Your Own Digital Platform

दिव्याखालचा अंधार


जागता पहारा

वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार
 हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहरू विद्यापीठात गेली आणि अनेक पुरोगाम्यांना शिंगे फ़ुटली आहेत. एकूण पुरोगामी चळवळ आजकाल सेलेब्रिटींचा पदर पकडून कशी जीव धरून आहे, त्याची साक्ष त्यातून मिळते. पण या संबंधाने जे वाद आणि विवाद विविध माध्यमातून उभे राहिले, त्यातली पुरोगामी अगतिकता लपून रहात नाही. हाच धागा पकडून एबीपी माझा वाहिनीने ‘ माझा विशेष’ म्हणून एक चर्चा योजली होती. त्यातले एक शीर्षक खटकले म्हणून सविस्तर लिहावे लागले. आपण वैचारिक उहापोह किंवा चर्चा घडवून आणतो, असा या लोकांचा दावा असतो. थिन्क बॅन्क नावाच्या युट्युब व्हिडीओमध्ये याच वाहिनीचे संपादक राजू खांडेकर यांनी वाहिनीच्या भूमिकेविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे. पण अजून त्यांच्या वाहिनीवरील चर्चांचे संयोजक प्रसन्ना जोशी यांनी ते बघितलेले नसावे. किंवा समजून घेतलेले नसावे. कदाचित समोरचा काहीही बोलत असताना ते ऐकायचे सोडून, त्यात व्यत्यय आणण्यालाच संयोजन समजून वागणार्‍या प्रसन्नाला आपल्याच संपादकांचे संपुर्ण निवेदन खुलासा ऐकायचा संयम राहिलेला नसावा. अन्यथा त्यांनी रोजच्या चर्चेत व्यत्यय आणायचा उद्योग कमी केला असता. शिवाय त्याचे प्रतिबिंब निदान दीपिका विषयक चर्चेत तरी पडले असते. खांडेकर त्या मुलाखतीमध्ये म्हणतात, मोदी सत्तेत आल्यापासून समाजात दोन गट पडले आहेत. आमचे म्हणणे खरे माना, दुसरी बाजूच असू शकत नाही, अशी असहिष्णुता वाढलेली आहे. तुमच्या विचारापेक्षाही वेगळा विचार किंवा भूमिका असू शकते, हे मानले पाहिजे असा खांडेकरांचा त्या मुलाखतीचा एकूण सुर आहे. पण तसे असेल तर त्यांनी इतर कोणाला काही शिकवण्यापेक्षा आपल्याच चर्चा संयोजक प्रसन्नाला ही बाब समजावली पाहिजे ना? ती समजावली असती, तर दीपिकाच्या निमीत्ताने योजलेल्या चर्चेत प्रसन्नाने मराठी कलावंतांवर दुगाण्या झाडल्या नसत्या. यालाच तर आपले पुर्वज दिव्याखालचा अंधार म्हणायचे ना?

मराठी चित्रपट कलावंत भूमिका साकारतात, पण भूमिका घेत नाहीत, अशी अत्यंत बुद्धीमान मल्लीनाथी त्यामध्ये प्रसन्नाने केली. मजेची गोष्ट अशी, की कुठलाही कलाकार भूमिका घेऊ शकला नाही तर भूमिका साकारणार कशी? तो भूमिका साकारतो, म्हणजेच भूमिका घेत असतो. त्यामुळे भूमिका घेणार कधी, ही शब्दरचनाच हास्यास्पद आहे. मग प्रसन्नाला काय म्हणायचे आहे? तर मराठी कलावंत प्रसन्ना वा तत्सम पुरोगाम्यांना आवडणारी राजकीय ‘भूमिका’ कधी घेणार? ही भूमिका चित्रपटातली नसते तर राजकीय आखाड्यातली असते. तीही पुरोगामी असेल तरच ‘भूमिका’ असते. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली, तर त्याला पुरोगामी भाषेत भूमिका म्हणत नाहीत. त्यासाठी भक्त वा भक्ती असा शब्द आहे. त्यामुळे मराठी कलावंत ‘भूमिका’ घेत नाहीत, या उक्तीचा अर्थ पुरोगामी मानली जाते अशी भूमिका ते मराठी कलाकार कशाला घेत नाहीत? इथे दोन प्रश्न उदभवतात, खांडेकरांना भूमिका शब्दाचा आशय समजलेला नाही, की प्रसन्नाला त्याचा अर्थ उलगडलेला नाही? कारण भूमिका घेणे म्हणजे फ़क्त पुरोगामी किंवा मोदी विरोधाची असेल, तर अन्य भूमिकाच असू शकत नाहीत. आणि अन्य भूमिकाच नसेल, तर भूमिका घेण्याला काहीही अर्थच उरत नाही. उदाहरणार्थ ज्या चर्चेमध्ये पुरोगामी पक्षांचे प्रवक्ते तोकडे पडतात, किंवा त्यांच्यापाशी कुठलाही युक्तीवाद वा मुद्दे नसतात, तिथे प्रसन्ना पक्षपाती भूमिका घेऊन पुरोगामी बाजू हिरीरीने मांडू लागतो. त्याला ‘भूमिका घेणे’ म्हणतात. पत्रकार वा चर्चेच्या आयोजकाने तटस्थ असायला हवे आणि त्यालाही सामान्य भाषेत भूमिकाच म्हणतात. पुरोगामी भाषेत तटस्थ वा अलिप्त वगैरे भानगडी नसाव्यात. अन्यथा प्रसन्नाने असा खुळेपणा कशाला केला असता? त्याने प्रत्येकाला मनसोक्त आपले विचार व्यक्त करू दिले असते आणि पक्षपाती भूमिका कधीच घेतली नसती. असो.

कुठल्याही चर्चेत वा गोष्टीत फ़क्त दोन बाजू नसतात, दोन बाजूच असत्या तर चर्चा रंगली नसती आणि न्यायालयेही चालली नसती. न्यायालयात तिसरी बाजू किंवा भूमिका असते. ज्याला न्याय देणे म्हणतात. दोन्ही बाजू संयमाने ऐकून घेण्याची प्राथमिकता त्यासाठी आवश्यक असते. बाजू मांडली जात असताना, त्यात व्यत्यय आणण्याला कोणी तटस्थ वा संयमी म्हणू शकत नाही. दीपिकाने नेहरू विद्यापीठात जाऊन भूमिका घेतली, म्हणजे तिथल्या अराजकाचे समर्थन केले. हिंसाचाराला वा दंगेखोरीला पाठींबा दिला. तो योग्य की अयोग्य, हा वेगळा विषय आहे. पण ती एक भूमिका झाली. पण तीच व तेवढीच नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भूमिका नसते व नाही. तिथे हजारो अन्य विद्यार्थी आहेत आणि त्यांचा आवाज वा मतांना माध्यमांनी कधीही प्रसिद्धी दिलेली नाही. त्यामध्ये शेकडो असे आहेत, ज्यांना आपले शिक्षण वेळच्या वेळी व्हावे आणि त्यात आंदोलने वा चळवळीचा व्यत्यय यायला नको, असेही वाटत असते. तेही प्रसन्नाच्या भाषेत कुठलीच भूमिका घेत नाहीत. मग त्यांचे काय करायचे? दीपिकाने तिथे गोंधळ घालणार्‍यांच्या समर्थनाला जाऊन एक भूमिका घेतली. पण बाकीच्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांचे म्हणणे कोणी मांडावे? ती भूमिका नाही काय? विद्यापीठात शिकायला यावे आणि निदान इतरांच्या शिक्षणात व्यत्यय आणु नये; अशी काही भूमिकाच नाही काय? दीपिकाने घेतली ती भूमिका असेल तर इतर ज्यांना ह्या गोंधळ अराजकाचे समर्थन करायचे नाही, ती शांततावादी भूमिका नाही काय? गोंधळाचा विरोध वा त्याविषयी नापसंती, ही भूमिकाच नाही काय? अशी अलिप्त भूमिका म्हणजे आंदोलनाचा विरोध नसतो वा विरोधी असणार्‍यांचेही समर्थन असायचे कारण नाही. मोदी वा मोदी विरोधक यांच्या पलिकडेही तिसरी एक भूमिका असते. जी मोदी समर्थनाची नसते तर दोन्ही वादापासून दुर रहाण्याची असते. त्यामुळे भूमिका शब्दाचा अर्थ अशा निर्बुद्धांनी जरा समजून घेतला, तरी खुप काही साध्य होऊ शकेल.

मोदीवादी वा भाजपा समर्थक नसलेले लोकही खुप आहेत. पण भूमिका म्हणजे मोदीविरोध इतकीच व्याख्या मर्यादित केली; मग मोदी समर्थक नसलेलेही आपोआप मोदीभक्त म्हणता येतात. कारण असहिष्णू पुरोगाम्यांनी भूमिका पक्की केली आहे आणि त्यात समाविष्ट होणार नाही, त्याला आपोआप मोदीभक्त करून टाकलेले आहे. त्यामुळे त्यांना दीपिकाने भूमिका घेतली असे वाटते. मानसशास्त्रामश्ये याला़च कळपवृत्ती वा झुंडशाही म्हणतात. जो आपल्यासारखा दिसत नाही, वागत नाही वा बोलत नाही, त्याच्याशी थेट शत्रूभावनेने वागण्याला कळपवृत्ती म्हणतात, तो प्रत्येक सजीव प्राणिमात्रामध्ये उपजतच असते. अर्थात ती पाशवीवृत्ती असते. जेव्हा अशी कळपाची मानसिकता जपणारे जोपासणारे एकत्र येतात, तेव्हा ती झुंडीची पाशवी प्रवृत्ती उफ़ाळून येत असते आणि शत्रूवर तुटून पडण्याचा जोश अंगात आपोआप संचारत असतो. दीपिकाने भूमिका घेतली म्हणून प्रसन्नाला चढलेला जोश व त्यात त्याने मराठी कलावंतांवर चढवलेला हल्ला; त्याच प्रवृत्तीतून आलेला आहे. कारण अशीच पण वेगळी भूमिका शरद पोंक्षे यांनीही अनेकदा घेतलेली आहे. पण ती प्रसन्ना वा तत्सम पुरोगाम्यांच्या पठडीतली नसल्याने त्याची खिल्ली उडवायला वा त्यावर तुटून पडायला प्रसन्ना सज्ज असतो. त्याला भूमिका म्हणून त्याविषयी चर्चा होत नसते. कारण पाशवी प्रवृत्तीत चर्चेला स्थान नसते, किंवा तारतम्याला जागा नसते. आपल्यापेक्षा वेगळा दिसेल वा वागेल; त्याच्यावर शिकार करायला तुटून पडायचे असते. त्याला सभ्य शब्दात ‘भूमिका’ म्हटले जाते. अन्यथा प्रसन्ना तितक्याच अगत्याने शरद पोंक्षे यांच्या भूमिका घेण्याविषयी अगत्याने बोलला असता. किंवा त्याही प्रसंगी मराठी कलावंत ‘भूमिका’ घेत नाहीत म्हणून त्यांच्यावर त्याने आगपाखड केली असती. पण त्यासाठी खरेखुरे सहिष्णू असावे लागते. मग पोंक्षे घेतात ती वेगळी असली तरी भूमिका म्हणून सत्य स्विकारावे लागेल ना? अडचण तीच असते. अंतिम सत्य गवसलेल्यांना सत्य सापेक्ष असते, तेही मानायचे नसते. म्हणून तर अशा चर्चा दिवसेदिवस निर्बुद्धांचे वैचारिक मुष्ठीयुद्ध होऊन गेले आहे. खांडेकरांनी थिन्क बॅन्कला भूमिका समजावण्यापेक्षा आपल्याच पायाखाली अंधारात चाचपडणार्‍या प्रसन्नाला प्रकाश दाखवला असता तर?

भाऊ  तोरस्कर