Your Own Digital Platform

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफास अटकस्थैर्य, रहिमतपूर : चोरीचे सोने विकत घेणाऱ्या दशरथ चांगदेव घाडगे (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) या सराफास बोरगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून तब्बल ९ तोळ्याचे दागिने जप्त केले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काशीळ, ता. सातारा येथील गुलाब महमंद महिबुब भालदार यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी १७ जुलै २०१९ रोजी चोरी करून चार लाखांची रोकड आणि १६ तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस संयुक्तपणे करत होते.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या चोरीप्रकरणी चिकनेस उर्फ चिकण्या टिगर पवार (रा. वाठार, किरोली, ता. कोरेगाव) याला अटक केली होती. त्याने काशीळ येथील चोरीची कबुली दिली होती.
 
चोरीचे सोने त्याने रहिमतपूर येथील दशरथ घाडगे या सराफाला विकल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी दशरथ घाडगे या सराफाला अटक केली. त्याच्याकडून चोरीचे नऊ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
 
अद्याप ७ तोळ्याचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांच्या मार्गदर्शखाली सहायक फौजदार चंद्रकांत कुंभार, राजू शिखरे, किरण निकम आदींनी केली.