Your Own Digital Platform

सातारा जिल्हा बँकेमार्फत शेतकरी मंडळांना दैनिक अॅग्रोवनचे वितरण


स्थैर्य, सातारा : आदर्शवत कामकाजामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात देशपातळीवर अग्रेसर असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सातत्यपूर्ण उत्कृष्ठ कामगिरी करत देशातील इतर सहकारी बँकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
 
जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना आधुनिक शेतीचे तंत्र, शेती उत्पादन वाढ व निर्यातीच्या दृष्टीने मार्गदर्शन व उत्पादन वाढीस चालना मिळणेकरिता जिल्हा बँकेच्या माध्यमातून स्थापन केलेल्या ३०० शेतकरी मंडळांकरिता दैनिक अॅग्रोवन सुरु करणेत आले आहे. बँकेचे अध्यक्ष मा .आ .श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते अॅग्रोवनचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. संभाजी घोरपडे, सहयोगी संपादक श्री . राजेश सोळस्कर, शाखा व्यवस्थापक श्री. राजेश निंबाळकर, श्री. विकास जाधव यांचेकडे सदर दैनिकाचे वार्षिक वर्गणीपोटी रक्कम रु. २१८२५०/ चा धनादेश सुपूर्त करणेत आला.
 
यावेळी बँकेचे अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, जिल्हा बँक सर्वसामान्य शेतक-यांचे हितासाठी नवनवीन प्रभावी योजना राबवित असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती करून दिली जात आहे. याचबरोबर दैनिक अॅग्रोवन मधून शेतीबाबत विविध मान्यवरांचे लेख, प्रगतशील व तज्ञ शेतक-यांचे अनुभव मिळत असलेने नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक शेतीविषयक माहिती आत्मसात होणेस मोठी मदत होणार आहे . सदर अंक जिल्हयातील उत्कृष्ठ कार्य करणा-या ३०० शेतकरी मंडळांसाठी बँकेमार्फत उपलब्ध करून दिला जाणार असलेचे त्यांनी सांगितले.

संचालक श्री. प्रकाश बडेकर म्हणाले, बँक नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सभासदांचे हिताचे निर्णय घेत असते. त्याचबरोबर बँकेच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये बँकेस यश मिळाले आहे . बँकेमार्फत शेती तंत्रज्ञान व परिपूर्ण माहितीसाठी तसेच शेतकरी सभासदांना आधुनिक शेतीचे तंत्र खेडोपाडयांमध्ये पोहचविणेकरीता दैनिक अॅग्रोवन उपयुक्त आहे.
 
या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर . एन . सरकाळे यांनी आधुनिक शेतीचा प्रसार, उत्पादन वाढ व बँकेच्या विविध योजनांचा प्रसार व प्रचार होणेचे दृष्टीने नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली बँकेने जिल्हयामध्ये ६३६ शेतकरी मंडळांची स्थापना केली आहे . सामाजिक बांधीलकिच्या दृष्टिकोनातून मागील ५ वर्षापासून आपल्या नफ्यातून उत्कृष्ट कार्य करणा-या 300 शेतकरी मंडळासाठी प्रत्येकी एकूण रक्कम रुपये ८४९६६/- अशी एकूण रक्कम रु.२५४.९० लाख निरंतर ठेव योजनेमध्ये गुंतवली आहे. या ठेवीतून प्रत्येक शेतकरी मंडळांना वार्षिक रु ७२२२/- व्याज मिळत आहे. या व्याजातून सदर शेतकरी मंडळांनी त्यांचा व्यवस्थापन खर्च, कृषिविषयक कार्यक्रम, चर्चासत्रे तसेच शेतीविषयक दैनिक, सप्ताहिके, पुस्तके इत्यादी माध्यमातून आधुनिक शेतीचा प्रसार, उत्पादन वाढ व निर्यातीच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळत आहे. दैनंदिन बँकिंग कामकाज करत असताना जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांना शेती तंत्रज्ञानातील नवनवीन माहिती उपलब्ध होणेकरीता तसेच शेतीविषयक घडामोडी जाणून घेणेकरिता महाराष्ट्रातील दैनिक अॅग्रोवन वर्तमानपत्र प्रभावी मध्यम आहे.
 
यावेळी अॅग्रोवनचे संपादक श्री. संभाजी घोरपडे यांनी बँक राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व दैनिक अॅग्रोवन सुरू करीत असलेल्या या उपक्रमाची प्रसंशा केली .
 
यावेळी बँकेचे संचालक श्री. दत्तात्रय ढमाळ, श्री. प्रदिप विधाते, बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे तसेच विविध विभागांचे व्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते .