Your Own Digital Platform

‘स्वाभिमानी’ची बुधवारी बंदची हाक राजू शेट्टी


सातारा : शेतकर्‍यांच्या कर्जमुक्‍तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मुंबईत 265 संघटनांच्या सदस्यांची लवकरच बैठक होत असून त्यामध्ये 8 जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाबाबत रुपरेषा निश्‍चित केली जाणार आहे. या आंदोलनाद्वारे ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सातार्‍यातील मेळाव्यात दिली.
 
कल्याण रिसॉर्ट येथे पदाधिकारी निवडी व शेतकरी कर्जमुक्‍त मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, राज्य प्रवक्‍ते आनंद पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धनंजय महामुलकर, उपजिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, दादासाहेब यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
राजू शेट्टी म्हणाले, निव्वळ शेतीवर उपजीविका असणारा शेतकरी हा कधीही थकबाकीदार नसतो. त्यामुळे अशा शेतकर्‍यांनाच लाभ होणे गरजेचे होते. मात्र, सरकारने यावर अवाक्षरही काढलेले नाही. या वर्षात महापूर, दुष्काळ व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. पण सरकारने 30 सप्टेेंबर 2019 पर्यंत कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांची कर्जे माफ करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांना पीकच आले नाही तर पुढील वर्षी जून महिन्यात कर्ज कसे फेडणार? यासाठी सरकारने चालू व थकीत अशी दोन्ही पीक कर्जे पहिल्या टप्प्यात माफ करावीत. कर्जमाफीसाठी 31 हजार कोटी रूपये लागणार असल्याचे सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा खर्च 6 ते 7 हजार कोटी इतकाच आहे. त्यामुळे एक तर शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे किंवा सरकार आकडा खोटा सांगत आहे.
 
दरम्यान, शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी देशातील 265 शेतकरी संघटनांकडून ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतची बैठक मुबंईत लावण्यात आली आहे. यावर चर्चा झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. 8 जानेवारीला शेतकर्‍यांची नाराजी दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. ऊस गाळप हंगाम झाल्यानंतर कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांकडून याला कोलदांडा दिला आहे. यावर कारखानदारांनी लवकरात लवकर एकरकमी एफआरपी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न केल्यास पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते एकत्र करून जिल्ह्यात घुसू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
 
राजू शेळके म्हणाले, जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होण्यासाठी आम्ही लढत आहोत. शेतकरी आपल्या हक्‍कासाठी भांडत नसल्याने कारखानदार व प्रशासकीय यंत्रणेचे फावत आहे. कोयना धरण झाल्यानंतरही शेतकरी फक्‍त भूकंप व वीजेचे धक्के खात आहे. महावितरणकडून बोगस वीज बिलाद्वारे शेतकर्‍यांची लूट केली जात आहे. यावर अनेक आढावा बैठका झाल्या पण त्यावर कार्यवही शून्य आहे. शेतकर्‍यांनी आवाज न उठल्यानेच कोणतीच कार्यवाही झालेली नाही. शेतकरी संघटीत झाल्यास चांगले दिवस येतील. यापुढील प्रत्येक निवडणूक स्वाभिमानी लढवणर आहे.
 
जिल्हाध्यक्षपदी शेळके व महामूलकर यांची फेरनिवड
या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नवीन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये चार वर्षे राजू शेळके यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षाच्या कार्यकालात मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगून शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली. तर धनंजय महामूलकर यांच्याही कामाचे कौतुक करत त्यांचीही फेरनिवड करण्यात आली.