Your Own Digital Platform

संघर्षाशी कडवी झुंज देणारे: सुभाष भांबुरे


अत्यंत प्रतिकुल आर्थिक परिस्थितीतून सुभाष भांबुरे यांनी कलाशाखेतील पदवी पदविका, विधी शाखेचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम, पत्रकारिता पदवी प्राप्त केली. विविध छोट्या व्यसायांबरोबर क्रिडाक्षेत्रातही त्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये बास्केट बॉल, मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट यामध्ये प्राविण्य मिळवले. त्याचवेळी साहित्य क्षेत्रातील ज्ञानही त्यांनी अवगत केले. मुधोजी महाविद्यालयामधील त्याकाळी अत्यंत खर्चिक अशा विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूकांमध्ये एकही पैसा खर्च न करता निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळविला.

लहानपणापासून स्वावलंबनाची सवय

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बालपणापासूनच विविध बिगर भांडवली व्यवसायांचे धडे अंगवळणी करुन विविध वस्तुंची घरपोच सेवा देत स्वावलंबी जीवन पद्धतीचा अवलंब त्यांनी पहिल्या पासूनच केला. शिक्षणाचा खर्च स्वत:च्या कमाईतून केल्याने त्यांना उच्च शिक्षण घेता आले. वयाच्या 12 व्या वर्षापासून यात्रा कंपनीमध्ये प्रवाशांच्या बॅगा उचलणे, साहित्य उचलणे अन्य कामे प्रामाणिकपणे करणे अशा कष्टाळू प्रवृत्तीतून कामे करीत असताना देखील शिक्षणापासून ते कधी दूर गेले नाहीत.

श्रीहरी ट्रॅव्हल्सची सुरुवात

नामांकित यात्रा कंपनी म्हणून सुभाष भांबुरे यांच्या श्रीहरी ट्रॅव्हल्सचे नाव आज घेतले जाते. गेली 20 वर्षे ते या व्यवसायात अग्रेसर असून यात्रेकरुंची आपुलकीने सेवा करणे, धार्मिक सहलींचे सुंदर नेटकेपणाने नियोजन व संयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. धार्मिक, प्रेक्षणीय सहलींबरोबरच केंद्र व राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात येणार्‍या प्रशिक्षण सहलींमध्ये अभ्यासपूर्ण रितीने ते प्रशिक्षणार्थ्यांना योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 6 ते 7 वर्षांच्या कालावधीमध्ये अभ्यास दौर्‍यांच्या जवळपास 125 शासकीय सहलींचे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजन केले आहे.

ट्रॅव्हल्ससोबत केटरिंग आणि ड्रेपरीही

यात्रा कंपनीच्या मुख्य व्यवसायाबरोबरच त्यांनी श्रीहरी केटरर्स म्हणून व्यवसायामध्ये पदार्पण करुन अनेक गरीब कुटुंबाच्या हाताला काम दिले. आज या व्यवसायामध्येही एक नामांकित केटरर म्हणून त्यांनी नाव कमाविले असून या माध्यमातून लग्न समारंभ व इतर छोटे मोठे मंगल कार्यक्रम यशस्वी करुन देणे हे त्यांचे ध्येय असते. उत्कृष्ठ नियोजन, स्वादिष्ट आणि सुंदर जेवण देण्याचा त्यांंचा नेहमीच प्रयत्न असतो. श्रीहरी ट्रॅव्हल्स आणि केटरर्सच्या माध्यमातून योग्य सेवा देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. श्रीहरी ट्रॅव्हल्स आणि केटरर्सच्या माध्यमातुन त्यांनी अनेकांच्या हाताला काम दिले आहे.

शालेय जीवनापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग ते घेत असत या पार्श्वभुमीवरच फलटण सारख्या ग्रामीण भागात सांस्कृतीक सेवा करता यावी या उद्देशाने त्यांनी श्रीहरी ड्रेपरी विभाग निर्माण करुन तो नावारुपाला आणला आहे.

समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन

सर्व व्यावसायीक भूमिका प्रामाणिकपणे बजावीत असताना बालवयापासून अंगी असणार्‍या समाजसेवेचे व्रत त्यांनी कधी सोडले नाही. संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदीर ट्रस्ट या जुन्या 119 वर्षाच्या ट्रस्टमध्ये संचालक म्हणून त्यांनी सामाजिक सेवा केली. ट्रस्टच्या जीर्णोद्धार कामी 18 लाख रुपयांचे बांधकाम उभारुन या मंदिराचा कायापालट करण्यात सुभाष भांबुरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी कार्यरत असताना धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, वधूवर मेळावा असे विविध सामााजिक उपक्रम राबविले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये विठ्ठल मंदीर ट्रस्ट, हायकोर्ट वकील अ‍ॅड विश्वनाथ टाळकुटे, माउली चॅरीटेबल ट्रस्ट (मुंबई) यांच्या माध्यमातुन अत्यंत भरघोस असा प्रतिसाद लाभलेल्या अपंगाचे शिबीर यशस्वी करण्यामध्येही त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. या शिबीरामध्ये 300 अपंगांना लाखो रुपये किंमतीचे विविध साहित्य, जयपूर फुटस मोफत देण्यात आले होते.

पत्रकारितेतही वेगळे स्थान

युवाशक्ती, युवामित्र तरुण मंडळाची स्थापना त्यातून विद्यार्थी व युवकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या होत्या. प्रत्येक युवकास व्यवसायाभिमुख करणे त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे या सर्व बाबी करत असताना सामाजिक सेवेच्या अंगभुत गुणांमुळे पत्रकारीतेचे क्षेत्र त्यांनी स्विकारले या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यातील विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली त्यातून अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागले. पत्रकारीता क्षेत्रातील अनेक तरुणांना मार्गदर्शन व सहकार्य करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यांनी घडविलेले नवीन पत्रकार आज विविध वृत्तपत्रामधून उत्तम प्रकारे काम करीत आहेत.

शिवसंदेशकार कॉ. हरीभाउ निंबाळकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुका पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन करुन कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता सर्व कार्यक्रमांचे नियोजन करुन व देण्याचे काम सुभाष भांबुरे यांनी केले, आजही ते करत आहेत. पत्रकारांचे प्रशिक्षण शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, संगणक प्रशिक्षण शिबीर, आदी विधायक कार्यक्रम त्यांनी पार पाडले आहेत. कोणत्याही मान अपमानाची तमा न बाळगता पत्रकारीतेच्या क्षेत्रात त्यांनी यशस्वी वाटचाल केली आहे.

हरिभाउ निंबाळकर स्मृती चषक सामन्यांचे आयोजन

भांबुरे यांच्या कल्पनेतुन कॉ. हरिभाउ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करुन सातत्याने संपर्कात असणार्‍या राजकीय नेते, पोलिस, पत्रकार, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक कारखाना, नगरपरिषद , तहशील कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आगळ्या वेगळ्या स्पर्धा घेउन त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळा आनंद प्राप्त करुन दिला. दुसर्‍याला मोठेपणा देण्यात आपला मोठेपणा असल्याची भावना उराशी बाळगून फलटण शहरातील विविध स्तरातील व्यक्तींशी सुसंवाद साधणारे व्यक्तिमत्व म्हणून आज भांबुरे यांच्याकडे पाहिले जाते.

सौ. वसुधा वहिनींचा मोलाचा वाटा

देशातील महापुरुषांपासून ते सर्वसामान्यांपर्यंतच्या समाजोपयोगी कार्यात स्त्रियांचा महत्वपूर्ण वाटा असल्याची अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानावरुन आढळतात. याला पत्रकार सुभाष भांबुरे याच्या पत्नी सौ. वसुधा याही याला अपवाद नाहीत. खरे तर भांबुरे यांच्या प्रत्येक क्रियाशील उपक्रमात सौ. वसुधा यांचा सिंहाचा वाटा आहे. कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणार्‍या स्त्रियाच्या मालिकेत सौ. वसुधा भांबुरे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल.

परिस्थितीचे वास्तव लक्षात घेउन सुभाष भांबुरे आपल्या बुद्धी कौशल्यातुन पत्रकारितेत जमिनीवर पाय ठेवून संघर्षाशी कडवी झुंज देत काम करण्यात यशस्वी होत आहेत. शहरातील सर्वच राजकारण्यांशी त्यांचे आपुलकीचे नाते असल्याचे अनेक उदाहरणांनी सिद्ध केले आहे. गरीबीतून वाढलेल्या उच्च शिक्षीत सुसंस्कारीत जबाबदारीने विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आमच्या परममित्रास वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाच्यावतीने हार्दिक शुभेच्छा!