Your Own Digital Platform

दोन हजारांची लाच घेताना पोलिस हवालदारास रंगेहाथ पकडलेस्थैर्य, सातारा : .कोर्टाच्या जप्ती वॉरंटप्रमाणे कारवाई न करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी राजवाडा बसस्थानकाजवळ रंगेहाथ पकडले. विश्वास दत्तात्रय सपकाळ असे पोलिसाचे नाव आहे.
 
याबाबत माहिती अशी, संबंधित तक्रारदार याच्यावर कोर्टाचे जप्ती वॉरंट होते. या वॉरंटनुसार कारवाई न करण्यासाठी पोलिस हवालदार विश्वास दत्तात्रय सपकाळ वय- 51 वर्षे, रा. शुक्रवार पेठ, सातारा याने तक्रारदाराकडे 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने याची रितसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. त्यानंतर अँटीकरप्शनचे पोलीस अधीक्षक (पुणे) राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, निलेश वायदंडे मारुती अडागळे यांच्या पथकाने राजवाडा बसस्थानकाजवळ सापळा लावला. याठिकाणी लक्ष्मी रसवंती गृहा समोर लाचेची दोन हजारांची रक्कम स्वीकारता या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले.
 
याप्रकरणी हवालदार विश्‍वास सपकाळ याच्यावर दोन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.