Your Own Digital Platform

सहाव्या वेतन आयोगासाठी छत्तीस कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर संबळ वाजवून वेधले प्रशासनाचे लक्ष


मला अधिकार नसल्याचा मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा

स्थैर्य, सातारा : सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांनी टाळ व संबळ वाजून शुक्रवारी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण केले . मात्र प्रशासन व कर्मचारी यांच्यातील चर्चा मात्र निष्फळ ठरली, वेतन आयोगाची अंमल बजावणी करण्यास मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला
इशारा दिल्याप्रमाणे सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे लाभ न मिळालेल्या 36 कर्मचाऱ्यांनी टाळ आणि संबळाच्या गजरात आपले लाक्षणिक उपोषण सकाळी साडेदहा वाजल्या पासून सुरू केले . पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ बारनिशीच्या दर्शनी भागात छत्तीस कर्मचाऱ्यांनी बसकणं मारून लाक्षणिक आंदोलन केले . वेतन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली .पालिकेत आस्थापनेवर कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला . सुहास पवार यांनी ही आंदोलनात सहभाग घेतला . छत्तीस जणांच्या या आंदोलनामुळे शुक्रवारी पालिकेचे दैनंदिन कामकाज कोलमडले . सीएफसी, आस्थापना, शहर विकास, अतिक्रमण, जनगणना विभाग इ विभाग पूर्णतः बंद होते . काही विभागांचा अपवाद वगळता पालिकेमध्ये पूर्णतः शुकशुकाट होता . या लाक्षणिक उपोषणामुळे दिवसभर कोणतेही काम होऊ शकले नाही . कर्मचाऱ्यांशी चर्चा करायचे सोडून मुख्याधिकारी , नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे सकाळच्या सत्रात पालिकेकडे लवकर फिरकलेच नाहीत. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आपल्या दालनात कर्मचाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केली . सतरा वर्षाची सेवा व नगर विकास राज्यमंत्र्यांनी 2 मार्च 2016 रोजी दिलेला पदोन्नती व वेतन आयोग अंमलबजावणीचा दिलेला आदेश ही बाजू आंदोलकांनी चर्चेत लावून धरली . उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यावेळी उपस्थित होते . चर्चेची ही फेरी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सुध्दा दालनात पार पडली . मात्र त्यांनी नगरपरिषद संचालनालयाकडे बोट दाखवून हा विषयच झटकल्याने चर्चा निष्फळ झाली . सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा अधिकार मला नाही .. तुमचा प्रश्न डीएमए कार्यालयात प्रलंबित आहे मी काही करू शकत नाही असे शंकर गोरे यांनी सांगत सहकार्य करण्यास नकार दिला . त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे . मात्र ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्यावर चर्चेने मार्ग निघावा . छत्तीस कर्मचाऱ्यांनी पालिकेला तब्बल वीस वर्ष सेवा दिली आहे . नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी स्वतः चर्चा केली आहे . कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही सर्व पदाधिकारी आहोत . या प्रश्नाची तड लावण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.
माधवी कदम नगराध्यक्ष ,सातारा नगरपरिषद सातारा