Your Own Digital Platform

सागर जगताप क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित

 
सागर जगताप यांना पुरस्कार प्रदान करताना ना. बाळासाहेब पाटील. शेजारी शेखर सिंह, श्रीमती तेजस्वी सातपुते, युवराज नाईक व इतर...

स्थैर्य, सातारा : बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सातारा जिल्ह्याचे नाव राज्य आणि देशपातळीवर झळकावणाऱ्या सातारा पोलीस दलातील कर्मचारी सागर जगन्नाथ जगताप यांना क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात जगताप यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सातारा पोलीस दलात पोलीस नाईकअसलेले सागर जगताप हे माजी राष्ट्रीय खेळाडू असून महाराष्ट्र पोलीस स्पर्धामध्ये 5 वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व केले असून ते महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे 3 स्टार पंच, सिलेक्शन कमिटी मेंबर, महाराष्ट्र ज्युनिअर मुले संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना 2 वेळा बेस्ट बॉक्सर, 2 वेळा बेस्ट रेफ्री अवॉर्ड, खाशाबा जाधव जिल्हा क्रीडा पुरस्कार (2005) मिळाला आहे. 

बॉक्सिंग मध्ये त्यांनी NIS Certificate Course,2013, NIS ONE YEAR Diploma Course,2017-18, AIBA STAR 1 आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कोर्स 2017, AIBA CUTMAN आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कोर्स 2017, AIBA STAR 2आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कोर्स,2018 पूर्ण केला आहे. सन 2003 पासून आतापर्यंत 279 खेळाडूंना राज्यस्तरावर पदके, 37 राष्ट्रीय खेळाडू आणि 4 राष्ट्रीय पदके प्राप्त खेळाडू त्यांनी घडवले आहेत. आतापर्यंत सातारा संघाला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 4 वेळा सांघिक विजेतेपद, सातारा जिल्ह्यात 2 बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती, सातारा जिल्ह्यात खेळाडू बरोबरच 10 NIS CERTIFICATE प्रशिक्षक, महाराष्ट्र संघटनेचे 21 CCCP प्रशिक्षक, तसेच 16 राज्यस्तरीय पंचांची निर्मिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. त्यांच्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.