Your Own Digital Platform

सह्याद्री कारखाना निवडणूक : बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करताना ना. बाळासाहेब पाटील. शेजारी सुनील माने, प्रणव ताटे व इतर.

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरूवारी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवसाअखेर 87 अर्जाची विक्री झाली तर 21 जणांनी अर्ज दाखल झाले आहेत.
 
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक मनोहर माळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पं.स. सभापती प्रणव ताटे, नंदकुमार बटाणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
सह्याद्री सह. साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार, दि. 6 जानेवारी पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली. दि. 10 पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. कारखान्याच्या संचालक मंडळात कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली तसेच महिला राखीव, अनुसुचित जाती/जमाती, भटक्या जाती/विमुक्त/प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग अशा दहा गटातून एकूण 21 सदस्य आहेत.
 
गुरूवारी कराड गटातून जयवंत जगन्नाथ पाटील, जयदीप जालिंदर यादव, युवराज विठ्ठल सावंत, शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, जशराज शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी तर तळबीड गटातून संपत राघू घाडगे व हिंदूराव केसू चव्हाण यांनी अर्ज दाखल केले. कोपर्डे हवेली गटातून अर्जुन कृष्णा माने, निवास प्रतापराव चव्हाण, आनंदराव उत्तम चव्हाण यांनी अर्ज दाखल केले.

मसूर गटातून प्रल्हाद भार्गव सुर्यवंशी, साहेबराव पांडुरंग साळुंखे, मानसिंगराव वसंतराव जगदाळे, संतोष शिदोजीराव घार्गे यांनी तर वाठार किरोली गटातून शिवाजी विश्‍वासराव घाडगे, शिवाजी पंढरीनाथ साळुंखे, विठ्ठलराव सर्जेराव घोरपडे, दिलीप बाबासो मोरे यांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती जमाती गटातून जयवंत संपतराव थोरात व पुरूषोत्तम शंकर बनसोडे यांनी असे एकूण 21 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार, दि. 10 रोजीपर्यंत आहे. आतापर्यंत एकूण 136 अर्जांची विक्री झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.