Your Own Digital Platform

जाणता अजाणता


जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे

या काव्यपंक्ती एकनाथी भागवतामध्ये आढळतात. त्या आठवण्याचे कारण म्हणजे शरद पवार. मध्यंतरी स्वत:ला जाणता राजा म्हणू नका असेही आपल्या अनुयायांना कधी खंबीरपणे सांगायला धजावले नाहीत, अशा शरद पवारांचे उदगार! कोणा दिवट्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या युगातले शिवाजी महाराज ठरवणारे पुस्तक लिहून काढले आणि त्यावरून वाद सुरू झाला होता. त्यात आपले काही मुद्दे वा आक्षेप नोंदवण्यापेक्षाही पवारांनी अकारण त्यात समर्थ रामदास स्वामींवर दुगाण्या झाडल्या. शिवरायांच्या गुरू जिजाऊ महाराज होत्या आणि रामदास नक्कीच गुरू नव्हते; असे मतप्रदर्शन केले. त्याचे औचित्य काय होते? गुरू म्हणजे तरी काय असतो? आज शिवरायांचा गुरू कोण हे सांगण्यापेक्षा पाच वर्षापुर्वी तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला आले असताना इतका परखड खुलासा करायची हिंमत पवारांनी करायला हवी होती. कारण तिथे दोन आक्षेपार्ह विधाने झालेली होती. पण दोन्ही बाबतीत साहेबांनी मौन पाळण्यात धन्यता मानलेली होती. एक म्हणजे त्या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी पवारांचा उल्लेख ‘देशाला न लाभलेले पंतप्रधान’ असा केला होता. त्यात कितीसे तथ्य होते? आपण प्रयत्न खुप केले, पण तिथपर्यंत मजल मारू शकलो नाही, हे सत्य पवारांना अजून पचवता आलेले नाही. म्हणूनच बजाज यांच्या विधानाला विरोध करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यापेक्षा निमूट गप्प बसून त्यांनी मिळालेला ‘लाभ’ पदरात पाडून घेतला. पण तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक आक्षेपार्ह विधान केले. मोदींनी पवारांनाच आपले गुरू म्हणून प्रशस्तीपत्र देऊन टाकले. त्यात किती तथ्य होते? ती इतिहासातील नव्हेतर वर्तमानातली गोष्ट होती आणि साक्षात पवारांच्या साक्षीने घडत होती. त्याविषयी तात्काळ खुलासा कशाला केला नाही? तर आपण ज्याचे गुरू नाही, त्याच्या यशाचे फ़ुकटचे श्रेय मिळत असेल, तर नाकारण्याचे धैर्य पवारांपाशी नसावे.

शिवरायांचे गुरू कोण, हा आज ऐतिहासिक वाद आहे. पण गुरू तो असतो ज्याच्यापासून शिकण्यालाच अधिक महत्व असते. त्याचे नेमके वर्णन एकनाथी भागवतामध्ये आलेले आहे. त्याच पंक्ती आरंभी उधृत केलेल्या आहेत. त्याचा बारकाईने अभ्यास केला तरी गुरू शब्दाची व्याप्ती व आशय लक्षात येऊ शकतो. मग जगात आपले गुरू कोण आणि कोणापासून काय शिकावे; याचे प्राथमिक ज्ञान होऊ शकते. तिथूनच खरीखुरी शिकायची सुरूवात होत असते. पण बहुधा पवारांना तसे काही करायची गरज केव्हाच वाटलेली नसावी. त्यामुळे शिकण्यापेक्षा त्यांना आरंभापासूनच शिकवण्याची अधिक हौस असावी. अन्यथा आपल्याला कोणी राजकारणाचे धडे दिले; त्या गुरूचे शब्द त्यांनी मनावर घेतले असते. शिवरायांच्या गुरूविषयी वाद होऊ शकतात. पण पवारांच्या गुरूविषयी मतभेद होऊ शकत नाहीत. कधीकाळी महाराष्ट्रात कॉग्रेसचा अभेद्य किल्ला उभा करणारे यशवंतराव चव्हाण, हेच पवारांचे राजकीय गुरू आहेत ना? की त्याची खातरजमा करण्यासाठी पवारांना आजच्या जमान्यात श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाची पाने चाळावी लागणार आहेत? राजकारणात वा सार्वजनिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपली वाणी कशी वापरावी, याविषय़ी यशवंतरावांनी दिलेला धडा खुप मोलाचा आहे. पण शिष्यांना तो ऐकता आला पाहिजे. समजून घेता आला, तरच त्यानुसार अनुकरण करणे शक्य होईल. अलिकडेच एका वाहिनीवर विधानसभा निकालापुर्वी आपले राजकीय अनुभव कथन करताना पवारांचे समकालीन दुसरे पवार त्याचा दाखला देत होते. त्यांचे नाव उल्हास पवार असे आहे. त्यांनी जुन्या आठवणी व आपले राजकीय शिक्षण उलगडून सांगताना यशवंतरावांची एक मोठी आठवण सांगितली. किंबहूना नेत्यांनी काय व कसे बोलावे, यापेक्षा काय बोलू नये; याचा तो उत्तम वस्तुपाठ आहे. पण तेवढाच धडा घ्यायला शरद पवार विसरून गेलेले असावेत, किंवा त्यांनी तोच धडा मनावर घेतलेला नसावा.

राजकिय वा सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना काय बोलावे, यापेक्षा काय बोलायचे टाळावे, याला खरे महत्व असते, ही यशवंतरावांची शिकवण होती, असे उल्हासरावांनी सांगितले. जे त्यांना इतक्या वर्षानंतरही आठवते, त्याचा शरद पवारांना विसर कसा पडलेला आहे? अलिकडल्या कालखंडात पवारांची वेळोवेळी केलेली विधाने आठवली, तरी यशवंतरावच त्यांचे गुरू वा मार्गदर्शक होते काय, अशी शंका येते. कारण नको त्यावेळी नको त्या प्रसंगी पवार नको तितकेच बोलत असतात. शिवरायांच्या गुरूविषयीचे विधान त्यापैकीच एक आहे. शिवरायांचे गुरू कोण हे सांगण्याचे काहीही प्रयोजन नव्हते. युगपुरूष अवघ्या जगाकडून कायम शिकत असतात. कुठल्याही अनुभवातून शिकत असतात आणि अगदी शत्रूकडूनही शिकत असतात. आपल्या चुकांमधूनही शिकत असतात. शिवराय इतक्या उंचीवर पोहोचले व त्यांनी इतिहास घडवला, कारण ते गुरू कोण ते ठरवित बसलेले नव्हते. तर प्रत्येक दिवसाच्या अनुभवातून शिकत होते. यातला एक मोठा दाखला इथे सांगणे भाग आहे. त्यांच्या आधीच्या इतिहासात भारतातल्या वा कुठल्याही हिंदू राजाने लढवय्याने नि:शस्त्र वा माघार घेतलेल्या शत्रूवर हल्ला करण्याचे टाळलेले होते. गाफ़ील शत्रूवर हल्ला करणे भारतीयांच्या स्वभावात नव्हते. त्याचाच फ़ायदा घेत इस्लामी आक्रमण सहजशक्य झाले. त्याला मुस्लिम आक्रमकांच्या गद्दारी व विश्वासघाताचे डावपेच कारणीभूत होते. अशावेळी आपल्या जुन्या परंपरांना फ़ाटा देऊन शिवरायांनी नवे युद्धतंत्र तयार केले, त्याला आपण गनिमी कावा म्हणून गौरव करतो. पण मुस्लिम धार्मिक युद्धशास्त्रात त्यालाच ‘तकिया’ म्हणतात. त्याचा बिनधास्त अवलंब महाराजांनी आपल्या डावपेचातून केलेला आहे. आधीचे भारतीय राजे व शिवराय यांच्यातला सर्वात मोठा फ़रक गनिमी कावा आहे. मग ते युद्धशास्त्र त्यांनी कुणाकडून आत्मसात केले? आपल्या शत्रूकडून ना?

थोडक्यात शत्रू गुरू नव्हता, की कोणी स्वामी वा संतही गुरू नव्हता. जगातल्या विविध अनुभवातून महाराज शिकू शकले. आपला गुरू कोण त्याचा डंका पिटण्याची त्यांना गरज वाटली नव्हती. त्यापेक्षा हाती घेतलेले कार्य पुर्ततेला घेऊन जाण्याला प्राधान्य असते, हा सर्वात मोठा धडा त्यांच्या जीवनक्रमातून आजही शिकण्यासारखा आहे. पण जाणता राजा म्हणवून घेताना काहीही शिकायचे नाही, हा पवारांचा बाणा राहिला आहे. अन्यथा त्यांनी अकारण नसत्या विषयाला हात घातला नसता. किंबहूना शिवरायांचा काळ इतिहासाचा आहे. यशवंतराव तर पवारांना जवळून बघता आले व त्यांच्याकडून शिकण्याची संधीही मिळाली. पण चार हात दुर राहून उल्हास पवार जितके शिकू शकले, तितकेही शरदरावांना आपल्या घोषित गुरूपासून शिकता आले नाही. परिणामी चतुराई दाखवायला जाऊन त्यांनी प्रत्येक बोलण्यातून आपलेच नुकसान कशाला करून घेतले असते? मोदींनी गुरू ठरवल्याचे खोटे कौतुक ऐकून सुखावण्याची वेळ त्यांच्यावर कशाला आली असती? अनुयायांनी ‘जाणता राजा’ म्हणून कौतुकाचे शब्द वापरल्यावर गप्प कशाला बसले असते शरदराव? ज्यांना अगत्याने शिवरायाचे गुरू रामदास नसल्याचे कथन केल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांना त्याच समर्थांच्या ‘जाणता राजा’ उपमेचे कौतुक कशाला असावे? चिंचवड किंवा तशाच कुठल्या जागी व्यासपीठावरून आपल्या पक्षाच्या जाहिर कार्यक्रम समारंभात पुणेरी पगडी घालायचे टाळून महात्मा फ़ुल्यांचे पागोटे घालावे; असे अगत्याने सांगायची उबळ येते ना? मग आपल्यालाही ‘जाणता राजा’ असली उपाधी लावू नका, असे सांगताना शब्द कशाला अडतात? तर शब्द कोणाचे का असेनात, आपले गुणगान करीत असतील, तेव्हा गुदगुल्या होतात. हवेहवेसे असतात. पण गुदगुल्या संपल्यावर मुळ स्वभाव उफ़ाळून येत असतो. की असे फ़क्त जाणता अजाणता घडत असते?

पुणेरी पगडी वा छत्रपती संभाजी राजांना राज्यसभेत मिळालेली नेमणूक; यावेळी पवारांना सुचलेल्या उक्ती केवळ जातिवाचक नव्हत्या, असे कोणी म्हणू शकतो का? प्रामुख्याने पुणेरी पगडीला आक्षेप घेताना त्यांना महात्मा फ़ुले यांची तरी कितपत ओळख होती? कारण त्या समारंभात त्यांनी अगत्याने वेगळी फ़ुले पगडी मागवून घेतली आणि यापुढे असलीच पगडी सन्मानार्थ द्यावी, असा आग्रह धरलेला होता. पण फ़ुले पगडी नसते, तर त्याला पागोटे असे म्हटले जाते, त्याचीही गंधवार्ता पवारांना नव्हती की मंचावर उपस्थित असलेल्यांना नव्हती. मग पगडी पागोट्याचा वाद जातीशी संबंधित असल्याचे लपून रहात नाही. विषय पगडीचा असो वा गुरूच्या जातीचा असो. महापुरूष गुरूचेही मिंधे नसतात, तर जगाकडून शिकत असतात. त्यांना गुरूची गरज नसते. कारण ते अनुभवातून शिकत असतात. लहानमोठ्याचा विचार करून शिकण्याची संधी गमावत नसतात. नुसते शिकून थांबत नाहीत, तर त्या शिकण्याचा जीवनात व कार्यात उपयोगही करून घेत असतात. त्यातून अशा महान व्यक्ती इतिहास घडवतात. ते जातीपातीत अडकून रहात नाहीत. त्यांची ख्याती व किर्ती जाती प्रदेशाच्याही मर्यादा ओलांडून जात असते. शिंदे, होळकर, गायकवाड महाराष्ट्राच्या भौगोलिक मर्यादा काही शतकापुर्वी ओलांडून इतिहासाला घडवू शकले. पण आजच्या जमान्यातही पवारांना महाराष्ट्राच्या सोडा, बारामती परिसराच्याही सीमा ओलांडून पराक्रम गाजवता आलेला नाही. जाणता अजाणता, पवार आपल्या जातीचक्रात अडकून पडलेले आहेत आणि मोदींसारखा तुलनेने नवा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधानही होऊन गेला आहे. कारण त्याला गुरूची व्याख्या उमजलेली आहे. गुरूची जात नव्हेतर शिकवण मोलाची असते; त्याचे भान आहे. अवघे जगच गुरू असते. आपण विद्यार्थी शिक्षणार्थी असायला हवे, याचे भान मोलाचे असते. जे पवारांना कधीच नव्हते, ही अडचण राहिलेली आहे.

भाऊ तोरसेकर
जगता पहारा