Your Own Digital Platform

सक्षम नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे-जाधवस्थैर्य, फलटण : भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून नवीन अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धती तयार करण्यात आली असून, या माध्यमातून विद्यार्थ्याला भावी आयुष्यात स्वतःच्या पायावर सक्षम उभा राहणारा नागरिक घडविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करावे असे आवाहन बालभारतीचे विशेष कार्यकारी अधिकारी रविकिरण जाधव यांनी केले.
 
कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचारमंच कोल्हापुर व कोकण विभाग आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने एस एम लोहिया कॉलेज येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन विभागातील अर्थशास्त्र शिक्षकांच्या एक दिवसीय अर्थशास्त्र कार्यशाळेत मार्गदर्शन करताना रविकिरण जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विचार मंचचे अध्यक्ष प्रा. शरद शेटे होते, यावेळी कोल्हापूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव व प्रभारी अध्यक्ष एस एम आवारी, एस एम लोहिया कॉलेजचे प्राचार्य कुंभार व विचार मंचचे मार्गदर्शक आर. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
जाधव म्हणाले, दररोज नवनवीन ज्ञान देणार्‍या शिक्षकाची विद्यार्थी भक्ती करतात असे सांगून रविकिरण जाधव म्हणाले, शिक्षक मार्गदर्शक व सुलभक असावा त्यांनी स्वतःचे वाचन व अभ्यास वाढविला पाहिजे त्याचबरोबर अध्यापनामध्ये नवीन आलेल्या तंत्र व साधनांचा वापर केल्यास तो शिक्षक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आदर्श ठरतो. नवीन अभ्यासक्रम ज्ञान रचना व विद्यार्थ्याला कृतिशील बनवण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला असून, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचे असून या विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्याला यामधील अमूर्त संकल्पना समजावून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी या विषयातील ज्ञान आपल्या जीवनात वापरू लागेल व कारकून होण्याऐवजी अर्थशास्त्री होईल असे सांगितले.
 
एस एम आवारी म्हणाले जागतिक बाजारपेठेत तयार होणारा विद्यार्थी जागरूक नागरिक घडविण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे सांगून नवीन अभ्यासक्रमाच्या बाबतीत शिक्षकांच्या शंकाचे समाधान करण्यासाठी आयोजित केलेली अर्थशास्त्राची कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचारमंच यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
 
विचारमंचचे अध्यक्ष प्रा शरद शेटे यांनी या एक दिवसीय कार्यशाळेचे महत्व व अर्थशास्त्र विचार मंचच्या कार्याचा आपल्या प्रास्ताविकात आढावा घेतला.
 
विचारमंचचे प्रा. विजयकुमार मेटकरी यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव प्रा. अनिल निर्मले यांनी आभार मानले. या कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विभागातील अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.