू कडू


स्थैर्य, सातारा : महिला व बालविकास विभागाच्या योजना सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत, या योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवा, लाभार्थ्यांच्या अर्जाची वाट न पाहता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचा, अशा सूचना महिला व बालविकास, शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याणराज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज केल्या.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाची पूणे आढावा बैठक राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, शिक्षणाधिकारी प्राथमिक राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रभावती कोळेकर, महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह महिला व बालविकास विभागातील, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

त्या शेतकरी महिलांवर कुटूंब अवलंबून आहे, अशा शेतकरी महिलांची माहिती एकत्र तयार करावी. त्यांच्यासाठी एखादी योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. महिला व बालविकास विभागाकडे व शिक्षण विभागाकडे तक्रारींचा अर्ज आला त्याचा तात्काळ निपटारा करा व निपटाऱ्याची प्रत संबंधितांना द्या,अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.

सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा. हा कायदा सर्वसामान्यांबरोबर शासकीय अधिकाऱ्यांसाठी आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे. ज्या अनाथ मुलांना जात,धर्म, पंथ माहित नाही, अशांची व जे अनाथ मुले नातेवाईकांकडे राहतात याची एकत्र आकडेवारी द्या. बालसंगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे सांगून श्री. कडू पुढे म्हणाले, या योजनेंतर्गत प्रभावी लाभ देण्यासाठी ज्या विधवा महिलांची मुले या योजनेंतर्गत येतात, त्यांची माहिती अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांना संकलित करण्यासाठी सांगावे. यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास विभागाला त्यांनी केल्या.

बैठकीच्या प्रसंगी श्री. हिवराळे संगणकीय सादरीकरणाद्वारे महिला व बालविकास विभागाकडील विकास योजनांची माहिती दिली.