Your Own Digital Platform

लोकशाहीचा केंद्रबिंदू मतदार ; लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक युवतींनी मतदार नोंदणी करावी - जिल्हाधिकारी शेखर सिंह


स्थैर्य, सातारा : जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला आणखीन बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले.

25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, संगिता चौगुले, तहसीलदार आशा होळकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश चव्हाण, प्राचार्य के.जी. कानडे, लेखिका सोनाली नवांगुळ आदी उपस्थित होते.

भारत हा पहिलाच देश आहे की स्वातंत्र्यानंतर सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, लोकसभा व विधानसभा मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे म्हणून सुट्टी जाहीर करण्यात येते. परंतु अनेक मतदार सुट्टी असूनही मतदान करत नाही. घटनेने आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार मुलभूत असून मतदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

ज्या युवकांना 18 वर्ष पूर्ण झाले आहेत अशा युवकांनी लवकरात लवकर मतदार नोंदणी करावी. यासाठी अर्ज क्र.6 ऑनलाईन पद्धतीने भरावा. बीएलओ आपल्या घरी येऊन तपासणी करतील. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करुन आपली लोकशाही आणखी बळकट करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर‍ सिंह यांनी केले.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सुट्टी असूनही अनेक मतदार मतदानाचा हक्क बजावत नाही, ही मानसिकता बदलली पाहिजे. युवकांनीही निवडणूक प्रक्रियेत मोठा सहभाग नोंदविला पाहिजे. मतदान करणे आपला अधिकाराबरोबर आपले कर्तव्य आहे. ज्या युवकांनी मतदार नोंदणी केली नसेल अशा युवकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करुन लोकसभेची पोट निवडणूक व विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या ह्या निवडणूक निर्भय आणि शांततेत पार पडल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले.

प्रत्येक गोष्टीला कायदा असतो घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हा अधिकाराबरोबरच आपले कर्तव्य असून लोकशाहीच्या बळकटीसाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर यांनी केले.

18 वर्ष पूर्ण होत आहेत अशा युवकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी सांगितले. यावेळी लेखिका सोनाली नवांगुळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्र वाटपाबरोबर निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.मतदार दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अशी प्रभात फेरीचे आयोजित केली. या प्रभात फेरीला प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी हिरवी झेंडा दाखवून मार्गस्त केले.