Your Own Digital Platform

"होय..मी गांधींच्या देशातून आलोय."गांधीजींच्या जीवनावर देशात, परदेशात जितकी पुस्तके लिहीली गेली आहे तेवढी कोणावरही लिहीली गेली नाही. परंतु गांधीजींचे जीवन खर्या अर्थाने समजावून घ्यायचे असेल तर त्यांनी स्वतः लिहीलेल्या आत्मकथेला पर्याय नाही.

गांधीजी बर्याच वेळा उपवास करत..काही दिवस मौन धारण करत.कधी आहाराचे विविध प्रयोग करत.हे सर्व लोकांसमोर आणावे असे बहुधा त्यांना वाटले असावे. त्यासाठी त्यांनी  लिहीण्यास प्रारंभ केला.

गांधीजी आपली आत्मकथा लिहीणार आहे अशी कुणकुण त्यांच्या जवळच्या एका मित्राला लागली. त्याने मित्रत्वाच्या अधिकाराने विरोध केला.इतक्यात आपण आत्मकथा न लिहीलेली बरी असा सल्लाही दिला.

त्यावर गांधींनी नम्रपणे आपली भुमिका त्याला समजावून सांगितली.

"मी आत्मकथा कुठं लिहीणार आहे?मी जीवनात  सत्याचे जे प्रयोग केले त्याची निरीक्षणं समाजापुढे ठेवणार आहे."

या आत्मकथेत त्यांनी आपण केलेल्या प्रयोगांची टिपणे वाचकांपुढे ठेवली आहे.अगदी एखाद्या शास्त्रज्ञाच्या तटस्थ व्रुत्तीने.आणि त्यामुळेच की काय या आत्मकथेला त्यांनी नाव दिलंय...
"सत्याचे प्रयोग"

सुरुवातीलाच ते सांगतात..

"माझे प्रयोग कोणत्याही प्रकारे संपूर्ण आहेत, असे माझे मुळींच म्हणणे नाही. एखादा शास्त्रज्ञ ज्याप्रमाणे आपले प्रयोग अतिशय पध्दतशीरपणे विचारपूर्वक व सुक्ष्मपणे करीत असुनही त्यापासून काढलेली अनुमाने अखेरची आहेत असे लोकांना सांगत नाही, तशाच तर्हेने माझेही माझ्या प्रयोगासंबंधी म्हणणे आहे."

गांधीजींची लिहीण्याची शैली.. भाषा सरळ,बाळबोध वळणाची आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात घडणार्या गोष्टीच त्यांच्याही जीवनात घडतात. पण यात जाणवते त्यांची जीवनाप्रती असलेली प्रांजळ सत्यनिष्ठा.सामान्यातुन असामान्यत्वाच्या पदवीला ते पोहेचले ते केवळ या सत्यनिष्ठनेच.

माझे यातील लेख कोणीही प्रमाणभूत मानु नये असेही ते नम्रतेने सांगतात.

"यात दर्शविलेल्या प्रयोगांना द्रुष्टांतरुप समजुन सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावे एवढीच माझी इच्छा आहे. यात मी जे काही लिहीले आहे त्यात जर वाचकाला अभिमानाचा भास झाला तर त्याने खुशाल समजावे,की माझ्या शोधात काहीतरी न्युन आहे"

गांधीजींनी त्यांची ही आत्मकथा बहुधा त्यांच्या मात्रुभाषेतुन म्हणजेच गुजराथीतुन लिहीली आहे. त्याचे मराठी भाषांतर केले आहे अप्पासाहेब पटवर्धन यांनी.त्यांना गांधीजींचा निकटचा सहवास लाभलेला.गांधीजींच्या विचारांचा नेमका संदर्भ.. आशय त्यांना ठाऊक. त्यामुळे हे भाषांतर अधिक अचूक झाले आहे.

"सत्याचे प्रयोग" च्या आजवर अक्षरशः लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. त्याची मागणी आजवर कधी कमी झालेली नाही. पण..

..पण अलीकडेच आलेल्या माहीतीप्रमाणे गेल्या काही वर्षांत ही मागणी कमी होत चालली आहे.

कमी होत चालली आहे हे एकवेळ समजुन घेता येईलही, पण..

..पण मागणी वाढत चालली आहे ती हिटलरच्या आत्मचरीत्राची..म्हणजेच "माईन काम्फ" ची.

ही परिस्थिती चिंताजनक आहे हे खरे.. पण हे तात्कालिक आहे. गांधी.. गांधींचे विचार..त्यांची 'सत्यकथा' हे चिरंतन आहे. गोळ्या घालुनही गांधीजी संपले नाही, तर पुस्तकाची मागणी कमी होऊन गांधीजी संपतील..हे अशक्यच.

कारण आजही जगातील कोणत्याही मंचावर प्रत्येक भारतीय आपली ओळख करुन देताना अभिमानाने  सांगतात...

"होय..मी गांधींच्या देशातून आलोय."

सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.