Your Own Digital Platform

...पुन्हा अश्रू अनावर झालेपाटण तालुक्यातील गुढे गावची दहावीत शिकत असलेली एक हुशार, हसमुख, कुशाग्र बुद्धी तसेच शालेय कार्यक्रमात उत्तम वक्तृत्व असे चांगले सुप्त गुण अंगीकृत असलेली कन्या कै. कुमारी समृद्धी भरत कदम (भक्ती) हिने सर्वांचा निरोप घेतला. याला आज (१२ जानेवारीला) एक वर्ष पूर्ण होत आहे. तिच्या अपघाती निधनानं आजही, गुढे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण पाटण विभाग हळवा होत आहे. "मरावे पण किर्तीरुपी उरावे" या उक्तीनुसार समृद्धी तु फक्त शरीराने आमच्यातून गेली आहेस. तुझ्या अप्रतिम इच्छा-आकांक्षा, आठवणी आजही आमच्यात जिवंत आहेत.

आई मला जगायचं होतं ग...

आई आज माझ्या आठवणीनं तुझं काळीज पुन्हा फाटलं असेल...खूप वाटतंय दररोज फुटणारा तुझा अश्रूंचा बांध अडवून धरावा... तुझ्या उराशी बिलगून रहावं...पण काय करू नियतीला ते मान्यचं नाही ग...पोटचं लेकरू गेल्यावर आईचा जीव किती कासावीस होतो हे मला कळतंय ग आई...पण माझ्याकडून आता फक्त भावनाच व्यक्त होऊ शकतात ग आई...तू रडू नकोस आई ...तू रडलीस तर तुझ्या डोक्यावरचं छत्र आणि पंखाखाली असलेली दोन पाखरं यांचा धीर खचून जाईल ग आई.

बाबा माझं स्वप्न अपुरं राहिलं हो...

बाबा माझ्या जाण्यानं तुमच्या काळजाची ओल थोडीदेखील कमी झालेली नाही...पडद्यामागील बाबांचं प्रेम काय असतं, हे मी तुमच्याकडून अनुभवलंय बाबा...आठवतंय तुम्हाला आपल्या गुढे गावाची ती दरड...होय तोच उतार असलेला कच्चा रस्ता; मला तुम्ही शाळेला सोडायला यायचा...तिथे तुम्ही दगडावरून एकदा पाय घसरून पडला होतात...माझ्या बाबांना दुखापत झालेली मला कशी सहन होईल...त्याचंवेळी मी तुम्हाला म्हंटल होतं ना... मी मोठी अधिकारी होईन...आणि आपला गावची जनसेवा करेन..."एक गावं एक गणपती" असं गावं करीन...पण काय करू माझ्या स्वप्नातील रंग उडलेत ना बाबा...झेप घेण्यापूर्वीच नियतीने माझे पंख छाटलेत ना बाबा...माझं स्वप्न खुप अंधारात गेलंय हो...ते उजेडात येईल का? बाबा.

जान्हवी ताई घट्ट पकडलेला हात सैल झाला ग...

जान्हवी दीदी तुझ्याविना मी नेहमी अपूर्णच ग...तू सी.ए होशील; मी तहसीलदार होईन, अशी घट्ट हात मिळवणी आपली...दीदी हात सैल झाला ग माझा ...रागावू नकोस...रडू नकोस...तुझ्या स्वप्नात जीव घुटमळतोय आजही...पुर्ण करशील ना ग? दीदी.

'जय' आता रागवणार नाही रे तुझ्यावर...

माझा भाऊ जय नेहमी तू म्हणायचा ...समृद्धी दीदी तू मला नेहमी रागावते... अरे आपल्या माणसांवर रागावायची मी... माझा राग नेहमी तुझ्या भल्यासाठी असायचा रे...रक्षबंधनाची गाठ अशी-कशी सुटुली रे...जय आता राखी बांधू कशी रे तुला?

माझ्या हक्काचं दुसरं घर दिसेनासं झालं...

होय माझी शाळा हेच माझं हक्काचं दुसरं घर...जिथे मी जास्त वेळ घालवायची...जिथे आईनंतरचे दुसरे गुरू म्हणजे चांगले शिक्षक लाभले मला... ज्यांच्याकडून मला चांगली वर्तणूक, चांगली ज्ञानसंपदा मिळाली...माझ्या स्नेहसोबती मित्र- मैत्रिणी भेटल्या...आता सर्वजण हळवे झाले असतील...म्हणत असतील नेहमी सोबत खेळणारी, रमणारी, अभ्यास करणारी, प्रत्येक शालेय कार्यक्रमात सहभागी असणारी आमची समृद्धी अर्ध्यावर प्रवास सोडून गेली...प्रवास दूरवर करायचा होता मला...आपल्या सर्वांचे स्नेहबंध व ऋणानुबंध तोडायचे नव्हते मला...हुंदका पुन्हा येतोय पण आर्त हाक देवू कशी तुम्हाला?

या होत्या; आमच्या सर्वांच्या लाडक्या समृद्धीच्या भावना. प्रत्येक माणूस जन्माला येतो तसे त्याला परतीच्या प्रवासालाही एक ना एक दिवस जायचेच आहे. मात्र समृद्धीचं आपल्याला सोडून जाण्याचं वय नव्हतं. पण एखादी घटना घडणारच असेल त्याला कोणीही रोखून धरू शकत नाही. हा निसर्ग नियम आहे. परंतु ती व्यक्ती गेल्यावर तिच्या कुटुंबियांना धीर देणं हे आप्तेष्ट, नातेवाईक आणि ग्रामस्थ यांचे प्राथमिक काम आहे. मात्र समाजात अजूनही काही अपवाद कुप्रवृत्तीची तसेच नीचतम पातळीच्या पलीकडे जाणारी माणसं वावरताना दिसत आहेत. त्यांना माणसाच्या मृत्यूविषयी जास्त दुःख नसून पीडितांच्या परिवारास किती (नुकसान भरपाई) आर्थिक लाभ झाला हे जाणून घेण्यात जास्त स्वारस्य आहे; असो आपण त्यांना माफ करूया. कारण समोरच्यामध्ये जर बदल होत नसेल तर आपल्यात बदल करून घेणं कधीही योग्य. प्रत्येक माणूस हा जगत असतो तो शेवटचा दिवस गोड होण्याकरिता. जीवनात तो अनेक परीक्षा देत असतो मात्र त्याचा खरा व अंतिम निकाल स्मशानात असतो. मात्र तो निकाल पाहायला तो नसतो. त्यामुळे तो पास असूनही नापास असतो. यासाठी जिवंतपणीच एकमेकांविषयी स्नेह, आपुलकी, माणुसकी तसेच एकजूट या भावना रुजल्या पाहिजेत जेणेकरून खऱ्या अर्थाने जीवन जगत असल्याचा सार्थ अभिमान वाटेल.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागास एक विनंती आहे. शासन नियमावली नुसार शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेकडून जीवन विमा उतरावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेनुसार अद्यावत सुविधा उपलब्ध कराव्यात. जसे कि शालेय कालावधीमध्ये प्रवास करताना महाराष्ट्र शासनाच्या परिवहन एस. टी मध्ये सी.सी.टी. व्ही कॅमेरे, बस थांब्यावर सी.सी.टी.व्ही कॅमेरे, एस. टी नियोजित वेळेत येते-जाते याबाबत माहिती, विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य, विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर निवारण आदि विषयांवर प्रस्ताव तयार करावा. आणि तो शासनास पाठवून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत. सरतेशेवटी लिहिण्यासारखं खूप काही आहे; परंतु लिखाणाचं आकलन होणंही तितकंच गरजेचं आहे कारण "शहण्याला शब्दाचा मार" सर्वांच्या लाडक्या समृद्धीस (भक्तीस) भावपुर्ण श्रद्धांजली

शब्दांकन - संतोष कदम

संपर्क - 8484838273

santoshr.kadam@gmail.com