Your Own Digital Platform

उरमोडीचे पाणी उपलब्ध न केल्यास औंधसह १६ गावे ५ फेब्रुवारी पासून मुंडन आंदोलन करणार


स्थैर्य, औंध : औंधसह सोळा गावांच्या शेती पाण्यासाठी उरमोडीचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समयबध्द कार्यक्रमाची अंमलबजावणी सातारा पाटबंधारे विभागाकडून होत नसल्याने दि.पाच फेब्रुवारी रोजी औंधसह सोळा गावे बंद ठेऊन मुंडन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती एका लेखी पत्रकाद्वारे राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांनी दिली.

औंधसह सोळा गावांचा शेती पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा ,उरमोडी धरणातून या गावांना पाणी मिळावे यासाठी दत्तात्रय जगदाळे यांचे नेतृत्वाखाली औंधसह सोळा गावातील ग्रामस्थ, महिला, युवकांनी आंदोलने, उपोषणे करून हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता.उरमोडी धरणातून खटाव तालुक्यास 3.26टी.एम.सी. पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामाध्यमातून 9हजार 725हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे हेच पाणी जर बंदिस्त पाईप द्वारे ठिबक सिंचन योजनेद्वारेशेतीला दिले तर सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के पाण्याची बचत होत असून यामाध्यमातून औंधसह सोळा गावांतील 5500हेक्टर क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याबाबत वेळोवेळी कूष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी शासनास अहवाल सादर केला आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रथम जलसंपत्ती प्राधीकरणाची मान्यता घेऊन सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा असा आदेश दि.22मार्च 2017रोजी केला होता.
 
यावेळी उरमोडी धरण विभाग व सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी काहीही कार्यवाही नकेल्याने एक मे 2018पासून औंधसह सोळा गावातील ग्रामस्थ, युवक, महिलांनी दत्तात्रय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली औंध येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते.त्यानंतर या आंदोलनाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता उरमोडी विभाग, अधिक्षक अभियंता सातारा यांनी समयबध्द कार्यक्रम आखून औंधसह सोळा गावांचा शेती पाणी प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन दिले होते. 

मात्र उरमोडी विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एस.धुळे यांच्याशी बैठका घेऊन व चर्चा होऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रारी नोटीसा देऊनही कोणत्याही प्रकारची दखल नघेतल्याने व औंधसह सोळा गावातील सुमारे पंचवीस हजार, ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या भावनांशी सातारा पाटबंधारे विभाग व उरमोडी विभाग खेळत असल्याने संबंधितांच्या मनमानी कारभाराविरोधात व औंधसह सोळा गावांचा शेती पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी औंधसह सोळा गावे बुधवार दि.पाच फेब्रुवारी रोजी बंद ठेऊन,मुंडन आंदोलन करून मनमानी अधिकार्यांच्या कारभाराचा
निषेध करणार आहे.

त्याचबरोबर त्यानंतर जलसंपदा विभागाच्या सातारा व पुणे येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय जगदाळे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. याबाबतची लेखी निवेदने शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना पाठविण्यात आली आहेत.