Your Own Digital Platform

सज्जनगडावर दासनवमीनिमित्त समर्थ सेवा मंडळाचे विविध कार्यक्रमपं.उपेंद्र भट, पं.जयतीर्थ मेवुंडी, पं.शौनक अभिषेकी, सौ.आरती अंकलीकर यांची गायनसेवा दासबोध वाचनासह प्रवचन, किर्तनांचे आयोजन


स्थैर्य, सातारा : श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळाचेवतीने समर्थांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात दासनवमी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे दि. 10 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2020 या कालावधीत संपन्न होत आहे. यावर्षी साजर्‍या होणार्‍या दासनवमी महोत्सवात भक्त निवासात 10 दिवस अनेक मान्यवरांची किर्तने, प्रवचन व गायन सेवा संपन्न होणार आहे.

महोत्सव काळामध्ये होणारे विशेष कार्यक्रम पुढीलप्रमाणे सोमवार दि.10 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2020 दरम्यान रोज सकाळी 8 ते 10.30 या वेळेत नितीनबुवा रामदासी व सौ. रसिकाताई ताम्हणकर यांचे मार्गदर्शंनाखाली दासबोध वाचन, दि.10 व 11 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत डॉ. अजित कुलकर्णी व दि.12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यत ह.भ.प. गुरुनाथ महाराज कोटणीस यांची प्रवचने होणार आहेत. दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 पर्यत दररोेज दासनवमी अखेर समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. संगीत महोत्सवात सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पुणे येथील पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य पं.उपेंद्र भट यांचे भक्ती संगीत हा गायन कार्यक्रम होणार असून त्यांना साथ संगत तबल्यावर राजगोपाळ गोसावी व पखवाज गणेश चाकणकर व संवादिनी साथ सुनिल पाटील हे करणार आहेत. मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पं.जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन व भक्ती संगीत होणार असून त्यांना साथ संगत तबल्यावर श्री.नरहरी व संवादीनी साथ आदिती गराडे हे करणार आहेत. बुधवार दि.12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पुणे येथील पं.विजय कोपरकर यांचे शास्तीय गायन होणार असून त्यांना साथ संगत विवेक भालेराव व राहुल गोळे हे करणार आहेत. गुरुवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पुणे येथील बालगंधर्व संगीत रसीक मंडळाच्या बकुल पंडित, सुरेख साखवळकर व सहकलाकारांचे भक्ती संगीत गायन होणार असून त्यांना साथ संगत तबल्यावर केदार कुलकर्णी पखवाज वर प्रसाद भांडवलकर व संवादीनी साथ संजय गोगटे हे करणार आहेत.शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पं.शौनक अभिषेकी यांचे गायन होणार असून त्यांना साथ सुभाष कामत व उदय कुलकर्णी करणार आहेत. शनिवार दि. 15 रोजी सायंकाळी 7 वाजता अ‍ॅड. अमित द्रविड यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार असून त्यांना तबला साथ भानुदास ओतारी व संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण करणार आहेत. गायन महोत्सवाची सांगता रविवार दि. 16 रोजी सायंकाळी 7 वाजता सुप्रसिध्द गायीका सौ.आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायनाने होणार असून त्यांना साथ संगत तबल्यावर विजय खांडलकर पखवाज साथ प्रसाद भांडवलकर व संवादीनी साथ लिलाधर चक्रदेव हे करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना टाळाची साथ सुरेश कुलकर्णी हे करणार आहेत.
 
दासनवमी महोत्सवाची सांगता सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी दासबोध वाचन, कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. या सर्व कार्यक्रम समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष अ‍ॅड.डॉ.डी.व्ही. देशपांडे , कार्यंवाह योगेशबुवा पुरोहित रामदासी व कोषाध्यक्ष समर्थ भक्त अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी यांनी केले आहे.