Your Own Digital Platform

मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात


स्थैर्य, सातारा : घरात चार्जिंगला लावलेले मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे तब्बल १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

राजवाडा परिसरात एक युवक चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी बाराच्या सुमारास तेथे जाऊन संशयिला ताब्यात घेतले. त्यावेळी संबंधित संशयित अल्पवयीन असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आत्तापर्यंत चोरलेले १४ मोबाईल पोलिसांकडे दिले. या अल्पवयीन मुलाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घरात चार्जिंगला लावलेले कोणाचे मोबाईल चोरीस गेले असतील तर त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, कॉन्स्टेबल बाजीराव घाडगे, हिम्मत दबडे-पाटील, हसन तडवी, अशोक जाधव, लैलेश फडतरे, अमीत माने, सचिन माने, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार आदींनी ही कारवाई केली