Your Own Digital Platform

साहित्यामध्ये शेतक-यांच्या कथा आणि व्यथा येणे गरजेचे – संमेलनाध्यक्ष सचिन प्रभुणेमसाप, शाहुपुरी आयोजित शिवार साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्थैर्य, सातारा : ‘नको मारू बाता शहरी बोळात राजा...... येऊन एक दिवस बघ माळात माझ्या.... ‘अशा वातावरणात अतित येथील प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब लोहार यांच्या शिवारात मसाप पुणे आणि मसाप शाहुपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवार साहित्य संमेलन फुलले. स्थानिक कवी आणि शेतक-यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिवार साहित्य संमेलन चांगलेच रंगले. यावेळी संमेलनाध्यक्ष सचिन प्रभुणे यांनी शेतकरी आणि साहित्यामध्ये एक साम्य असून ते म्हणजे दोघेही निर्माते आहेत. दोघांच्या कथा आणि व्यथा एकसारख्या आहेत. शेतकरी हाच खरा राजा असून अलीकडच्या काळात हे तो विसरत चालला आहे. शेतक-यांनी नैराश्य झटकून राजासारखं वागावं. तसेच साहित्यामध्ये शेतक-यांच्या कथा आणि व्यथा येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

साहित्याचा प्रसार गावोगावी व्हावा या भूमिकेतून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने शिवार साहित्य संमेलन ही नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. मसाप पुणे आणि मसाप शाहुपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी सायंकाळी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब लोहार यांच्या शेतावर शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करुन संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी संमेलनाध्यक्ष सचिन प्रभुणे, कृषिभूषण मनोहर साळुंखे, मसाप, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब लोहार यांच्या पत्नी सौ. कमल लोहार आणि डॉ.सुधाकर बेंद्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संमेलनाचे उद्घाटक कृषिभूषण मनोहर साळुंखे म्हणाले, पारंपारिक पध्दतीने शेती करण्याचे दिवस संपले आहेत. गटशेतीच्या माध्यमातून बळकटी मिळू लागली असून शेतीमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची गरज आहे. शेतक-यांनी ज्ञानार्जन करणे आवश्यक असून तंत्रशुध्दता आवश्यक आहे. विक्री व्यवस्थेची माहिती आवश्यक असून नॅनो टेक्नॉलॉजी आली आहे त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. आजही व्यवसाय आणि नोकरी यापेक्षा शेती श्रेष्ठ असून कमी कालावधीत जास्त उत्पन्न फक्त शेतीच देऊ शकते. छोटया तसेच सर्व शेतक-यांनी ज्ञानार्जन घेण्यासाठी कमीपणा मानू नये. ऊसापेक्षा फळे, भाजीपाला याकडेही लक्ष देऊन चुका दुरुस्त करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. शेतक-यांनी उपलब्ध असलेल्या जमिनीच्या प्रत्येक इंचा इंचामधून उत्पादन करण्याची हिमंत बाळगली पाहिजे असे आवाहन केले.

संमेलनाध्यक्ष सचिन प्रभुणे यांनी शेतकरी हाच खरा राजा आहे परंतु तो ते विसरला आहे. सध्या शेतीबद्दल असणारी परिस्थिती पुढील पाच वर्षात बदलेल. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतीशील आहे ते समाजसुधारकांमुळे. शेतक-यांना अनुदानापेक्षा 24 तास पाणी आणि वीज गरजेची आहे. अलीकडच्या काळात गटशेतीमुळे फायदा होत आहे. शेतकरी आणि साहित्यामध्ये साम्य आहे, त्यामुळे साहित्याच्या प्रत्येक व्यासपीठावर शेती या विषयावर परिसंवाद आला पाहिजे. शेतक-यांच्या प्रगतीशील कथा आणि त्यांच्या व्यथा साहित्यात आल्या पाहिजेत. शेतीतून चांगल्या पध्दतीने पैसे मिळू शकतात परंतु त्यासाठी शेतीमध्ये वेळ दिला पाहिजे आणि असे झाले तर शेतीतून बाहेर पडण्याचा विचार शेतकरी सोडून देईल. शेतामध्ये कुटुंबातील महिलांचेही तेवढेच योगदान असते त्यामुळे त्यांनाही उत्पन्नातील काही भाग देण्याचा पायंडा शेतक-यांनी पाडावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

प्रास्ताविकात मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी शिवार साहित्य संमेलन आयोजित करण्याची भूमिका सांगितली. मसाप, शाहुपुरी शाखेचे उपाध्यक्ष अजित साळुंखे यांच्या नियोजनाखाली पुढील पाच वर्षात 25 शिवार साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मराठीबाबत काहीतरी चांगली होण्याची अपेक्षा महाराष्ट्रातील नवीन सरकारकडून आहे. जिल्हयातील प्रगतशील शेतक-यांनी संमेलनाची निमंत्रणे मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनानंतर शिवारामध्येच बाजरीची भाकरी, भरले वागं, पावटयाची आमटी, भात, कांद्याची पात आणि विविध पदार्थांच्या स्नेहभोजनाचा उपस्थित सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.

संमेलनाचे सूत्रसंचालन मसाप, शाहुपुरीचे उपाध्यक्ष अजित साळुंखे यांनी केले. आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. संमेलनासाठी वजीर नदाफ, सागर गायकवाड, श्रीकांत के.टी. चित्रकार तारु, अॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, सचिन सावंत, पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. संमेलन यशस्वी होण्यासाठी मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, दि गुजराथी अर्बन को-ऑप सोसायटीचे कर्मचारी, प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब लोहार यांचे कुटुबियांनी सक्रीय सहभाग घेतला. 

कवी संमेलनामुळे शिवार साहित्य संमेलनामध्ये रंगत

प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी शिवार साहित्य संमेलनात खरी रंगत आली ती विविध कवींनी सादर केलेल्या कवितांमुळे. डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी ‘फास’, ‘माळ पुन्हा उजाड झाला’, सुहास चव्हाण यांनी ‘दिल्लीत उठलेले वादळ’, प्रमोद मोहिते यांनी ‘माझं शिवार’, ‘चिऊ मरुनीया गेलीय पाणी शोधीत तळयात’, डॉ. उमेश करंबेळकर यांनी ‘आताशा’, शाहीर थळेंद्र लोखंडे यांनी ‘नका मारु बाता शहरी बोळात राजा’, ‘चलं ग चिऊताई एक कविता करु’, ‘शेतकरी पोरा तुला कसं कळत नाही, अवकाळी पाऊस लेका खुळा म्हणून पडत नाही’, ‘सांगा एक दिवस शेती संपावर गेली तर’ आणि ‘खरा महाराष्ट्र बोलतो आहे’ गणेश उत्तेकर यांनी ‘बाप’, अजित जाधव यांनी ‘लेक परक्याची कमाई’ या सादर केलेल्या कवितांना उपस्थित शेतक-यांनी आणि मान्यवरांनी भरभरुन दाद दिली. कवितांच्या या सादरीकरणांमुळे शिवार साहित्य संमेलन हे नाव ख-या अर्थानं सार्थ झालं.