Your Own Digital Platform

छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी”, उदयनराजेंच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर


स्थैर्य, पडळ : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर भाजपा नेते आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे असं यावेळी ते म्हणाले. पडळ (ता. खटाव ) येथील खटाव- माण साखर कारखान्याच्या २५१००१ व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिलं. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आ.प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीपराव येळगावकर,प्रभाकर देशमुख,डॉ. तानाजीराव चोरगे, सतीशराव सावंत, रणजितसिह देशमुख, अनिलभाऊ देसाई,जि. प. अध्यक्ष उदय काबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सुरेंद्र गुडगे, प्रा. बंडा गोडसे,नंदकुमार मोरे, विजय काळे, यांची प्रमुख उपस्थती होती.

शरद पवार म्हणाले
“मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जाणता राजा असं कुठेही संबोधण्यात आलेलं नाही. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 साखर उद्योगाबाबत ते म्हणाले गेल्या दोन वर्ष्यात जगामध्ये साखरेचे उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे नजीकच्या काळात साखरेला चांगला भाव मिळणार आहे .साखरेबरोबर इथेनॉल,वीज व इतर उप उत्पादने घेतल्यास व्यवसाय तोट्यात येणार नाही. त्यातच आवश्यक तेव्हढी नोकरभरती व इतर तांत्रिक बाबीचे काटेकोरपणे पालन केल्याने खटाव - माण कारखान्याला चांगले दिवस येतील . या भागाला आणखी पाणी देण्याच्या उद्देशाने मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ. येळगावकर व इतर सहकार्यसंवेत नजीकच्या काळात बैठक लावली जाईल .रामराजेंनी भाषणात साखर कारखानदारीचे फायदे- तोटे जिल्ह्याचे राजकारण यावर त्यांच्या शैलित विवेचन केले .प्रभाकर घार्गे यांनी भाषणात खटाव- माण च्या शेतकऱ्यांची कुचंबणा होऊ नये यासाठीच धाडसाने कारखान्याची निर्मिती केल्याचे सांगितले. तर मनोज घोरपडे यांनी कारखान्याच्या प्रगतिसंदर्भात सविस्तर तांत्रिक माहिती दिली .पवार साहेबांसारख्या अभ्यासू माणसाचे पाय कारखान्याला लागल्याने संचालक मंडळ धन्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले . प्रदीप विधाते यांनी सहकार, औद्यकिरण व राजकारणाची सुयोग्य सांगड घालणाऱ्या घार्गे साहेबांना पक्षाने बळ देण्याची मागणी केली. संचालक नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी आभार मानले .कार्यक्रमास प्रा. अर्जुनराव खाडे, सी. एम. पाटील, विक्रम घोरपडे, भास्करशेठ चव्हाण,सोनाली पोळ, शशिकला देशमुख, इंदिरा घार्गे, कविता म्हेत्रे, सुभाष शिंदे, बाळासाहेब सोळस्कर,राजूशेठ भोसले, महेश घार्गे, आनंदराव भोंडवे आदीसह सर्व संचालक, सभासद व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

  फलटण, बारामतीला भीती नाही 

खटाव, माण तालुक्यातील लोक कष्ट करण्यास कधीही मागे पडत नाहीत. त्यांना फक्त पाण्याची गरज आहे .या भागात कीतीही कारखानदारी वाढली तरी फलटण, बारामती ला त्याचा त्रास होणार नाही असा टोला शरद पवारांनी रामराजेंकडे कटाक्ष टाकत मारला त्यावर एकच हश्या पिकाला.

कोणाला आवडो न आवडो जाणते राजे हे पवार साहेबच : श्रीमंत रामराजे
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या नावाने पुस्तक प्रकाशित झाल्याने देशात रान पेटले आहे. अशातच नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन जाणता राजा म्हणवून घेणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्याला उत्तर देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल माण खटाव ऍग्रो प्रोसेसिंग युनिटच्या साखर पोती पूजन याप्रसंगी कोणाला काहीही वाटतं असो कोणाचे काहीही मत असो तरी जाणते राजे हे आदरणीय शरद पवार साहेब हेच आहेत असे मत कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.