Your Own Digital Platform

लोक भाषा हीच भाषेचा प्रवाही इतिहास - प्राचार्य डॉ. यशवंत पाटणेस्थैर्य, सातारा : मराठी भाषा ही नुसती भाषा नसून ती आपली संस्कृती आहे. लोक भाषा हिच भाषेचा प्रवाही इतिहास असतो. या गोड भाषेच्या संस्कृती संवर्धनासाठी आपल्या बोली भाषेत मराठीचाच जास्तीत जास्त वापर करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय व कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते. या प्रसंगी प्रा. निरंजन फरांदे, प्रा. डॉ. दिलीप गायकवाड, प्रा. जमीन मोमीन, प्रा. अर्चना पवार, प्रा. डॉ. भरत जाधव, कु. प्रसाद परळे आदी उपस्थित होते.

तलवारीने जग जिंकता येत नाही, शब्दांनी जग जिंकता येते, असे सांगून प्राचार्य पाटणे पुढे म्हणाले, प्रत्येकाने मराठी भाषेचा गोडवा जपणे महत्वाचे आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणजे आपल्या मराठी भाषेचा गौरव आहे. आपल्या लोकसंस्कृतीचे समाजात विस्मरण होत आहे, लोकसंस्कृतीला इतिहास आहे या लोकसंस्कृतीचे जतन झाले पाहिजे, असेही प्राचार्य श्री. पाटणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यवुराज पाटील यांनी मराठी भाषेचा उत्पत्तीचा इतिहास सांगितला. यावेळी ते म्हणाले, मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे. महाराष्ट्री प्राकृत ही मराठीची मुळ भाषा असून त्याला प्राकृत व्याकरणकार वररुची पासूनचा इतिहास आहे. त्यामुळे देशातील प्राचीण भाषेपैकी एक मराठी भाषा आहे. महाराष्ट्रात 52 प्रकारच्या लोकभाषा बोलल्या जात आहे. त्यांचे जतन होण्याबरोबर संशोधन होणे गरजचे असल्याचे सांगून मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, हे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाने व्यक्त होणे आता काळाची गरज बनली असून ते आपले कर्तव्य आहे. मराठी साहित्य हे आपल्याला जगायला शिकविण्याबरोबर जग काय आहे हे समजते. सातारा जिल्ह्याला वक्त्यांची परंपरा आहे. जन्मजात कोणी वक्ता नसतो वक्ता होण्यासाठी वयाचे बंधन नाही तुम्ही बोलू शकता हे लक्षात ठेवा बोलण्यात व्यासंग पाहिजे. ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे वाचन केले तर शब्दांची कमतरता पडत नाही. पुस्तकांमुळे समाजातील घटना समजतात घटनांवर बोलायला शिका. भरपूर वाचन करा, समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पहायला शिका, असे वक्तृत्वची जडण घडण या विषयावर बोलताना प्रा. निरंजन फरांदे यांनी या कार्यक्रमात सांगितले.

रांगोळीतूनन उलगडली मराठी भाषा आणि संस्कृती

मराठी भाषा संवर्धन सप्ताहाच्या आजच्या उद्घाटन प्रसंगी मराठी भाषेचा बोलका इतिहास रांगोळीतून निखील धावडे या विद्यार्थ्यांन अतिशय उत्कृष्ट रेखाटला, त्या रांगोळीत राजभाषा कोश काढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून हातात पाटीही कधीही न घेतलेल्या शब्द ओळख नसलेल्या समस्त कुळांच्या कुलपती व्हाव्यात एवढी प्रात्रता असलेल्या बहिनाबाई, लोककलांमधला अविष्कार, जात्यावरच्या ओव्या हे संगळ त्या रांगोळीत काढून त्यांनी भाषेचं वैभव रेखाटल्यामुळे तो कौतुकाचा विषय झाला.

53 वक्तृत्व स्पर्धा जिंकणारा कु. प्रसाद परळे यांने पुस्तकांची दुनिया या विषयी उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भरत जाधव यांनी केले तर सर्वांचे आभार प्रा. अर्चना पवार यांनी मानले. या कार्यक्रमास कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.