Your Own Digital Platform

साताऱ्यात पोलीस दलाचा रेझिंग डे उत्साहात साजरा शस्त्र प्रदर्शनासह सायबर गुन्ह्यांची दिली माहिती


स्थैर्य, सातारा : महाराष्ट्र पोलीस २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२० दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्र पोलिसांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज मंगळवारी शस्त्र प्रदर्शनासह विविध गुन्ह्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

सातारा पोलीस देखील पोलीस ठाण्याच्या स्तरावर २ तारखेपासूनच शस्त्र प्रदर्शन, विविध स्पर्धा, सायबर गुन्हे विषयी माहिती, विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन भेट या प्रकारचे कार्यक्रम राबवत आहेत.

सातारा पोलीस मुख्यालयातर्फे शहरातील विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर आबाल वृद्धांसाठी आज मंगळवारी हजेरी माळ मैदान या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पोलीस परेड पोलीस दलातील नियमित घेतला जाणारा कार्यक्रम आहे मात्र नागरिकांना तो क्वचितच पाहायला मिळतो. आजची परेड मात्र सर्व नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आलेली होती. तदनंतर शस्त्रप्रदर्शन, वाहतूक नियमांविषयी तसेच वाहतूक पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या उपकरणाविषयी, निर्भया पथकाच्या कामकाजाविषयी, पोलीस ठाण्याच्या कामकाजाविषयी, सायबर पोलीस ठाण्याविषयी माहिती, पोलिस मुख्यालयाविषयी,पोलीस सेल्फी पॉइंट विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी जांभळाच्या किल्ल्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पोलिसांबद्दल समज गैरसमज दूर होतील : तेजस्वी सातपुते
समाजात पोलिसांविषयी अनेक समज गैरसमज असतात त्यापार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांचा रेझिंग डे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांचे जनतेसोबत नाते दृढ करण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
त्यापुढे म्हणाल्या आज या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देण्याबरोबर गुन्ह्याचा तपास कसा केला जातो याची माहिती देण्यात आली. या उपक्रमातून पोलीस आपले मित्र आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पोलिसांच्या पाल्यांसह अन्य पाल्यांसाठी रिलायन्सने बॉक्सिंग साठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे या खेळातील दोन मुलांची खेलो इंडिया साठी निवड झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.