Your Own Digital Platform

अजिंक्यतारा कारखान्याचा वजन काटा अचूक


स्थैर्य, सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार सौ. आशा होळकर यांच्या नेतृत्वाखालील वैधमापन शास्त्र निरीक्षकांच्या भरारी पथकाने कारखाना स्थळावर येवून कारखान्याच्या वजन काट्यांची तपासणी केली. यावेळी कारखान्यातील १०, ३० व ४० टनी वजनकाटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवत असल्याचे अहवाल प्रमाणपत्र कारखान्यास दिले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.
 
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, तहसीलदार सौ. होळकर यांच्या नेतृत्वातील वैधमापन शास्त्र निरीक्षक एस. बी. सावंत, डी.जी. कांबळे, पुरवठा निरीक्षक एस.बी. दळवी, उपलेखा परीक्षक एस.एन. वाघमळे, मंडल अधिकारी नितीन घोरपडे, तलाठी अशोक साबळे, आदी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने शुक्रवार दि. २४ रोजी अचानक कारखाना स्थळावर येऊन वजन काट्यांची तपासणी केली. यावेळी कार्यकारी संचालक देसाई, शेती अधिकारी विलास पाटील, केनयार्ड सुपरवायझर प्रमोद कुंभार, नितीन भोसले व कारखान्याचे अधिकारी हजर होते. यावेळी बैलगाडी क्र. ३१०१६, ट्रॅक्टर क्र. एम.एच. झेड ६२३०, एम.एच. ११- ४९१२ आदी वाहनांची फेर वजन केली. त्यावेळी वजने बरोबर असल्याची खात्री करून घेतली. तसेच वजन काट्यावर २० किलो प्रमाणित वजने ठेवून काट्यांची तपासणी केली. तसेच वाहनांमधील उसाचे वजन इलेकट्रोनिक वे ब्रिज इंडिकेटरला तंतोतंत असल्याचे दिसून आले व संपूर्ण ऊस वजनकाटे अचूक वजन दाखवत असल्याचे सर्वां समक्ष आढळून आले. यानंतर वैधमापन अधिकारी सावंत यांनी काटा अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले.
 
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कामकाज करत असलेल्या अजिंक्यतारा कारखान्यातील ऊस वजन काट्यांची तपासणी शासनाच्या वैधमापन खात्यामार्फत दरवर्षी नियमितपणे केली जाते. त्यामुळे वजनकाटे तंतोतंत वजन दर्शवित असल्याने ऊस वजनाच्या बाबतीत ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांचा कारखान्यावर पूर्णपणे विश्वास आहे, असे कारखान्याचे चेरमन सर्जेराव सावंत आणि व्हा. चेरमन विश्वास शेडगे यांनी सांगितले.