आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

Karad | सातारा जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक महिनाभरात

एस. एम. देशमुख यांची माहिती :
अध्यक्षपदाचा कार्यकाल फक्त दोन वर्षाचा ;
कारभार लोकशाही पद्धतीनेचस्थैर्य, कराड : मराठी पत्रकार परिषद ही ८१ वर्षाची जुनी पत्रकार संघटना आहे. संघटनेचा कारभार लोकशाही पध्दतीनेच चालतो. परंतू एखादा जिल्हासंघ पाच-दहा वर्ष निवडणुका घेत नसेल आणि एकाच पदाधिकाऱ्याला आपण तहयात अध्यक्ष राहवे, असे वाटत असेलतर तशी तरतूद परिषदेच्या घटनेत नाही. आणि जिल्हा पत्रकारसंघात असण्याचेही काही कारण नाही. आपण लोकशाही मानणारे सर्व असून लोकशाही पध्दतीने कारभार चालला पाहिजे, असा उपदेश समाजाला करतो. त्यामुळे परिषद कधीही हुकूमशाही पध्दतीने कारभार करू शकत नाही, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.

दरम्यान, परिषदेच्या घटनेत दर दोन वर्षांनी अध्यक्ष व पदाधिकारी बदलाची तरतूद आहे. मी मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष असताना माझी दोन वर्षांची टर्म संतपताच बाजूला झालो. जे नियम परिषदेला आहेत, तेच नियम जिल्हा पत्रकार संघाला देखील आहेत. याबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही, असेही देशमुख यांनी सांगितले.

पत्रकार संरक्षण कायदा करण्यात प्रमुख भुमिका बजवणारे मराठी पत्रकार परिषदचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा सपत्नीक सत्कार कराड तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दैनिक ऐक्यचे सहसंपादक प्रा. अशोक चव्हाण, दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील, दैनिक पुढारीचे कार्यालय प्रमुख सतीश मोरे, लोकमतचे कार्यालय प्रमुख प्रमोद सुकरे, सामनाचे प्रतिनिधी गोरख तावरे, कर्मयोगीचे कार्यकारी संपादक खंडू इंगळे, ग्रामोधारचे तालुका प्रतिनिधी पत्रकार दिलीप भोपते, यशवंतनगरीचे संपादक विकास भोसले, स्वप्ननगरीचे प्रकाश पिसाळ, नितीन ढापरे, शरद गाडे, अमोल चव्हाण, पराग शेणोलकर, सुभाष देशमुखे, दीपक पवार, विशाल पाटील, विश्वास मोहिते, सकलेन मुलाणी, तन्मय पाटील, रूपाली जाधव, प्रियांका पाटील आदी पत्रकार उपस्थित होते. दरम्यान, यावेळी पराग शेणोलकर, खंडू इंगळे, दिलीप भोपते यांनी जिल्हा पत्रकार संघासह तालुका पत्रकार संघातील निवडी व जिल्हासंघाच्या कार्य पध्दतीविषयी आक्षेप नोंदवले. तर प्रा. अशोक चव्हाण, गोरख तावरे यांनी मनोगत व्यक्त केले.

एस. एम. देशमुख म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकारसंघाचे हरिष पाटणे ज्यावेळी पहिले अध्यक्ष झाले. त्यापूर्वी सात ते आठ वर्ष जिल्हा पत्रकारसंघ अस्थित्वातच नव्हता. पत्रकारितेशी संबंधित सर्वांना सभासद करून घेण्याच्या परिषदेकडील तरतूदीनुसार सभासद म्हणून कोणाला नाकरण्याचा प्रश्नच येत नाही. यानुसार सातारमध्ये सुमारे ४२० लोकांची वर्गणी जमा करून त्यांची सभासद नोंदणी करण्यात आली आहे. परिषदेची जी घटना आहे, त्यामध्ये दर दोन वर्षांनी अध्यक्ष व पदाधिकारी बदलण्याची तरतूद आहे. परंतू परिषद प्रत्येक जिल्हयात येऊन हस्तकक्षेप करत नाही. जिल्हा पत्रकारसंघाने स्वतः निवडणुका घ्यायच्या आणि परिषदेला नवनविर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी नियुक्त झाल्याचे परिषदेला कळवावे, अशी पध्दत आहे.

निवडणुका तटस्तपणे, पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी परिषद आपला एक निरीक्षक तेथे पाठवते, अशी परिषदेची भुमिका आहे. परंतू एखादा जिल्हासंघ पाच-पाच, दहा-दहा वर्ष निवडणुकाच घेत नसेल आणि एकाच पदाधिकाऱ्याला आपण तहयात अध्यक्ष राहवे, असे वाटत असेलतर तशी तरतूद परिषदेच्या घटनेत नाही. आणि जिल्हा पत्रकार संघातही असण्याचे काही कारण नाही. आणि परिषद हुकूमशाही पध्दतीने कारभार करत नाही.

देशमुख म्हणाले, ज्यावेळी सातारा जिल्हा पत्रकारसंघाच्या नियुक्त्या झाल्या. त्याचवेळी सदस्यांची नोंदणी झाली. नोंदणी झाल्यानंतर एक महिन्याच्या आत रितसर निवडणुका घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र वेगवेगळया कारणामुळे ही प्रक्रीया पार पडली नाही. सध्या कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे येथील निवडणुका घेण्याचे काम होते. यासाठी सदस्यांनीही त्यांच्यावर दबाव आणणे क्रमप्राप्त होते. ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हयात परिषद लक्ष घालू शकत नाही. गेल्या सहा वर्षात सातारा जिल्हा पत्रकारसंघाच्या पदाधिकारी बदलाबाबत कोणीही परिषदेला विचारणासुध्दा केली नाही. कराडमध्ये ही खदखद दिसून आली आहे. तसेच जिल्ह्याच्या अन्य ठिकाणीही असल्याचे दिसून येत आहे. मी सातारला विविध कार्यक्रमाकरिता वारंवार आलो आहे. पाटणलाही राज्यस्तरीय मेळावा घेतला होता. यात सातारा जिल्हा पत्रकारसंघाची काय भुमिका होती, हा वेगळा विषय आहे. मात्र पाटणच्या पत्रकारांनी तो मेळावा अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पाडला.

ते पुढे म्हणाले, हे सर्व होत असताना जिल्हासंघाने स्वतःहून पुढाकार घेऊन निवडणूक घ्यायला पाहिजे होती. आपली टर्म संपल्यानंतर कार्यकारणी स्वतःहून राजिनामा देते. निवडणुका घेते आणि रितसर नियुक्त्या होतात. साताऱ्यात मात्र असे होत नसेलतर निश्चितपणे परिषद आपली भुमिका घेईल. एक महिन्याच्या आत आपल्याला रिजल्ट दिसेल. हे राजकीय पुढाऱ्याप्रमाणे दिलेले आश्वासन नाही. आणि बोलायचे म्हणूनही बोलत नाही. त्यामुळे एक महिन्याच्या आता सातारचा निकाल लागलेला आपल्याला दिसेल, अशी माहिती एस. एम. देशमुख यांनी यावेळी दिली.

लोकशाही पध्दतीने कारभार व्हावा..
"न भुतो ना भविष्यती" असे काम मराठी पत्रकार परिषदेने करून दाखवले आहे. राज्यातील पत्रकार व त्यांच्या संघटनांचा एकोपा एस. एम. देशमुख यांनी घडवून आणला आहे. पत्रकारांना संरक्षण मिळवून दिले आहे. परंतू, कायदा काय आहे, त्यातील तरतुदी काय आहेत, कायद्यात सर्वच पत्रकारांचा समावेश आहे का? मालक लोकांची भुमिका काय राहणार आदी माहितीपासून अनेक पत्रकार अनभिज्ज्ञ आहेत. तसेच संघटनात्मक काम करत असताना अनेक तांत्रिक अडचणी आहेत. अनेक लोकांचे मतभेद आहेत. संघटनेच्या कामकाजात अनेक त्रुटी आहेत. सातारा जिल्हा पत्रकारसंघाची तर गेल्या सहा वर्षात सर्वसाधारण सभाही झालेली नाही. कार्यकारणीची बैठक झालेली नाही. पाटणला राज्यातील सर्व तालुका अध्यक्षांचा राज्यव्यापी मेळावा झाला. या मेळाव्यात जिल्हा पत्रकारसंघाचे योगदान शुन्य असल्याचे दिसून आले. हे सर्व विश्वस्त म्हणून आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आणि परिषदेचा एक सदस्य म्हणून या गोष्टी आपल्यासमोर मांडत आहे. सातारा जिल्हयात पाच ते सहा पत्रकारांचे निधन झाले. काही अपवाद वागळता अन्य मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा संघाकडून झाल्याचे दिसून आले नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जिल्हा पत्रकारसंघाची कार्यकारणी तहयात आहे की काय? आपण संविधानिक पध्दतीने काम करतो. राज्यघटना मानत असू तर मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार पदाधिकारी निवडी झाल्या पाहिजेत, अशी मागणी पत्रकार पराग शेणोलकर यांनी केली.

कराड तालुक्यातील निवडीवर प्रश्नचिन्ह..
 मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकानिहाय करण्यात आलेल्या पदाधिकारी निवडी लोकशाही पध्दतीने झालेल्या नाहीत, आणि लाडलेल्या निवडी आम्ही मान्यही करत नाही. मात्र परिषदेचे काम चांगले असल्याने आम्ही परिषदेबरोबरच आहे. कराड तालुक्यासाठी करण्यात आलेल्या निवडीवेळी प्रचंड गोंधळ झाला. या निवडी सर्वानुमते व लोकशाही पध्दतीने झालेल्या नाहीत. त्यामुळे संघटना वाढवायची की बंदी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनमानी पध्दतीने नियुक्त्या करण्यामुळे संघटनेने काही किंमत राहणार नाही, अशी भुमिका जेष्ठ पत्रकार दिलीप भोपते यांनी मांडली.

संघटनेच्या कार्यपध्दतीमध्ये त्रुटी..
सातारा जिल्हा पत्रकारसंघाच्या निवडी वेळीचा मी स्वतः परिषदेचा सदस्य आहे. तालुका असो जिल्हा पदाधिकारी यांच्या निवडी लोकशाही पध्दतीने व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे. तळागाळातील पत्रकाराला विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठ पातळीवरून पदाधिकारी निवडी झाल्यातर तळागाळात काम करणारा पत्रकार नाराज होतो, दुखावतो. आणि नवीन पर्याय शोधतो. त्यामुळे संघटनांची संख्या वाढत आहे. यामुळे मराठी पत्रकार परिषदेला याचा मोठा तोटा होत आहे. आपल्या संघटनेच्या कार्यपध्दतीमध्ये काही त्रुटी आहेत का तर त्या शंभरटक्के आहेत. या त्रुटींची दुरूस्त करून लोकशाही पध्दतीने संघटनेचे कामकाज होण्यासाठी विश्वस्त म्हणून आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी पत्रकार खंडू इंगळे यांनी केली.


जिल्हा पत्रकारसंघाची पुर्नबांधणी करा
मराठी पत्रकार परिषद म्हटले की एस. एम. देशमुख, अशी त्यांची ओळख. ही परिषद सातत्याने वादाच्या भोवऱ्यात होती त्यावेळी त्यांनी परिषदेचे काम हाती घेतले. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी महाराष्ट्रातील पहिले आंदोलन कराडमध्ये झाले आहे. जिल्हा व तालुका पत्रकारसंघाच्या निवडी करताना जो काय गोंधळ झाला, तो संपूर्ण जिल्हयाला माहीत आहे. आमची नावे तर परस्पर जाहीर झाली. मात्र, आजअखेर मी कोणत्याही व्यासपीठावर गेलो नाही. जिल्हासंघाने कार्यकारणी अथवा पदाधिकारी यांची कधी बैठक सुद्धा बोलवली नाही. आमची नावे यांनी जाहीर केली ती कुठून झाली, कशी झाली? या खोलात न जाता सातारा जिल्हा पत्रकारसंघाची पुर्नबांधणी चांगल्या पध्दतीने करा, अशी मागणी पत्रकार शशिकांत पाटील यांनी केली.

मृत पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी निधी उभारा...
पत्रकार अरूण देशमुख यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुढारी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढारी परीवाराने चांगले प्रयत्न केले. पत्रकारसंघाच्या एकीमुळे ते शक्य झाले. जिल्हयात अजून काही पत्रकारांच्याबाबत दुःखद घटना घडल्या आहेत. त्या सर्वांपर्यंत कदाचित सर्वांना मदत पोहचविता आली नसेल. अशा घटना राज्यातही घडल्या आहेत. अशा पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्यपातळीवर मदत निधी मिळवा यासाठी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करावा, अशी मागणी पत्रकार सतीश मोरे यांनी केली.


इलेक्ट्रिक मिडियालाही संघटनेत सामाहून घ्या..
मराठी पत्रकार परिषद सध्या प्रिंटमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी काम करत आहे. यासोबत इलेक्ट्रॉनिक मिडियालाही आपण परिषदेत सामाहून घ्यावे, अशी मागणी पत्रकार विकास भोसले यांनी केली.