Your Own Digital Platform

आज २६ व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे पोंभुर्ले येथे वितरण


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोर्‍हे यांचे हस्ते होणार आहे. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ पत्रकार तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पुरस्कार वितरण समारंभ पोंभुर्ले, ( ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’सभागृहात ६ जानेवारी २०२० रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी स.१०:३० वा. आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
 
या समारंभात सन २०१८ च्या प्रतिष्ठेच्या २६ व्या दर्पण पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यामध्ये ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार’ - शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), ‘दर्पण’ पुरस्कार कोकण विभाग - राजेश परशुराम जोष्टे (प्रतिनिधी, दै.पुढारी, चिपळूण), उत्तर महाराष्ट्र विभाग - महेंद्र शामकांत देशपांडे (संपादक, सा.नाशिक वृत्तवैभव, नाशिक), पश्‍चिम महाराष्ट्र विभाग - प्रकाश नामदेव कांबळे (प्रतिनिधी, दै.सामना, सांगली), मराठवाडा विभाग - उमेश श्रीकृष्ण काळे (वृत्तसंपादक, दै.पुढारी, औरंगाबाद), विवेक केरुरकर (संपादक सा.सार्वभौम जनता, देगलूर), विदर्भ विभाग - अनिल केशवराव पळसकर (संपादक, सायं.दै.विदर्भ दर्पण, चिखली), बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत ‘पत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक दर्पण पुरस्कार’ डॉ.हंसराज वैद्य (ज्येष्ठ साहित्यिक, नांदेड), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील, कराड पुरस्कृत धाडसी ‘दर्पण’ पुरस्कार शर्मिष्ठा भोसले (मुक्त पत्रकार, मुंबई), विशेष दर्पण पुरस्कार नासिर इसाकभाई शिकलगार (प्रतिनिधी, दैनिक लोकमत, फलटण), राजेंद्र उर्फ राजू दत्तात्रय वाघमारे (मुक्त पत्रकार, पुणे) यांचा समावेश आहे.
 
तरी मराठी वृत्तपत्रसृष्टीतील या महत्वपूर्ण समारंभासाठी पत्रकार, साहित्यिक, वृत्तपत्र व साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘दर्पण’कारांना आदरांजली म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावचे सरपंच सादीक डोंगरकर, मधुकर व सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या वतीने करण्यात आले आहे.