Your Own Digital Platform

स्वाभिमान दिवसासाठी एकवटले सातारकरजिजाऊंच्या लेकींनी आणली शिवतीर्थावर ज्योत अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण 


स्थैर्य, सातारा : पहाटेचा थंडगार वारा.... किल्ले अजिंक्यताऱयाला बांधलेले तोरण... ज्योत पेटवून धावणारे सातारकर, भगवे ध्वज-पताका अन् विविध वेशभुषा परिधान केलेले चिमुकले यामुळे राजसदरेवर जणू काही शिवकाल अवतरला होता. निमित्त होते, ‘सातारा स्वाभिमान दिवसा'चे... छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले अजिंक्यताऱयावर 12 जानेवारीला झाला. तो दिवस स्वाभिमान दिवस म्हणून सातारकरांनी मोठय़ा दिमाखात साजरा केला. यानिमित्ताने छत्रपती शाहू महाराजांना, माँ साहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो सातारकरांची भल्या पहाटे किल्ले अजिंक्यताऱयावर उपस्थिती होती. अवघ्या काही लोकांपर्यंत सुरू झालेला हा दिवस आता हजारोंच्या उपस्थितीत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
 
इतिहासात मराठय़ांनी जे अटकेपार झेंडे लावले. त्या मोहिमेचा आदेश साताऱयाच्या किल्ले अजिंक्यताऱयावरील राजसदरेवरून देण्यात आला होता. किल्ले अज्ंिाक्यताऱयाला वेगळे महत्त्व अधोरेखित आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा राज्यभिषेक किल्ले अजिंक्यताऱयावर दि. 12 जानेवारीला झाला. आणि त्याच दिवशी अजिंक्यतारा ही राजधानी बनली गेली. शाहू महाराजांनी सातारा शहर वसवले. त्यांच्या पराक्रमांना उजाळा मिळावा याकरीता साताऱयातल्या शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही स्वाभिमान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजसदरेवर इतिहासकार प्रा. के. एन. देसाई, इतिहास अभ्यासक डॉ. संदीप महिंद गुरूजी, इतिहासप्रेमी अजय जाधवराव, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नगरसेवक अविनाश कदम, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, अध्यक्ष दीपक प्रभावळकर, प्रशांत अहिराव, अविनाश पोळ, रवी पवार, नितेश भोसले, संदीपभाऊ शिंदे, जयश्री शेलार, डॉ. संदीप काटे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, अमरदादा जाधव, सुतगिरणीचे अध्यक्ष नावडकर, राम हदगे, उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
 
शिवतीर्थावरून झाली सुरूवात... 
 
पहाटे थंडी असली तरी स्वाभिमानी दिन साजरा करण्यासाठी सकाळी 6 वाजता जिजाऊंच्या लेकी, हिल मॅरेथॉनच्या यंदाच्या नवीन महिला पदाधिकारी, सातारा-कास हेरिटेज मॅरेथॉनचे पदाधिकारी आणि रनर्स यांनी शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून ज्योत पेटवली. ही ज्योत घेवून किल्ले अजिंक्यताऱयाच्या दिशेने रनर्स धावत निघाले. दाट धुक्यातून धावताना जय जिजाऊ, जय शिवरायच्या नावाचा जयघोष सुरू होता. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी किल्ले अजिंक्यताऱयावर सर्व रनर्स पोहचले. यावेळी त्यांचे स्वागत पारंपारिक वाद्य वाजवून करण्यात आले. या वाद्यांचा आवाज कानावर पडल्याने रनर्सचा जोश आणखी वाढला होता. ही ज्योत घेवून सर्व रनर्स राजसदरेवर पोहचले. राजसदरेवर राजमाता जिजाऊ आणि शाहू महाराज यांच्या प्रतिमेजवळ ज्योत ठेवण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी राजसदरेवर शेकडो सातारकर उपस्थित राहिले होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
 
याप्रसंगी नगरसेवक धनजंय जांभळे, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलवडे, पहिल्या आर्यन लेडी डॉ. सुचित्रा काटे, पत्रकार प्रगती जाधव पाटील, स्मितल प्रभावळकर, मनसेचे सातारा शहर प्रमुख राहूल पवार, अभिजीत बारटक्के, गणेश विभुते, अमोल शेंडे, हैदर पटेल, सतिश चव्हाण, किरण शिंदे, वसीम सौदागर, सागर भोसले, अनिरूद्ध पवार, महेश घोरपडे, तेजस काकडे, वैभव रासकर, बंटी सर्वे, अक्षय पवार, सागर काशिद, कुणाल मुळे, अनिकेत कदम, मुधाजी गायकवाड, विजय जाधव आदी उपस्थित होते.
सजला होता अजिंक्यतारा --सातारा स्वाभिमान दिनानिमित्त संपूर्ण अजिंक्यताऱयाला सजवण्यात आले होते. किल्ल्याच्या महाद्वार व दोन्ही बुरुज फुलांच्या तोरणांनी उठून दिसत असल्याने रविवारी हा सेल्फी पॉईंट बनला होता. मुख्यद्वारापासून राजसदरेपर्यंत दुतर्फा रांगोळी काढून मार्गनिश्चिती केली होती.
पडका वाडा असा अपप्रचार झालेल्या राजसदरेला गेल्या आठ वर्षात मूर्तरुप येवू लागले आहे. यंदा राजसदर फुलांनी मडवण्यात आली होती. तर गेल्या पाच दिवसांपासून राजसदरेवरील झुडपे हटवण्यासाठी समितीचे पदाधिकारी श्रमदान करत होते.
 
राजसदरेवर निखळले पक्ष-आघाडय़ांचे भेद 

निरपेक्ष भावनेने सुरू झालेल्या या उपक्रमात सर्व पक्षांचे व आघाडय़ांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. कट्टर विरोधकही एकमेकांना अलिंगण देवून शुभेच्छा देत होते. संभाजी मालिकेच्या गीताने सुरुवात... प्रतिमा पूजन झाल्यानंतर पारंपारिक वेशभुषा केलेल्या जिजाऊच्या लेकीने संभाजी मालिकेचे मुख्य गीत गायले. तिच्या गोड आवाजाचे उपस्थित मान्यवरांसह सर्व साताकरांनी कौतुक केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांमार्फत स्वागत करण्यात आले.
 
 पारंपारिक वेशभुषा केलेले बाल शिवाजी महाराज...
राजसदरेवर कार्यक्रम स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा करून बाल शिवाजी आला होता. या बाल शिवाजीला पाहून उपस्थित शिवप्रेमी फोटो काढु लागले. तसेच जिजाऊच्या लेकीही पारंपारिक वेशभुषा करून कार्यक्रमात उपस्थित झाल्या होत्या. यांनी सर्वाचे लक्ष वेधले होते. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानीही कार्यक्रमात मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला होता.
 
पालिकेला शाहू महाराजांची प्रेम भेट... 

सातारा नगरपरिषद सातारा येथे शाहू महाराजांची प्रतिमा नाही. ही प्रतिमा नगरपरिषदेत लावण्यात यावी म्हणून शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे राहूल पवार, सुदाम गायकवाड, दीपक प्रभावळकर व इतर सदस्यानी शाहू महाराजांची प्रतिमा भेट दिली आणि लवकर ही प्रतिमा पालिकेत लावण्यात यावी अशी मागणी केली.
कर्मचाऱयांना समितीच्यावतीने बुट दिले भेट... अजिंक्यतारा किल्ल्यावर दरवर्षी वनवा लागण्याच्या घटना घडत असतात. हा वनवा लागल्यावर तो विझवताना कर्मचाऱयाच्या पायात चप्पल असते. यावेळी त्यांना भाजण्याचे प्रकार होतात. हे काम करताना त्यांना इजा होऊ नये म्हणून शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्या वतीने कंत्राटी कर्मचारी विजय यादव, अभिषेक जाधव यांना बुट भेट देण्यात आले. 
 
राजसदरेवर विशेष सन्मान करण्यात आले...
 
यावर्षी सातारा हिल मॅरेथॉनची जबाबदारी पूर्णत: महिलांकडे असणार आहे. जागतिक पातळीवरची ही स्पर्धा पार पाडण्याकरीता महिलांनी जबाबदारी घेतली आहे. यामुळे राजसदरेवर आर्यन लेडी डॉ. सुचित्रा काटे व महिला पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फिनिक्स ऍकॅडमीचे उमेश काशिद, कमांडो ऍकॅडमीचे दया सर, फोर्स ऍकॅडमी, ढाणे क्लासेस, संदीपभाऊ शिंदे आणि सातारा कास हिल मॅरेथॉन ग्रुप, पत्रकार प्रगती जाधव-पाटील आणि जाळपट्टा गुप यांचा गौरव करण्यात आला.
 
राजसदर हे नतमस्तक होण्याचे ठिकाण...
 
18 वर्ष छत्रपती शाहू महाराज कैदेत होते. कैदतून सुटल्यानंतर त्यांच्यासोबत केवळ 12 माणसं होती. शाहू महाराजांनी महाराष्ट्रात 1 हजार सरदार उभे केले हेते. ज्यांना बुद्धीचे तडाखे दिले ते उबदारी आले नाहीत. त्यांच्या राज्यभिषेक 12 जानेवारी 1708 ला किल्ले अजिंक्यतारा येथे झाला. अटकेपार झेंडे मराठय़ांनी रोवले ते किल्ले अजिंक्यताऱयावरून दिलेल्या आदेशाने. शाहू महाराजांची कारकिर्द कशी झाली? सर्व संपले असताना अटकेपार झेंडे रोवले हे माहिती पडले पाहिजे. इतिहासाचा आंधळा अभिमान शाप असून घोर अज्ञान हा एक गुन्हा आहे. त्या करता वाचन केल्याने तो गुन्हा दूर होतो. गेल्या 150 वर्षात कोटय़वधी कागदपत्रे वाचनाविना पडून आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचीही ससेहोलपट झाली आहे. त्यांचे औरंगजेबाने हाल करून मारल्यानंतर झुल्फीकार खानाने रायगडाला वेढा दिला. त्याचवेळी येसूबाईनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं. रायगड खानाने घेतला साडे सहा वर्षे किल्ला मराठय़ांनी लढवला होता. या राजघराण्यांचा इतिहास फार मोठा आहे. तसेच सातारच्या गादीचे कर्तृत्व फार मोठे आहे. सर्व सातारकरांसाठी हे नतमस्तक होण्याचे ठिकाण आहे. 
 
इतिहासकार प्रा. के. एन. देसाई 

ढाल-तलवारी पुरताच मर्यादित नाही... 

किल्ले अजिंक्यतारा हा जिथे भोसले घराण्यातील सर्वांची पाऊले लागली आहेत. 1636 ला शहाजीराजे या किल्लावर आले होते. शिवाजी महाराज आजारपणाच्या काळात राहिले होते. शाहू महाराजांनी तर राजधानीच जाहीर केली. स्वराज्याची पायाभरणी सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतरचा एक टप्पा 1708 ला स्वराज्याचे साम्राज्यात रूपातंर झाले, तो एक टप्पा. भोसले कुळाचा इतिहास केवळ ढाल-तलवारी पुरताच मर्यादित नाही. तर मातृभक्तीचा इतिहास आहे. स्त्राr सन्मानाचा इतिहास आहे. पितृभक्तीचा इतिहास आहे. ज्ञानाचा, विज्ञानाचाही इतिहास आहे. जगाच्या पाठीवर एकमेव असा राजा आहे त्यांनी आपल्या पित्याच्या हत्येचा बदला तीस वर्षांनी घेतला. दिल्लीतच बादशहाचे डोळे काढले. हे उल्लेख छात्रसालच्या पत्रातून आढळतात. पोर्तुगाच्या पत्रातून आढळतात. मुंबई शहराची स्थापना ही शाहू महाराजांच्या भीतीने झाले आहे.
 
अजय जाधवराव, इतिहास अभ्यासक 
 
10 लाख निधी मंजूर झाला पाहिजे... 

गेल्या 8 वर्षापासून शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, सल्लागार दीपक प्रभावळकर आणि शिवप्रेमी सातारा स्वाभिमान दिन साजरी करत आहेत. या कार्यक्रमामुळे सातारच्या नावलैकिकात भर पडत आहे. याला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी 10 लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला पाहिजे हीच मागणी सर्व सातारकरांची आहे. 
 
अविनाश कदम, नगरसेवक 

पालिकेची सर्वसाधारण सभा किल्ले अजिंक्यताऱयावर घेणार 

सातारा स्वभिमान दिन या कार्यक्रमात मला नगराध्यक्षा म्हणून बोलण्यापेक्षा सातारकर म्हणून बोलताना जास्त अभिमान होत आहे. नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर दीपक प्रभावळकर यांनी याच कार्यक्रमासाठी बोलवले होते. सातारकरांची प्रतिनिधी म्हणून येण्याचा आग्रह होता. त्यावेळी 50 लोक होते. आता या कार्यक्रमाचे स्वरूप प्रत्येक वर्षी वाढवत आहोत. यावर्षी यांचे प्रमाण खरोखरच वाढलेले आहे याचा सातारकरांना आनंद आहे. दोन्ही वक्त्यांनी शाहू महाराजांचा इतिहास सांगितला आहे. शाहू महाराज हे राज्यकर्ते होते, त्यांनी लढायला लढल्या होत्या. पण ते उत्तम असे प्रशासक होते. तसेच सातारा हे भारतातील पहिले नियोजित शहर आहे. उभी आडवी अशी संपूर्ण रचना आहे सातारची. या राजसदरावर सातारा नगरपालिकेची सभा व्हावी अशी मागणी होती. मात्र त्यावेळी वेळ कमी होता. तसेच अजिंक्यतारा नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही. यामुळे सर्वाच्या परवानग्या घ्यावा लागतात. सर्वसाधारण सभेसाठी सात-आठ दिवस आधी नोटीस काढावी लागते. यामुळे पुढच्या वेळी हा नक्की प्रयत्न करेन असा शब्द देते. नगरसेवक अविनाश कदम यांनी बजेटला तरतुद करू असे सांगितले. तर नक्कीच आम्ही यांची तरतूद करू. इथे काही निधी खर्च करण्याचा प्रयत्न करू जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल. आणि परवानगी घेवून नक्की तरतुद करू.
 
नगराध्यक्ष, माधवी कदम 
 
सातारा स्वाभिमान दिवसाची उंची वाढली ..गेल्या आठ वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे. ही एक चळवळ आहे. दिर्घकालीन कार्यक्रम व्हावा म्हणून हळुहळु सुरूवात झाली. आणि आज सातारकरांचा प्रतिसाद पाहून खऱया अर्थाने सातारा स्वभिमान दिनाची उंची वाढली आहे. आज सर्व सातारकांराना याचा अभिमान वाटत आहे. शहरातल्या प्रत्येक वॉर्डात हा स्वभिमान दिन साजरा झाला पाहिजे. नगराध्यक्षांनी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व सातारकरांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमात दरवर्षी मोठया उत्साहात साजरी करण्याचे आश्वासन सगळय़ांना देतो. 
 
दिपक प्रभावळकर, शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष