Your Own Digital Platform

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा: राज ठाकरे


स्थैर्य, सातारा : मुंबईत रंगशारदा येथे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पण राज ठाकरे यावेळी बैठकीत केवळ १० मिनिटे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. 'मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान फक्त बाळासाहेबांचा आहे', अशी ताकीद राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे. 

मुंबईत येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसेने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मोर्चा भव्य होईल, या उद्देशाने तयारीला लागण्याच्या सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय, मोर्चात काही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी देखील घ्यायला सांगितली आहे. मनसेच्या नव्या झेंड्याचा अर्थात शिवरायांची राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा अनादर होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश राज यांनी दिले आहेत. 

राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने ते बैठकीतून अवघ्या १० मिनिटांत निघून गेले. त्यानंतर पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी बैठकीला संबोधित केल्याचे समजते. तर मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात असल्याचं, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.