Your Own Digital Platform

महाराजसाहेब, रणजितदादा फलटणकरांना भेडसावत आहेत अनेक समस्या


स्थैर्य, फलटण (प्रसन्न रूद्रभटे) : नागरिकांच्या मूलभूत समस्या जसे की पाणी, रस्त्यावरचे खड्डे, वाहतूक, गुन्हेगारी हे राजकारणात कळीचे मुद्दे बनले आहेत. या समस्यांवर येत्या काळात योग्य त्या उपाययोजना करण्यात यावी अशा नागरिकांच्या मागण्या आहेत. फलटण शहराचा मोठ्या प्रमाणात विकसित होत असताना अनेक प्रश्न नव्याने उपस्थित होत आहेत. फलटणसह फलटणच्या बाजूला असणाऱ्या कोळकी व जाधववाडी या गावांची आता शहराकडे वाटचाल होत असताना लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मूलभूत सोयीसुविधांची कमतरता भासत आहे. यंदा पाऊस पुरेसा होऊनही फलटण शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, गुन्हेगारी आदी समस्या येत्या काळात सोडवल्या जाव्यात अशी मागणी फलटणकर व्यक्त करीत आहेत. गत वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पडली निवडणूक असली की सर्वच मुद्द्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते परंतु निवडणूक झाल्यावर नागरिकांच्या प्रश्नाकडे कोणीही ढुंकून पाहत नाही. निवडणूक झाल्यावर आपल्या कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावली जातात परंतु मूलभूत समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही.

फलटण नगरपालिकेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे एकहाती सत्ता आहे. परंतु नगरपालिकेत गटातील अंतर्गत वादामुळे बहुतांश कामे मागे पडतात किंवा मागे टाकली जातात तरी आगामी काळात जर नागरिकांना गृहीत धरले तर नागरिक काहीही करू शकतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे विधानसभा निवडणुकीसोबत झालेली सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक, नागरिकांना जर गृहीत धरले तर दगा फटका होवू शकतो. आता नगरपालिकेत श्रीमंत रामराजे गटाचे बरेच सदस्य आहेत. तर लोकनियुक्त नगराध्यक्ष असे मिळून त्यांची तगडी टीम आहे तरी आगामी काळात जर तिसरी आघाडी तयार झाली तर नक्कीच सत्ताधारी गटाला फटका बसेल यात तिळमात्र शंका नाही.

'स्थैर्य' ने केलेल्या 'ग्राउंड रिपोर्ट' अंतर्गत फलटण शहर व तालुक्यातील काही जाणत्या नागरिक आणि उद्योजकांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी जो कोणी आमची कामे करेल व मूलभूत प्रश्न सोडवेल त्यांच्या सोबतच आम्ही राहू. आमच्या प्रश्नांकडे कोणीही दुलक्ष होऊ नये,' ही अपेक्षा व्यक्त केली.

शहरातील व्यावसायिक म्हणाले, 'आताच्या सत्ताधारी यांच्याकडून सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या, असे म्हणता येणार नाही. काही चांगल्या कामांची सुरुवात झाली आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून धोम बलकवडी प्रकल्प, कमिन्स सारखी मोठी कंपनी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे प्रत्यक्षात सुरू केली असली तरी याचबरोबर नागरिकांना मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. शहरात या आधी पाण्याची समस्या नव्हती. शहरात दररोज पाणी होते. सध्या नियोजनाचा अभाव आणि बेशिस्त कारभारामुळे पाणी समस्या वारंवार उद्भवत आहे.

प्राध्यापक गायकवाड म्हणाले, 'नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. खड्डे, पाणी प्रश्न या मूलभूत बाबींची पूर्तता व्हावी. सक्षम उमेदवाराला निवडून देणे नागरिकांचे कर्तव्य आहे.' उद्योजक शिंदे म्हणाले, 'मागील काही वर्षाच्या तुलनेत या सत्ताधारी मंडळींनी चांगले काम केले आहे. धोम बलकवडी आणि कमिन्स मुळे आपल्या इथे रोजगार निर्माण झाला आहे तर रेल्वे सुरू झाल्यामुळे अल्प दरात प्रवास करणे आता सोपे झाले आहे. येत्या काळात सत्ताधारी मंडळी तरुणांचे प्रश्न सोडवील अशी आशा आहे.'

फलटण मध्ये प्राचीन मंदिरे आहेत. या ठिकाणी काही आवश्यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या समस्या सोडवून चांगले काम करण्याची गरज आहे. 'स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना कचरा, पाणी, समस्या याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी विशेष लक्ष द्यावे. अशी मागणी उद्योजक गावडे यांनी केली.

नागरिकांच्या सत्ताधारी मंडळी कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला हवे. 'शहरातील सोसायट्यांच्या अनेक समस्या आहेत. मतदान सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय नागरिकांना अपेक्षित असणारा बदल होणार नाही. सध्या पाणी समस्या वाढते आहे. येत्या काळात योग्य नियोजनाने ही समस्या सोडवणे शक्य होईल अशी आशा आहे.

फलटण तालुक्यात कमिन्स सारखी कंपनी आली असली तरीही तरुणांना रोजगार नाही, ही खंत आहे. आर्थिक मंदीमुळे झालेल्या 'ब्लॉक क्लोजर'मुळे स्थानिक कामगारांच्या समस्या वाढल्या आहेत.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आहेत व नुकतेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती पण आहेत. त्या सोबत केंद्रात सध्या भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे व आपले खासदार हे भारतीय जनता पार्टी मधून निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या कमिटी मध्ये घेतलेले आहे. दोघांनी आपापल्या वरिष्ठांच्या मागे लागून फलटण शहर व तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावावीत एवढीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे.