Your Own Digital Platform

बजाज कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ आज लाँच होणारमुंबई : बजाज कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ १४ जानेवारीला लाँच करण्यात येणार आहे. बाईक उत्पादक बजाज कंपनीची बहुप्रतिक्षित ‘चेतक’ ही इलेक्ट्रिक स्कूटर युवा वर्गाला लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे. ही स्कूटर कधी बाजारात येणार याची प्रतिक्षा होती. ती प्रतिक्षा आता संपली आहे. बजाज कंपनी ही स्कूटर पुण्यात लॉन्च करणार आहे.
 
सुरुवातीच्या काळात बजाजच्या ‘चेतक’स्कूटरचा बोलबाला होता. भारतीयांच्या मनावर ‘चेतक’ने अधिराज्य गाजवले होते. तीच स्कूटर आता बजाज नव्या रुपात, नव्या ढंगात आणि इलेक्ट्रिकमध्ये लाँच करत आहे. चेतक स्कूटर इलेक्ट्रिक ब्रन्ड अर्बनाईट अंतर्गत सादर करण्यात आली आहे.
 
ही स्कूटर दमदार आणि स्टायलिश असणार आहे. स्कूटरचा लूक प्रीमियम आहे. रेट्रो लूक असणाऱ्या स्कूटरमध्ये कर्वी बॉडीवर्क, मल्टी स्पोक अलॉय व्हिल्स, स्विचगिअर, फुल एचडी लाइटिंग आणि डिजीटल कंसोल आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये ९५ किमी पर्यंत अंतर कापणार आहे, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत ही स्कूटर खूपच स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असणार आहे.
 
चेतक स्कूटरच्या विक्रीला सुरूवात पुण्यातून होणार आहे. त्यानंतर बंगळुरु आणि इतर मेट्रो शहरात या स्कूटरची विक्री होईल. बजाजने ही स्कूटर १६ ऑक्टोबरला सादर केली होती. या स्कूटरची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही.