Your Own Digital Platform

अपघात विमा सहाय्यता निधी प्रवांशांच्याच बोकांडी64 कोटी निधीतील गोलमालाचा हिशोब गुलदस्त्यात

 
स्थैर्य, सातारा : युती शासनाच्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी या नावाखाली एक नवी संकल्पना एसटी महामंडळात आणली गेली. यामाध्यमातून देखील प्रवाशांच्याच खिशावर गेले 3 वर्षे बोकांडी मारला जातोय. प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटामधून एक रूपया अपघात विम्यासाठी वसूल केला जातो. दिवसभरात राज्यात अंदाजे सुमारे 60 लाख प्रवाशी एसटीतून प्रवास करतात. हे गणित गृहीत धरल्यास किरकोळ वाटणार्‍या एक रूपयांची किंमतीपोटी दिवसाला 60 लाख जमा होतात. महिन्याचा हा हिशोब 1 कोटी 80 लाखाचा तर वर्षाला यामाध्यमातून गोळा होणार्‍या अंदाजे 3 वर्षाच्या अंदाजे 64 कोटी रूपयाच्या निधीचा गोलमाल काय होतोय या बाबतचे कोडे महामंडळातल्या अधिकर्‍यांनाच सोडवता आले नाही. हि संकल्पना राबविण्यामागचे कारण अनेकांना सुटले नसुन कुणाच्या फायद्यासाठी हि अपघात विमा राबविली याबाबत वेगवेगळे मतप्रवाह महामंडळात आहेत.
 
‘‘नवा राजा, नवा कायदा’’ याचा बळी महामंडळ झाले आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा एखाद्या आमदारावर सोपवण्यात यायची महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असायचा. या निमीत्ताने एका आमदाराचे मंत्रीपदावर पुनर्वसन व्हायचे. युती शासनाच्या काळात महामंडळाच्या अध्यक्षपदावर कोणत्याही आमदाराची नियुक्ती केली गेली नाही. या पदावर परिवहन मंत्र्याचीच नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे महामंडळ सोपवण्यात आले. या कालखंडात काही चुकीच्या निर्णयाने महामंडळाला भिकेला लागण्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

दळणवळणाची साधणे वाढली तरी सर्वसामान्यांची एसटी मात्र तग धरून आहे. आजही दिवसाला राज्यात सुमारे 60 लाख प्रवासी एसटीमधूनच प्रवास करतात. अनेकदा एसटीच्या तिकिटामध्ये भाडेवाढ झाली ती का आणि कशासाठी वाढविली याचे सुरस किस्से रंगतदारपणे चर्चिले जात आहेत. 3 वर्षापूर्वी स्व.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यत्ता निधी ही नवी संकल्पना रावते यांनी महामंडळात राबविली. या योजनेचा फटका प्रवाशांनाच बसला एका 10 रूपयाच्या तिकिटावर 1 रूपया अपघात विम्यासाठी प्रवाशांच्या माथी मारला गेला. या माध्यमातून राज्याचा विचार केला तर प्रतिदिन सुमारे 60 लाख रूपयांचाच प्रवाशांचाच खिसा कापला जात होता. महिन्याला 1 कोटी 60 लाख तर वर्षाला 21 कोटी 60 लाखाचा निधी महामंडळाच्या तिजोरीत विसावत होता. या कचाटयातून प्रवाशांबरोबरच विद्यार्थी, दैनंदिन प्रवास करणारे कर्मचारी, सर्व प्रकारच्या सवलतीधारक प्रवाशांच्याही खिशातून 1 रूपया जिजीया कर वसुल होत असल्याचे समोर आले आहे. असे वरवर दिसत असले तरी या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर गोलमाल होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोज प्रवाशांच्या माध्यमातून या योजने अंतर्गत जमा होणारा निधी लेखा शिर्ष क्रमांक 572 खाली जमा होत आहे. महामंडळाच्या दप्तरी त्याची नोंद होते. अपघात विम्याची गोळा होणारी दैंनदिन रक्कम दररोज मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात जमा केली जाते. या रकमेचे पुढे काय होते याचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. या पैशाची महामंडळाकडून कोणतीही आर्थिक तपासणी केली गेली नसल्याची धक्कादायक चर्चा महामंडळात आहे.
 
विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडून तिकिटाच्या 2 टक्के रक्कम अपघात विम्यासाठी गेले 71 वर्षे गोळा केले जात आहेत. हे विम्याचे पैसे गोळा केले जात असताना दुसर्‍या अपघात विम्याचे भुत प्रवाशांच्या मानगुटीवर बसवून कोणाचे हित साधले गेले याचे उत्तर मात्र मिळत नाही. महामंडळाकडून अपघातग्रस्तांना ही नवी योजना अमलात नसताना देखील वार्‍यावर सोडले जात नव्हते. अपघातात मयत झाल्यास 10 लाख, जायबंदी झाल्यास 5 लाख, तात्पुरत्या अपंगत्वास 2 लाख, तर किरकोळ जखमी असल्यास 10 ते 50 हजारांची मदत देवून विश्‍वासार्हता जपल्याने एसटीबद्दल प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना आहे. या नव्या अपघात सहाय्यता निधीच्या मागचे गौडबंगालाचे कारण मिमांसा कुणालाही सांगता येत नसल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. महामंडळाला सध्या अध्यक्षच नसल्याने व्यवस्थापकिय संचालक रजिंतसिंह देवल हे प्रशासकिय अधिकारीच महामंडळाचा कारभार पाहत आहेत. याबाबत अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

शिवशाहीचा एसटी प्रवास हा ‘‘राम भरोसे आहे’’ प्रवाशांना सुरक्षितपणे ऐच्छिक स्थळी पोहचू कि नाही याची खात्रीच राहिलेली नाही. प्रशिक्षण नसलेले रिक्षावाले देखील चालक होत असल्याने आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने शिवशाहीचे अपघातांची मालीका दिवसेंदिवस संख्यात्मक वाढतच आहे. गेल्या दोन वर्षात 588 प्राणांकित अपघात झाले. शिवशाहीच्या गाडयांचा अपघात विमा असताना त्यांच्या अपघातांची जबाबदारी ही महामंडळाकडून घेत असल्याची कूजबूज आहे. त्यांच्या देखील झालेल्या अपघातात देयके महामंडळानेच दिली आहेत अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. नव्या संकल्पनेतील अपघात सहाय्यता निधीतील जमा झालेल्या रकमेची तपासणी व्हावी या मागणीने आता डोके वर काढले आहे.